नाहीतरी दहावीच्या निकालानंतर विज्ञान शाखेकडेच जायचे असे ठरवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असते. विज्ञानाकडे गेले की मग डॉक्टर, इंजिनीअर यांसारखी आईवडिलांची स्वप्ने पुरी करणे शक्य होते. दहावीच्या परीक्षेला यंदा बसलेल्या पंधरा लाख विद्यार्थ्यांपैकी ज्या साडेबारा लाख विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होता आले आहे, त्या सगळ्यांना आता विज्ञानाकडे जाण्याची सोय महाराष्ट्र शासनाने करून टाकली आहे. विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी दहावीच्या परीक्षेत किमान ४० टक्के गुण आवश्यक असल्याच्या नियमात बदल करून ही अट आता ३५ टक्क्य़ांपर्यंत आणली आहे. याचा अर्थ हे सगळेच्या सगळे विद्यार्थी विज्ञानाकडे जाऊ शकतात. याशिवाय दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपुस्तकावर ‘वरचे वर्गात गेला आहे’ असा शेरा लिहायचेही शासनाने ठरवले आहे. अशा विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर वर्षांच्या अवधीत अनुत्तीर्ण विषयांची परीक्षा देणे बंधनकारक आहे. या वर्षीच्या निकालाच्या टक्केवारीत मागील वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. नेहमीप्रमाणेच मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. राज्यातील वीस हजार शाळांपैकी सुमारे पावणेतीन हजार शाळांमधील सर्वच्या सर्व मुले दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत. फक्त ८१ शाळांमधील सर्व मुले अनुत्तीर्ण झाली आहेत. शालेय शिक्षण खात्याला अभिमानास्पद वाटावी, अशी ही कामगिरी असून त्याला सर्वस्वी शासनाचीच धोरणे कारणीभूत असल्याचा डांगोरा आता पिटला जाईलच. जास्तीतजास्त मुले उत्तीर्ण होणे याला आपल्याकडे चांगला निकाल लागला असे म्हणतात. केवळ उत्तीर्ण होण्यानेही सारे काही साध्य होते, असा त्यामागील आपला दृष्टिकोन असतो. मुळात प्राथमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षण देण्यासाठी जी खटपट करायला हवी, त्याकडे आपण दुर्लक्ष करीत आलो आहोत. बालवाडी ते चौथी ही आयुष्यातली पाच वर्षे अतिशय महत्त्वाची असतात. त्या काळात मुलाची जी वाढ होत असते, त्यासाठी बौद्धिक पालनपोषण अतिशय गरजेचे असते. चौथी ते दहावी या इयत्तांमधील वाढता अभ्यास पेलण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये चौथीपर्यंतच्या काळात येणे आवश्यक असते. केवळ अभ्यासक्रमच नव्हे, तर व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठीही ही वर्षे फार उपयोगाची असतात. केवळ दहावी आणि बारावी एवढेच लक्ष्य ठेवून शिक्षणाकडे पाहण्याची सरकारी पद्धत बदलली, तर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल किती लागला यापेक्षाही कसा लागला याचा विचार करणे शक्य होईल. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीशिवाय अन्य अनेक क्षेत्रांत उत्तमोत्तम संधी असू शकतात. विज्ञानाच्या क्षेत्रातही मूलभूत संशोधनासाठी भारतात प्रचंड संधी आहेत. जगातले प्रगत देश मूलभूत विज्ञानाच्या संशोधनावर भर देत आले आहेत. आपल्याकडे अशा संशोधनासाठी शिष्यवृत्त्या देऊनही मुलांचा ओढा कमी असतो, कारण आपल्याला तापत्या तव्यावरची पोळी थेट खाण्यात रस असतो. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पालकांच्या इच्छाशक्तीचे ओझे असते. त्या पुऱ्या करण्यासाठी परीक्षार्थी बनण्याची त्यांची तयारी असते. परंतु असे उत्तरपत्रिका-केंद्रित ज्ञान नंतरच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी पुरेसे नसते, असे ‘नीट’च्या निकालावरून सिद्ध झालेलेच आहे. दहावीच्या परीक्षेचे महत्त्व कमी झाल्याची चर्चा अलीकडे होताना दिसते. वास्तविक, आयुष्यात कोणत्या मार्गाने जायचे, याचा निर्णय या परीक्षेच्या निकालावर अवलंबून असतो. त्यामुळे कला, वाणिज्य की विज्ञान याचा निर्णय घेण्यासाठी दहावीची परीक्षा मोलाचीच मानली पाहिजे. यंदाच्या निकालानंतर लातूर पॅटर्नचा प्रभाव कमी झाल्याचे दिसते आहे. याचा अर्थ एवढाच, की केवळ विशिष्ट पद्धतीने अभ्यास करून परीक्षा देण्यापेक्षा त्यामध्येही नवनव्या प्रयोगांची आवश्यकता असते.

Story img Loader