माजी न्यायमूर्ती काटजू हे तसे अभ्यासू व्यक्तिमत्त्व. कायद्यावरील त्यांचे ग्रंथ मान्यता पावलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयात काम करताना त्यांनी काही महत्त्वपूर्ण निकालही दिले. ‘लीव्ह इन रिलेशन्स’ला कायद्याची चौकट देणारा निकाल हा त्यांचाच. म्हणजे जग कुठे जात आहे याचे भान त्यांना आहे. अशा अभ्यासू व्यक्तीने निवृत्तीचा काळ खरे तर ग्रंथ वाचन, लेखन अशात घालविणे योग्य ठरले असते. परंतु, व्यासंगात गढून काही भरीव काम करण्याची प्रवृत्ती या देशात नाही. त्यापेक्षा निवृत्तीनंतरही काहीतरी पद पदरात पाडून सत्तेच्या झुल्यावर झुलण्याची हौस जवळपास प्रत्येकाला असते. काटजू त्यांना अपवाद नाहीत. निवृत्तीनंतर त्यांना प्रेस कौन्सिलचे अध्यक्षपद मिळाले. त्यापाठोपाठ समारंभाची आमंत्रणे येऊ लागली. खरे तर चिंतनातून कायद्याचा अर्थ लावणे हे न्यायमूर्तीचे मुख्य काम. वाचाळपणा त्या पदाला शोभत नाही. परंतु देशातील वाचाळ संस्कृती तेथपर्यंतही पोहोचते आणि निकालापेक्षा न्यायमूर्तीची शेरेबाजी हाच बातमीचा विषय होतो. अकार्यक्षम सरकार व प्रशासन आजूबाजूला असल्याने ही शेरेबाजी लोकांना आवडते. पण शेरेबाजी हा न्याय नव्हे, हे लोकांना कळत नाही. प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून सभा-समारंभात मिरविता येऊ लागल्यावर तर काटजूंच्या शेरेबाजीला ऊत आला. चमकदार व फटकळ बोलणाऱ्यांची वाहवा करण्याची रीत त्यांना लाभदायक ठरली. त्यांच्या चमकदार शेऱ्यांची चांगली बातमी होणार हे ओळखून चतुर आयोजक त्यांना आवर्जून बोलावू लागले. त्याच्या बातम्या होऊ लागल्या. समारंभात चमकदार वक्तव्ये करून आपण पदाची प्रतिष्ठा खालावीत आहोत याचे भान त्यांना राहिले नाही. गेल्याच आठवडय़ात त्यांनी नरेंद्र मोदींवर लेख लिहिला. गुजरात दंग्याबद्दल त्यांनी मोदींवर दोषारोप केले. नेहमीप्रमाणे नाझी राजवटीशी तुलना केली आणि मोदींना पंतप्रधान होऊ देऊ नका, असे लोकांना आवाहन केले. मोदी देशासाठी धोकादायक आहेत असे काटजूंचे मत असू शकते. तसे मत बनविण्याचा त्यांना अधिकार आहे. परंतु, हे मत कायद्याच्या कसोटीवर घासून मांडले गेले असते तर योग्य ठरले असते. परंतु, काटजूंच्या लेखात कायद्यापेक्षा मोदींसंबंधीच्या व्यक्तिगत रागद्वेषाला महत्त्व दिले गेले आहे व ही त्या लेखाची कमकुवत बाजू आहे. याशिवाय प्रेस कौन्सिलच्या अध्यक्षांनी अशी राजकीय भूमिका घ्यावी का, हा प्रश्न आहे. राजकीय भूमिका घेताना मर्यादातिक्रमण होत आहे याचे भान न्यायमूर्ती असूनही काटजूंना राहिले नाही. याच मुद्दय़ावर अरुण जेटली यांनी काटजूंना खिंडीत पकडले आणि राजकीय पक्षपातीपणाचा आरोप त्यांच्यावर केला. जेटली यांनी अत्यंत तिखट भाषेत काटजूंचा समाचार घेतला आहे. जेटलींना उत्तर देताना काटजूंनी काँग्रेसी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचा हवाला दिला असला तरी मुख्य मुद्दा त्यांचे मर्यादातिक्रमण हा होता. त्याला काटजूंकडून उत्तर नाही. याची दुसरी बाजू म्हणजे काटजूंवर तिखट वार करीत मोदींचे नाव पुन्हा चर्चेत आणण्याची संधी जेटलींनी साधली. अफझल गुरूच्या फाशीमुळे मोदींच्या प्रचारातील हवा काढून घेतली आहे, असे पक्षातील मोदीविरोधक मानतात. संसदेत भ्रष्टाचाराची नवी प्रकरणे बाहेर काढून आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याची पक्षातील मोदीविरोधकांची धडपड आहे. काटजूंनी या धडपडीवर बोळा फिरविला व भाजपच्या सर्व नेत्यांना मोदींच्या समर्थनार्थ बोलण्यास भाग पाडले. काटजूंच्या लेखाची इतक्या तत्परतेने दखल घेण्यामागे ही रणनीती होती. काटजू बोलले अन् जेटलींचे फावले.

Story img Loader