जगात सर्वत्रच राजकारण्यांची पुढची पिढी भ्रमनिरास करताना दिसते. आपला जीव किती आहे आणि आपण बोलतो काय याचे कसलेही भान नसल्याचा प्रत्यय या पिढीकडून वारंवार येत आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन अमेरिकेविरुद्ध युद्धखोरीचा भाषा करतात तेव्हा आक्रस्ताळेपणा करून जगाला अधिकाधिक धमकावण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.
पाचपोच नसलेल्याच्या हाती सत्ता गेल्यास काय होते याचा अनुभव जितका स्थानिक पातळीवर सध्या येत आहे तितकाच आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तर कोरियाच्या निमित्ताने येत आहे. दोन वर्षांपूर्वी किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाची सत्ता वडिलांच्या निधनानंतर हाती घेतली तेव्हा बापापेक्षा पोरगा बरा निघेल अशी अपेक्षा केली गेली होती. एकतर किम जोंग वयाने तरुण आहेत. या वयात सर्वसाधारणपणे आर्थिक प्रगतीची आस असते. अशी आस असलेले युद्धखोरीत वेळ घालवत नाहीत. परंतु किम जोंग उन यांच्याबाबतचा हा अंदाज फोल ठरला. याबाबतही एक सार्वत्रिकता नमूद करावयास हवी. जगात सर्वत्रच राजकारण्यांची पुढची पिढी भ्रमनिरास करताना दिसते. उत्तर कोरिया त्यास अपवाद नाही. किम याने आल्या आल्या दक्षिण कोरियाचे जहाज बुडवून आपण बेजबाबदारपणाच्या बाबतीत वडिलांपेक्षा सवाई आहोत, हे दाखवून दिले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या युद्धज्वरास चांगलीच उकळी फुटली असून शेजारी दक्षिण कोरियाच्या विरोधात युद्धाची हाक त्यांनी दिली आहे. किम जोंग यांचा तारुण्यसुलभ मूर्खपणा इतका की ते थेट अमेरिकेवरच हल्ला करण्याची भाषा करतात. उत्तर कोरियाची अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे अमेरिकेवर बाँबचा वर्षांव करतील अशी धमकी त्यांनी नुकतीच दिली. आपण कोण आहोत, आपला जीव किती आहे आणि आपण बोलतो काय याचे कसलेही भान नसल्याखेरीज इतका मूर्खपणा असंभव आहे. किम यांनी ते दाखवून दिले आहे. आतादेखील दक्षिण कोरियाच्या विरोधात त्यांनी हालचाली सुरू केल्या असून अन्य देशांतील राजदूतांना राजधानी प्याँग याँगमधून निघून जाण्यास सांगितले आहे. शेजारील दक्षिण कोरियाबरोबर असलेला कायमस्वरूपी तणाव निवळावा म्हणून या दोन देशांतील लष्करी नेतृत्वांत दूरसंचार सेवा आहे. किम यांनी ती बंदच करून टाकली. म्हणजे त्या देशाशी आणीबाणी निर्माण झालीच तर संपर्क साधण्याची सोयच नाही. दोन देशांतील सीमावर्ती भागांत औद्योगिक वसाहती आहेत आणि उभय देशांतील नागरिक तेथे नोकरी व्यवसाय करतात. अशा कर्मचाऱ्यांसाठी विश्ेाष परवान्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. किम यांनी तीही रद्द केली. म्हणजे दक्षिण कोरियातील कामगारांना आपल्या दैनंदिन कामाच्या ठिकाणी जाणेच अवघड झाले. या सगळय़ाचा उद्देश दक्षिण कोरियावर दबाव निर्माण करणे आणि आपली युद्धाची खुमखुमी दाखवणे इतकाच होता. त्यापाठोपाठ किम यांनी उत्तर कोरियाच्या अणुबाँबनिर्मिती यंत्रणाही कार्यान्वित केल्या आणि अणुचाचण्यांचीही तयारी केली. श्रीमंताच्या लाडाकोडात वाढलेल्या पोराने वडिलांच्या बंदुकांशी खेळत इतरांना घाबरवण्याइतकाच हा निर्बुद्ध प्रकार आहे. परंतु किम यांना त्यात भलताच रस आहे असे दिसते. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या शीतयुद्धाच्या काळात उत्तर आणि दक्षिण कोरिया हे कम्युनिस्ट गट आणि अमेरिकेत विभागले गेले. तेव्हापासून उत्तर कोरिया हा सर्व जगाचीच डोकेदुखी बनला असून अत्यंत बेजबाबदार राज्यकर्ते हे त्याचे वैशिष्टय़ राहिलेले आहे. पाकिस्तानचे अणुतस्कर ए क्यू खान यांना अणुबाँबचे तंत्रज्ञान दिले ते उत्तर कोरियानेच. जगात ज्या ज्या म्हणून बेजबाबदार शक्ती आहेत त्यांच्याशी उत्तर कोरियाचे सहकार्य असते. ही बेजबाबदारपणाची सशक्त परंपरा किम यांच्या आजोबांपासून सुरू होते. वडिलांनी ती प्राणपणाने जोपासली. यातील फरक इतकाच की वडिलांनी शीतयुद्धाचा तापलेला काळ आपल्या गुलछबू शौकांच्या पूर्ततेसाठी वापरला आणि मधल्या काळात आंतरराष्ट्रीय दंडेली केली. त्यांचा मुलगा विद्यमान सत्ताधीश किम याने आपल्या कारकिर्दीची सुरुवातच दंडेलीने करून आपण किती पुढे जाऊ शकतो याची चुणूक दाखवून दिली आहे.
वास्तविक उत्तर कोरिया आज आर्थिकदृष्टय़ा पूर्णपणे पोखरलेला असून लाचखोरी हा नियम बनलेला आहे. चीन वा दक्षिण कोरियाच्या सीमेवरून होणाऱ्या तस्करीने उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेस गिळंकृत केले आहे. या तस्करीत उच्च पदावरील सरकारी, लष्करी अधिकारी यांच्यापासून सगळेच गुंतलेले आहेत. सर्वसाधारणपणे मूळ अर्थव्यवस्थेपेक्षा ही समांतर अर्थव्यवस्था सहसा मोठी होत नाही. तसे झाल्यास मूळ अर्थव्यवस्थेस धोका पोहोचतो. उत्तर कोरियात हे असे होत आहे. याच्या जोडीला दक्षिण कोरियातील मुक्त अर्थव्यवस्थेचे वारेही उत्तर कोरियात चोरून का होईना मोठय़ा प्रमाणावर खेळत आहेत. त्यामुळे स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांचा एक मोठा वर्ग उत्तर कोरियात धुमसताना दिसतो. याच्या जोडीला अमेरिकेच्या प्रेरणेने दक्षिण आणि उत्तर कोरियांच्या सीमावर्ती भागांत दक्षिण कोरियाच्या भूमीवरून काही शक्तिशाली नभोवाणी आणि टीव्ही केंद्रे जाणूनबुजून चालवली जातात. हेतू हा की पोलादी पडद्याआडच्या उत्तर कोरियाई जनतेला जगात काय चालले आहे ते कळावे. या केंद्राचे चोरटे प्रक्षेपण उत्तर कोरियाभर दिसू शकते. याच्या जोडीला इंटरनेटही आहे. त्यामुळे उत्तर कोरियन जनतेत मोठय़ा प्रमाणावर असंतोष धुमसू लागला असून त्याचा स्फोट कधीही होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. कराल हुकूमशहाच्या विरोधात अन्य कोणत्याही उपायांपेक्षा प्रभावी ठरतो तो नागरिकांचा असंतोष. त्यामुळे या असंतोषाची पेरणी इमानेइतबारे केली जात आहे. आजमितीला उत्तर कोरियाच्या तुरुंगांत दोन लाखांहून अधिक नागरिक राजकीय कैदी म्हणून खितपत पडून आहेत. त्यांना कोणतेही भवितव्य नाही. कोणत्याही क्षुल्लक कारणांवरून एखाद्यास राष्ट्रविरोधी ठरवण्याचा अधिकार उत्तर कोरियाच्या पोलीस आणि लष्करास आहे. त्यामुळे हवी त्यांची उचलबांगडी त्यांना करता येते आणि त्या विरोधात कोणाला आवाजही उठवता येत नाही. अशा प्रकारे आजच्या काळात फार काळ राज्य करता येणे अशक्य आहे. किम यांना अर्थातच याची जाणीव असायची शक्यता नाही. तशी ती असती तर जगातील अन्य तरुणांप्रमाणे मायभूमीच्या आर्थिक विकासाकडे त्यांनी लक्ष दिले असते. वास्तविक चीन असो वा दक्षिण कोरिया. उत्तर कोरियाच्या शेजारील देशांनी आर्थिक बाबतीत बडय़ा देशांना लाजवेल अशी प्रगती केली आहे. उत्तर कोरियाच्या किम घराण्यास त्याची फिकीर नाही. पोलादी राजवटीचा शासकीय वरवंटा फिरवत देश ही खासगी मालमत्ता असल्यासारखे त्यांचे वागणे आहे.
परंतु ते फार काळ चालू राहणार नाही. याचे कारण असे, इतके दिवस उत्तर कोरियाच्या कारवायांकडे चीनने दुर्लक्ष केले. कारण ती त्यांची त्या वेळची राजकीय सोय होती. विद्यमान व्यवस्थेत चीनला हे बेजाबदार कारटे सांभाळणे परवडणारे नाही. चीननेही आर्थिक विकासास प्राधान्य दिले असून जागतिक राजकारणात त्यास आता उत्तर कोरियाची अजिबातच गरज नाही. शीतयुद्धाच्या ऐन जवानीच्या काळात अमेरिकेविरोधात धोरणात्मक व्यूहरचनेचा भाग म्हणून चीन हा सतत उत्तर कोरियाची पाठराखण करीत राहिला. आता ती गरज संपली आहे. त्यामुळे उत्तर कोरियाच्या नाडय़ा आवळण्यात चीनच आघाडी घेईल हे उघड आहे.
याचा अर्थ असा की अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांना किम जोंग उन यांना एकाच वेळी तोंड द्यावे लागेल. तितकी ताकद त्यांच्याकडे नाही. त्यामुळे अधिक आक्रस्ताळेपणा करून जगाला अधिकाधिक धमकावण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. विवस्त्र व्हायची तयारी असलेल्यास अखेर परमेश्वरही घाबरतो अशा अर्थाची म्हण आहे. किम यांच्याबाबत ती लागू पडत असल्यामुळे त्यांच्या कृत्याची दखल घ्यावी लागते इतकेच. अन्यथा त्यांचे सारे आतापर्यंतचे वागणे बालिश बहु बायकांत बडबडला.. अशाच प्रकारचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा