भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी तथा नमो यांचे नेमके करायचे काय? काँग्रेस किंवा आता हळूहळू पुन्हा जुळू लागलेल्या तिसऱ्या आघाडीतील नेत्यांना हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तो प्रश्न भाजपमधील लालजी अडवाणींसारख्या नेत्यांना पडणेही नसगक आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तथा उठा यांनाही तो पडावा, हे फारच अताíकक आहे. म्हणजे उठा यांना प्रश्न पडत नसतात असे नाही. त्यांना खूपच प्रश्न पडतात. उदाहरणार्थ, रेसकोर्सच्या जमिनीचे काय करायचे? टाळी द्यायची की नाही? किंवा आपला हिंदुस्थानच्या विकासाचा आराखडा काय असेल? खरेतर उठा असे देशपातळीवर सहसा जात नसतात. परंतु परवा दिल्लीत असोचेमच्या परिषदेत त्यांना इंडिया मॅनिफेस्टो हा विषय देण्यात आला होता. उद्योगपतींची परिषद ती. शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत हे तिचे आयोजक. त्यामुळे तेथे जावेच लागले. तर िहदुस्थानचे नवे उद्योगधोरण कोणते असेल, आíथकनीती कशी असेल, हे उठांसारख्या जाणत्या वाघाच्या तोंडून देशातील उद्योगपतींनी ऐकावे व तृप्त व्हावे, म्हणूनच तर धूत यांनी उठांना सहकुटुंब सहपरिवार पाचारण केले. पण समस्या अशी की, उठांना नेमका मॅनिफेस्टोबाबतच प्रश्न पडला. त्यांच्या मनात बहुधा असे आले असावे की, आपण काय डोंबलं बोलणार येथे िहदुस्थानच्या विकासावर? तिकडे मुंबईचा मॅनिफेस्टो अजून नीट आखता आलेला नाही. परवा हेलिकॉप्टरातून पाहिले, तर मुंबई दिसेनाच. चालकास म्हणालो, अरे काय पॉटहोलात घालतोस की काय आम्हाला? तर तो म्हणाला, नाही, ही मुंबईच आहे. अर्थात त्यांनी हे तेथे बोलून नाही दाखवले. अशा वेळी ते नेहमी जे करतात, तेच केले. म्हणाले, मी कलाकार माणूस आहे. आणि मग दसरा मेळव्यातल्या भाषणाप्रमाणे आपल्या प्रखर राष्ट्रवादी विचारांचे सोने त्यांनी उद्योजकांवर उधळले. त्यामुळे अवघी दिल्ली चकित झाली. एवढी, की दुसऱ्या दिवशी मुखपत्रात बातमी आली की उद्धव ठाकरे यांनी दिल्ली जिंकली! शिवसेना हा रालोआतील उरल्यासुरल्या तीनतिघाडय़ा पक्षांतला एक महत्त्वाचा पक्ष असल्याने उठा यांच्या नमो यांच्याविषयीच्या मताबाबत पत्रकारांना खूपच उत्सुकता होती. पण उठांना प्रश्नच फार. हे नमो नेमके कोण आहेत? राजमित्र? गुजराती प्रांतवादी रॅम्बो? की िहदू राष्ट्रवादी? बरे ते अद्याप भाजपचेही उमेदवार नाहीत. तेव्हा ते म्हणाले की, पंतप्रधानपदासाठी अनेक विश्वासपात्र चेहरे रालोआमध्ये आहेत. वर पुन्हा त्यांनी त्यातून एक चेहरा निवडण्याची जबाबदारीही आपल्या शिरावर घेतली. राजनाथ सिंह यांच्याशी आपण त्याबाबत चर्चा करू, असे ते म्हणाले. तर त्यावर नतद्रष्ट पत्रकारांनी उलटाच अर्थ काढला आणि उठा यांनी तो अर्थ दुसऱ्या दिवशी सरळ केल्यावर पुन्हा हे नतद्रष्ट म्हणाले, उठा यांनी कोलांटउडी मारली. उठा यांच्यासमोर आता हा प्रश्न आहे की, असे का करतात हे लोक? वस्तुत: रालोआचा पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडण्याची जबाबदारी म्हणजे शिवधनुष्यच. ते आपल्या ११ खासदारांच्या दंडातील बेटकुळ्यांच्या जोरावर उचलण्याची जबाबदारी उठा यांनी आपल्या माथ्यावर घेतली आहे. नमोंचे काय करायचे, याचे उत्तर त्यांना आता शोधावे लागणार आहे. काय सांगावे, यातूनच ते उद्या राष्ट्रीय राजकारणातले मोठे नेतेच नव्हे, तर ‘राजा-कर्ते’ म्हणून पुढे येतील. हा केवढा मोठा बुद्धिबळाचा बैठा खेळ त्यांनी मांडला आहे. अशा वेळी उठा व त्यांच्या मुत्सद्देगिरीला सर्वानी शुभेच्छाच द्यायला हव्यात.

Story img Loader