दिल्लीत आपने प्रचारात आघाडी घेतली असतानाच भाजपने अलगदपणे केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारविरोधी भगिनी किरण बेदी यांना रणांगणात ओढले. या एका कृतीमुळे भाजपची लढाई ही सोपी झाली असून केजरीवाल यांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. काँग्रेस तर या निवडणुकीत असून नसल्यासारखा आहे.
राजकारणाच्या डावपेचात पाहुण्याच्या वहाणेने विंचू मारण्याची कला प्राप्त करून घेणे गरजेचे असते. ही कला अवगत नसल्यास काय होते हे अरिवद केजरीवाल यांच्यावरून लक्षात यावे. त्यांच्या एके काळच्या भ्रष्टाचारविरोधी भगिनी सुश्री किरण बेदी यांची पोलिसी वहाण ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपने पळवली असून तीद्वारे आप पक्षाचा विंचू मारण्याच्या प्रयत्नास तो पक्ष लागला आहे. यामुळे तीन व्यक्तींसाठी पुढील महिन्यात, ७ फेब्रुवारीस होऊ घातलेली दिल्ली विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. एक आम आदमी पक्षाचे अरिवद केजरीवाल, दुसऱ्या त्यांच्या एके काळच्या सहकारी आणि तूर्त भाजपवासी किरण बेदी आणि तिसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी.
२०१३च्या डिसेंबर महिन्यात जेव्हा प्रथम दिल्ली विधानसभा निवडणुका झाल्या त्या वेळी केजरीवाल यांच्यापेक्षा त्यांचा आप हा पक्ष मोठा होता आणि त्यास तसा मोठा करणाऱ्यांत किरण बेदी यांचा अंतर्भाव होता. हे दोघेही मुळात अण्णा हजारे यांचे चेले. नंतर स्वत:चे पुरेसे प्रतिमासंवर्धन झाल्याची खात्री झाल्यावर दोघांनी मिळून अण्णांना बाजूला केले आणि प्रसिद्धीचा झोत आपल्यावरच राहील याची व्यवस्था केली. भाबडा मध्यमवर्ग सुरुवातीच्या काळात या मंडळींच्या भ्रष्टाचारविरोधी चेहऱ्यास भलताच भाळला. त्यामुळे सुखवस्तू अशा मध्यमवर्गातून नवा मेणबत्ती संप्रदाय उदयास येऊन त्यास राजकारण राजकारण खेळण्याचा मोह झाला. आप या पक्षाचा जन्म हा त्या खेळातला. या आपने दिल्ली विधानसभेच्या गेल्या निवडणुकांत भलतीच बाजी मारली. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत या पक्षाला २८ जागा मिळाल्या तर भाजपला ३१. काँग्रेस ८ जागा मिळवून तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. तिघे अन्य पक्षीय आले. परिणामी कोणालाही सत्ता स्थापता आली नाही. आपच्या मते भाजप आणि काँग्रेस हे दोघेही भ्रष्टाचारी. तेव्हा त्यांची मदत कशी घेणार? या पक्षाचा आम्हीच तेवढे स्वच्छ हा दंभ इतका तीव्र की त्यामुळे सत्तेच्या जवळ जाऊनही या दंभापोटी त्यांना कोणाशीही हातमिळवणी करता आली नाही. असे दंभधारी पोकळ असतात हा इतिहास आहे. तो बदलण्याइतके काही केजरीवाल सक्षम नाहीत. त्यामुळे या मंडळींनी काँग्रेसने बाहेरून दिलेला पािठबा घेतला आणि आपले सरकार स्थापन केले. ते टिकणे शक्यच नव्हते. आपल्या चक्रमपणास साजेशा वर्तणुकीने केजरीवाल यांनी ते पडेल अशीच व्यवस्था केली आणि आपण म्हणजे कोणी त्यागमूर्ती असल्याचा आव आणत राजीनामा दिला. त्यामुळे या विधानसभेसाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागत असून तीत केजरीवाल यांची कसोटी लागणार आहे. गेल्या वेळी असलेली आपची हवा आता या वेळी नाही. तरीही गेल्या काही दिवसांत केजरीवाल यांनी प्रचाराचा धडाका लावत मोठी आघाडी घेतली. सुरुवातीचे सर्वेक्षणाचे निष्कर्ष तसेच आहेत. ही आघाडी त्यांना घेता आली त्याची कारणे प्रामुख्याने दोन. एक म्हणजे दिल्ली आणि परिसरातील नागरिकांतील एका गटास केजरीवाल यांना आणखी एक संधी द्यायला हवी, असे प्रामाणिकपणे वाटते. राजकारणाच्या खेळातील नवथरपणामुळे सत्ता त्यांच्या हातून गेली. बनेल, तयारीच्या राजकीय पक्षांनी त्यांना अडकवले. तेव्हा एकदा त्यांना सत्ता देऊन पाहायला काय हरकत आहे, असे मानणारा मोठा वर्ग दिल्लीत आहे. आणि त्या वर्गास तसे वाटण्यास भाग पाडणारे दुसरे कारण म्हणजे भाजपकडे असलेला स्थानिक नेतृत्वाचा अभाव. हर्ष वर्धन केंद्रात मंत्री झाल्यावर भाजपकडे दिल्लीसाठी चेहरा नाही. तसा तो तयार व्हावा असा प्रयत्न भाजपने कधी केला नाही. आताही नरेंद्र मोदी येतील आणि आपल्याला सत्ता मिळवून देतील, असाच त्या पक्षाचा आविर्भाव आहे. काँग्रेसजनांस ज्याप्रमाणे कोणी तरी गांधी येईल आणि आपला उद्धार करेल असे वाटत असते, तसेच आता भाजपवासीयांनाही वाटू लागले असून दिल्लीत त्याची प्रचीती येत आहे. अशा वेळी भाजपच्या या चेहराशून्यतेचा योग्य फायदा केजरीवाल यांनी उचलला आणि प्रचारात आघाडी घेतली. त्यामुळे दिल्ली निवडणूक ही आपची निवडणूक होते की काय, असे चित्र निर्माण झाले.
नेमक्या याच वेळी भाजपने अलगदपणे केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारविरोधी भगिनी किरण बेदी यांना रणांगणात ओढले. या एका कृतीमुळे भाजपची लढाई ही सोपी झाली असून त्यामुळे केजरीवाल यांची डोकेदुखी वाढणार आहे. कारण या बेदीबाई केजरीवालांइतक्याच आक्रस्ताळ्या आणि भंपक आहेत. कमालीची आत्मकेंद्रितता हा स्वत:स स्वच्छ म्हणवून घेणाऱ्यांचा दुर्गुण बेदीबाईंतही ओतप्रोत दिसतो. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात राळेगणचे बाबा उपोषणासनात असताना समोर जमलेल्यांचे मनोरंजन करण्याची जबाबदारी बेदीबाई उत्साहात पार पाडत. दोन्ही हातांनी तिरंगा फडकावत फिल्मी प्रचारढंगात राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारी त्यांची प्रतिमा अजूनही अनेकांना स्मरत असेल. त्यांच्या त्या दिव्य कृतीने भ्रष्टाचार किती संपला ते कळावयास मार्ग नाही. परंतु तत्कालीन मनमोहन सिंग सरकार मात्र संपले. तेव्हा या आपल्या यशात या भ्रष्टाचारविरोधी मंडळींनी केलेल्या वातावरणनिर्मितीचा मोठा वाटा आहे याची जाणीव भाजपस असल्याने त्या कृतज्ञतेची परतफेड करण्याची संधी तो पक्ष शोधत होताच. ती अरिवद केजरीवाल यांनी सहजपणे समोर आणून दिली. दरम्यान, आपल्या आंदोलनाने भ्रष्टाचार खरोखरच मिटला तर त्याचे श्रेय नक्की कोणाला हे स्पष्ट झाले नसल्याने आणि ते कदाचित केजरीवाल यांच्या ताटात जाण्याची अधिक शक्यता असल्याने बेदीबाई नाही तरी केजरीवाल यांच्यापासून दूर गेल्या होत्याच. त्यानंतर मोदी यांचे गोडवे गायला सुरुवात करून आपल्याकडे लक्ष जाईल अशी व्यवस्था बेदीबाईंनी केली होती. इतके दिवस त्यांच्या आरत्यांकडे मोदी यांनी ढुंकून पाहिले नाही. कारण त्यांना गरज नव्हती. परंतु दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने या बाईंना केजरीवाल यांच्यावर सोडल्यास आपले काम हलके होईल असा रास्त विचार मोदी आणि कंपूने केला आणि बेदीबाईंना अलगद आपल्या जाळ्यात ओढले. आता केजरीवाल यांच्याविरोधात हवा तापवण्याची जबाबदारी प्राधान्याने बेदीबाईंवर येणार आहे आणि त्या ती उत्साहात पार पाडतील यात शंका नाही. कारण केजरीवाल यांना रोखणे ही आता मोदी यांच्यापेक्षा बेदीबाईंची डोकेदुखी ठरेल. त्यांच्यासमोर मुख्यमंत्रिपदाचे गाजर आहेच. ते दाखवणारे मोदी यांच्यासाठीदेखील त्याचमुळे ही निवडणूक महत्त्वाची ठरेल. या निवडणुकीत अच्छे दिनाचा मोहपाश अजूनही मतदारांच्या मनावर आहे किंवा काय, हे तर यातून दिसून येईलच. परंतु त्याचबरोबर बेदी यांच्या निमित्ताने पक्षाच्या डोक्यावरून राजकारण हाकण्याचा त्यांचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो, तेही कळेल. यशस्वी ठरले तर अर्थातच मोदी यांच्या प्रतिमेचा आकार अधिकच मोठा होईल. पण तसे झाले नाही तर मात्र केजरीवाल यांचा भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा किरण हा भाजपने दत्तक घेतलेल्या किरण बेदी यांच्यापेक्षा अधिक प्रभावी ठरेल.
काँग्रेस पक्ष या निवडणुकीत असून नसल्यासारखा आहे. तेव्हा तिसऱ्या खेळाडूच्या अनुपस्थितीत होणारी ही निवडणूक पूर्णपणे बेदी आणि केजरीवाल अशी झाल्यास यातील दुसरी शक्यता खरी ठरण्याचा अधिक संभव दिसतो.

Story img Loader