थोर इतिहास संशोधक, कवी आणि नाटककार वासुदेवशास्त्री खरे यांच्या नावे सुरू झालेल्या ‘खरे वाचन मंदिर’ या ज्ञानमंदिराने सांगलीतील हजारो वाचकांची ज्ञानाची भूक भागविण्याचे काम केले. केवळ शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थीच नव्हे, तर ‘जो जो ज्ञानार्थी, तो तो विद्यार्थी’ या भूमिकेतून हा ज्ञानयज्ञ गेल्या ९४ वर्षांपासून कार्य करतो आहे. खरे मंदिर वाचनालयात आजच्या घडीला ४० हजारांहून अधिक ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. यामध्ये कथा-कादंबऱ्या तर आहेतच, पण चरित्र ग्रंथ, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ अभ्यासकांना उपलब्ध आहेत.
शाश्वत वाङ्मयाने माणसाची साहित्यिक भूक भागविण्याचे अजोड कार्य केले आहे. ज्यातून वैचारिक, सामाजिक आणि साहित्यिक प्रगल्भता निर्माण होतानाच पुन:प्रत्ययाचा आनंद मानवी जीवनात फुलविला आहे. शाश्वत वाङ्मयाचे महत्त्व ओळखूनच काही चळवळ्या वृत्तीच्या लोकांनी सांगली जिल्ह्यातील मिरजेत सन १९१९ मध्ये वाङ्मयीन चळवळीचे एक रोप लावले. ‘खरे वाचन मंदिर’ या नावाने बहरलेल्या या रोपटय़ाचा आज वटवृक्ष झाला असून त्याच्या सावलीखाली हजारो रसिक आनंद लुटत आहेत.
९ नोव्हेंबर १९१९ या दिवशी या कार्याचा प्रारंभ झाला. काही चळवळ्या कार्यकर्त्यांनी समाजहिताच्या तळमळीतून या दिवशी ‘मिरज विद्यार्थी संघ’ नावाची संस्था स्थापन केली, ज्याद्वारे शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागावी यासाठी वाचनालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना केवळ पाठय़पुस्तकेच अभ्यासासाठी उपलब्ध झाली तर त्यांचे ज्ञान मर्यादित राहते. अवांतर वाचनाची भूक ज्ञानार्थी व्यक्तीला गप्प बसू देत नाही, पण पुस्तके विकत घेऊन ज्ञानलालसा भागवणे हे प्रत्येकालाच शक्य असत नाही. म्हणूनच या नव्या वाचन चळवळीचा जन्म झाला. स्टुडंट्स युनियन, स्टुडंट्स असोसिएशन व सरस्वती वाचनालय यांचे एकत्रीकरण करून ‘मिरज विद्यार्थी संघा’ची स्थापना करण्यात आली. या संघाने एका वाचनालयाला जन्म दिला – खरे वाचन मंदिर!
‘इतिहासाचार्य’ व ‘शिवसंभव’ या नाटकाचे कत्रे मिरजेचे भूषण म्हणून ओळखले जाणारे वासुदेवशास्त्री खरे यांच्या लेखनावर बालगंधर्व यांचे अफाट प्रेम होते. या प्रेमापोटी ते या संस्थेच्या मदतीसाठी अगदी प्रथम पुढे आले. वाचनाची ही चळवळ रुजावी, ती स्वत:च्या पायावर उभी राहावी यासाठी मग त्यांनी पहिला पुढाकार घेतला. या संस्थेला स्वत:ची जागा, इमारत असेल, तर हे कार्य वेग घेईल हे लक्षात घेऊन बालगंधर्वानी योगदान देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी गंधर्व नाटक मंडळींचा एक कार्यक्रमच आयोजित केला. मिरजेच्या हंसप्रभा थिएटरमध्ये १२ मार्च १९३० रोजी गंधर्व नाटक मंडळींचा ‘स्वयंवर’ नाटकाचा हा प्रयोग रंगला. या प्रयोगातून १९८६ रुपये जमा झाले ज्यातूनच खरे मंदिराची इमारत उभी राहिली. मिरज संस्थानचे तत्कालीन अधिपती श्रीमंत गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन यांच्या हस्ते ही वास्तू खरे स्मारक कमिटीला मालकी हक्काने देण्यात आली.
संस्थेची स्वत:ची जागा, इमारत झाली, ज्यातून वाचनालय चळवळीने खऱ्या अर्थाने वेग घेतला. थोडय़ाच दिवसांत वाचनालयाबरोबरच संस्थेच्या अन्य उपक्रमांचाही जन्म झाला. वाचनालय, ग्रंथसंग्रहालय, वसंत व्याख्यानमाला, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्याने, प्रवचने, संगीत व ललित कला, प्रदर्शने या ठिकाणी आयोजित केली जाऊ लागली. ज्ञानाची भूक चहुअंगांनी भागवली जाऊ लागली. विद्यार्थी या साऱ्यांच्या केंद्रस्थानी होताच. मग त्यांच्यासाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू झाली. गुणवान विद्यार्थ्यांना मंदिरातर्फे पारितोषिके सुरू झाली. महिलांसाठीही स्वतंत्र वाचनकक्ष सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी महिलांना उपयुक्त साहित्य ठेवण्यात आले आहे.
लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या दृष्टीने मिरज विद्यार्थी संघ जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. दर दोन महिन्यांनी एखादी कार्यशाळा आयोजित करण्यात येते. या कार्यशाळेत बालवाचक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आमंत्रित केले जाते. पुणे येथील बालभवन संस्थेच्या उमा बापट यांचेही योगदान यासाठी घेतले जात आहे. ‘चिल्ड्रेन्स कॉर्नर’ नावाने स्वतंत्र विभाग यासाठी करण्यात आला आहे. या ठिकाणी खेळणी, नकाशे यांबरोबरच इंटरनेट, दूरदर्शन याची सोय केली आहे. मुलांनी कोणती पुस्तके वाचावीत, कशी वाचावीत, याचे प्रात्यक्षिक चार ते दहा वयोगटातील मुलांसाठी आयोजित केले जाते. या वेळी त्यांच्या पालकांनाही आमंत्रित केले जाते. यातूनच वाचक चळवळ घडविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. अगदी अंगणवाडीत असणाऱ्या खेळण्यांच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाचे धडे दिले जातात. या बालकुमार कक्षासाठी राजा राममोहन रॉय प्रतिष्ठानने दीड लाख रुपयांचे स्वतंत्र साहाय्य उपलब्ध करून दिले.
खरे मंदिर वाचनालयात आजच्या घडीला ४० हजारांहून अधिक ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. यामध्ये कथा-कादंबऱ्या तर आहेतच, पण चरित्र ग्रंथ, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ अभ्यासकांना उपलब्ध आहेत. बहुसंख्य पुस्तके मराठीतील असली, तरी काही संस्कृत ग्रंथांचा संग्रह या ठिकाणी जाणीवपूर्वक जोपासला गेला आहे. यामध्ये ६० पोथ्या असून त्यापकी १६ पोथ्यांची हस्तलिखिते उपलब्ध आहेत. ही हस्तलिखिते मोडी लिपीतील आहेत. त्यामुळे त्यांना ‘ऐतिहासिक ठेवा’ म्हटले तर वावगे ठरणार नाही.
स्पध्रेच्या युगात तरुण मागे राहू नये, त्याला नवनवीन ज्ञान उपलब्ध करून देण्याबरोबरच ऐतिहासिक संदर्भ देण्याचा प्रयत्न खरे मंदिराने जोपासला आहे. प्रशासकीय पातळीवर वरिष्ठ पदे मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचे ज्ञान मिळावे यासाठी नव्याने संकल्प सोडला असून स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध करण्यात आली आहेत. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिकेची सोय करण्यात आली असून या अभ्यासिकेत सध्या ५० हजार रुपयांची पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत.
खरे मंदिर वाचनालयाच्या व्याख्यानमालेलाही एक मोठी परंपरा लाभली आहे. पुणे, वाईबरोबरच मिरजेची ही वसंत व्याख्यानमाला ख्यातनाम आहे. संस्थेतर्फे दर वर्षी मे महिन्यात या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. गेली ८८ वष्रे अथकपणे हे ज्ञानसत्र सुरू आहे. यानिमित्ताने मान्यवर लेखक, लोकोत्तर नेतृत्व, सामाजिक-राजकीय संघटनांच्या अध्वर्यूंची पायधूळ संस्थेला लागली आहे.
शतकपूर्तीकडे वाटचाल असलेल्या या संस्थेला अनेक मान्यवरांचा सहवास, मार्गदर्शन लाभले. या यादीवर केवळ नजर टाकली तरी ‘खरे वाचन मंदिर’चा परीघ लक्षात येतो. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महर्षी कर्वे,‘काळ’कत्रे शि. म. परांजपे, स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य विनोबा भावे अशी ही नावे संस्थेचा दबदबा निर्माण करतात. लोकमान्य टिळक अगदी सुरुवातीच्या टप्प्यात संस्थेच्या भेटीवर आले होते. त्यांनी या कार्याची माहिती घेतली आणि ‘संस्था उत्तरोत्तर अधिकाधिक भरभराटीस येऊन लोकाश्रयास जास्तीत जास्त पात्र होईल’ असा आशीर्वाद दिला.
महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्यापासून ते नरहर कुरुंदकरांपर्यंत अशा अनेक थोरांनी संस्थेला भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. मान्यवरांचे हे अभिप्राय आता दुर्मीळ साहित्य ठरले आहे. संस्थेच्या स्मृतींची ही पिंपळपाने आहेत. संस्थेतर्फे लवकरच या दुर्मीळ अभिप्रायांवरचे एकत्रित ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा संस्थेचा मानस आहे.
संस्थेच्या या वाटचालीत, ज्ञानदानाच्या कार्यात अनेकांनी हातभारही लावला आहे. बालगंधर्वापासून सुरू झालेली ही मदतीची परंपरा पुढे वेळोवेळी, गरजेनुसार अनेकांनी टिकवून ठेवली. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांचे तर ‘खरे मंदिर’शी जिव्हाळ्याचे नाते. अगदी सुरुवातीला विद्यार्थी संघाचे तत्कालीन तळमळीचे कार्यकत्रे वसंतराव आगाशे यांनी व्याख्यानाच्या निमित्ताने ‘पुलं’ना आमंत्रित केले होते. या भेटीतच ‘पुलं’ना संस्थेला लोकशिक्षणासह सांस्कृतिक कार्यासाठी सभागृहाची गरज असल्याचे जाणवले. तत्क्षणी त्यांनी या कार्यास मदत केली. यातूनच ‘मुक्तांगण’चे काम उभे राहिले. या मुक्तांगण सभागृहाच्या उद्घाटनासाठी, ८ एप्रिल १९९० रोजी ‘पुलं’ स्वत: सपत्नीक तर आलेच, पण उद्घाटनासाठी कुसुमाग्रज आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अशांची उपस्थिती लाभली.
संस्थेला हे नवे सभागृह उपलब्ध झाले तरी, नित्य भासणाऱ्या वास्तूविषयक अन्यही काही गरजा भागवायच्या होत्या. पुस्तकांची सुयोग्य व्यवस्था लावण्यासाठी ग्रंथसदन उभारण्याची गरज होती. याशिवाय ग्रंथ देवघेव, वाचनकक्ष, महिला व बालकुमार यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, कार्यालय या प्रमुख गरजा होत्या. तसेच नवीन वास्तू खरे मंदिरशी जोडण्यासाठी निधीची गरज होती. यासाठी कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालयाने सात लाख रुपयांचा निधी दिला. यातून मुक्तांगण सभागृहातील पहिल्या मजल्यावरील तीन दालने तयार करण्यात आली. याशिवाय बाळासाहेब आपटे यांच्या खासदार निधीतून सात लाख रुपयांचे भरीव अर्थसाहाय्य इमारतविस्तारासाठी संस्थेला प्राप्त झाले.
नऊ दशकांची परंपरा असणाऱ्या खरे मंदिर वाचनालयात आता बदलत्या काळानुसार काही गरजा निर्माण झाल्या आहेत. संस्थेच्या ज्या इमारतीतून नऊ दशकांपासून हा ज्ञानयज्ञ सुरू आहे, ती इमारत आता जुनी झाली आहे. तिच्या दुरुस्तीसाठी संस्थेला निधीची आवश्यकता आहे. मुक्तांगण सभागृहातील दालनांची दुरुस्ती करावी लागणार आहे.
विविध प्रकारचे बाल वाङ्मय, नियतकालिके, कॉमिक्स, नकाशे, शैक्षणिक क्रीडा साधने, संगणकीय साधने, दृक-श्राव्य साधने निर्माण करण्याची संस्थेची योजना आहे. संस्थेच्या व्याख्यानमालेत सहभागी झालेल्या थोरांचे विचार विद्यार्थी संघाने कॅसेट व सीडीच्या माध्यमातून जतन करून ठेवले आहेत. ही व्याख्याने परत ऐकण्याची संधी श्रोत्याला उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी अत्याधुनिक ध्वनियंत्रणा असणारा स्टुडिओ उभारण्यासाठी संस्थेची धडपड सुरू आहे. वाचनालयातील पुस्तकांची रचना, मांडणीला आधुनिक रूप द्यायचे आहे. या साऱ्यांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची संस्थेला अपेक्षा आहे.
खरे वाचन मंदिरचा हा ज्ञानयज्ञ जवळपास गेली ९४ वर्षे या समाजाची तृष्णा भागवत आहे. ज्ञानाचा, विचारांचा प्रसार ही या मंदिराची धारणा आहे, तर यातून जोडला गेलेला अवघा समाज, ज्ञानवंत हे या संस्थेचे संचित आहे.
संस्थेपर्यंत कसे जाल?
‘खरे वाचन मंदिर’ संस्थेचा शाश्वत मूल्यांचा ठेवा पाहण्यासाठी मिरजला यावे. इथे येण्यासाठी पुण्या-मुंबईसह सर्व भागांतून सोय आहे. मिरज हे मध्य रेल्वेच्या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकापासून संस्थेपर्यंत रिक्षाने अथवा शहर बस सेवेने येता येते.
खरे वाचन मंदिर, मिरज
संस्थेकडे उपलब्ध असलेल्या बहुमोल ग्रंथसंपदेचे जतन करण्यासाठी तसेच साहित्यठेवा जतन करण्यासाठी व वाचनालयातील पुस्तकांची रचना, मांडणीला आधुनिक रूप द्यायचे आहे. त्यासाठी संस्थेला मदतीची गरज आहे.
‘खरे वाचन मंदिराचे ज्ञानदानाचे कार्य महत्त्वाचे आहे. समाजशिक्षणाचा हा यज्ञ असून हे कार्य सुरू राहिले पाहिजे.’
पु. ल. देशपांडे
दुर्मीळ साहित्याचे जतन
संस्थेकडे असलेल्या दुर्मीळ ग्रंथसंपदेचे जतन करण्याचा मानस आहे. यासाठी पोथ्यांचे फिल्मिंग, लॅमिनेशन; संग्राह्य़ व्याख्यानांचे डिजिटलायजेशन केले जाणार आहे. दुसरीकडे नव्या पिढीत वाचनसंस्कृती रुजावी यासाठी नवनव्या शैक्षणिक साधनांची निर्मिती करण्याचाही संस्थेचा मानस आहे.
पुस्तकांनी बळ दिलं घाव-आघात सोसण्याचं
आयुष्यातल्या अंधाराला उंबरठय़ावरच रोखण्याचं
हा धीर आणि आधार सोबती होऊन सोबत आला
जगता जगता संकटाचा अर्थ तेव्हा कळत गेला
आयुष्याला पुन्हा एकदा घासूनपुसून लख्ख केलं
जगण्याच्या बाजारात हात धरून उभं केलं.
कवयित्री श्रीमती रेखा भांडारे
धनादेश या नावाने काढावेत
मिरज विद्यार्थी संघ, मिरज
(देणगीदारांना ८० जी अन्वये आयकर सवलत)
आपले धनादेश येथे पाठवा..
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४००००१ ०२२-६७४४०२१४
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७
पुणे कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट
नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४१०००
नाशिक कार्यालय
संपादकीय विभाग,
स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. १९, ग्रेट
नागरोड, उंटखाना,
नागपूर -४४०००९. ०७१२-२७०६९२३
औरंगाबाद कार्यालय
संपादकीय विभाग,
मालपाणी, ओबेरॉय टॉवर्स, जालना रोड, शासकीय दूध डेअरीसमोर, औरंगाबाद. ०२४०-२३४६३०३.
नगर कार्यालय
संपादकीय विभाग,
आशीष, सथ्थ्या
कॉलनी, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१- २४५१५४४/ २४५१९०७.
दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस बिल्डिंग, ९/१०, बहादूरशाह जफर मार्ग नवी दिल्ली – ११०००२ ०११-२३७०२१००.