महेश सरलष्कर

दिल्लीत करोनाची तिसरी लाट आली असून पहिल्या दोन लाटांपेक्षा ती अधिक गंभीर असू शकेल. त्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रदूषण आणि सणासुदीला लोकांनी दाखवलेला निष्काळजीपणा. नवी लाट आटोक्यात आणण्यासाठी पूर्वीप्रमाणे या वेळीही केंद्र सरकारचा हस्तक्षेप असेल..

दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरात शनिवारी लक्ष्मीपूजनानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यासाठी तिथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्यांचे मंत्रिगणदेखील उपस्थित होते. केजरीवाल यांनी आवाहन केले होते की, दिल्ली सरकारबरोबर दिल्लीकरांनी लक्ष्मीपूजनात सहभागी व्हावे. दिवाळी असली तरी अन्य दिवसांमध्ये लोकांनी फटाके फोडून प्रदूषण वाढवू नये म्हणून हे आवाहन केले होते. त्याची गरजही होती, कारण दिल्लीतील प्रदूषणाने आणि करोनाच्या प्रादुर्भावाने आरोग्याची परिस्थिती घातक बनू लागलेली आहे. मात्र, लोकांनी मुख्यमंत्र्यांचे फारसे ऐकले नाही. त्यांनी कोणताही विचार न करता फटाके फोडले आणि प्रदूषण वाढवले. वास्तविक राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली आणि राजधानी परिसरात (एनसीआर) फटाक्यांवर पूर्ण बंदी घातलेली आहे. ज्या शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे असेल तिथे हरित फटाके उडवण्याची मुभा लवादाने दिली आहे. त्यामुळे खरे तर भारतातील बहुतांश शहरांमध्ये फटाके उडवायला परवानगी नाही. दिल्लीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक तर घातक या गटात आहे. त्यामुळे दिल्लीत हरित फटाकेही उडवता येत नाहीत. पण त्याची ऐन दिवाळीत लोकांनी तमा बाळगलेली दिसली नाही. लक्ष्मीपूजनाचा दिवस संपल्यावर रात्री बारानंतरही फटाक्यांचे आवाज येत राहिले.

हिवाळ्यात कुठल्याही शहरापेक्षा दिल्लीत तुलनेत जास्त प्रदूषण असते. दरवर्षी राजधानीतील प्रदूषणावरून वादविवाद होतात आणि न्यायालयीन लढाई लढली जाते. या वेळी केंद्र सरकारने अध्यादेश काढून नवी समिती नेमली आहे. ती प्रदूषणावर नियंत्रण ठेवणार आहे. या समितीच्या प्रयत्नांना जेव्हा यश मिळेल तेव्हा दिल्लीकर तिचे स्वागत करतील; पण आता तरी दिल्ली गुदमरलेली आहे! प्रदूषणामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढतो हे इटली आणि अमेरिका या दोन देशांमध्ये झालेल्या संशोधनातून स्पष्ट झालेले आहे. पीएम २.५ आकाराचे सूक्ष्म धूलिकण हवेत जितके जास्त तितकी हवेची गुणवत्ता वाईट आणि घातक ठरते. दिल्लीत पीएम (पार्टिक्युलेट मॅटर) २.५ चे प्रमाण सुमारे ३०० आहे, तर पीएम १० चे प्रमाण सुमारे ५०० आहे. हवेतील पीएम २.५ चे प्रमाण पाहिले की, दिल्ली किती प्रदूषित आहे हे लक्षात येते आणि प्रदूषणाचे गांभीर्य जाणवते. हे अत्यंत सूक्ष्म धूलिकण हिवाळ्यातील कोरडय़ा हवेत पसरतात, ते थेट फुप्फुसात शिरतात. त्यामुळे श्वसनाचे त्रास वाढतात. अस्थमासारखे गंभीर आजार कित्येक पटींनी बळावतात. करोनाचे विषाणूही थेट फुप्फुसावर आघात करत असल्याने पीएम २.५ मुळे वाढते प्रदूषण आणि करोनाची वाढती तीव्रता यांचा एकमेकांशी थेट संबंध असल्याचे तज्ज्ञ सातत्याने सांगत आहेत. इटलीमध्ये पीएम २.५ चे हवेतील प्रमाण ज्या भागांमध्ये जास्त होते, तिथे करोनाच्या रुग्णांची संख्याही वाढू लागल्याचे आढळले. हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून पीएम २.५ मुळे करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सुमारे आठ टक्क्यांनी वाढल्याचे आढळून आले. या संशोधनाच्या आधारे दिल्लीतील परिस्थितीचा अंदाज घेता येऊ शकेल.

दिल्लीत करोनाची तिसरी लाट आली असल्याचे दिल्ली सरकारने मान्य केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये करोना रुग्णांची दैनंदिन वाढ साडेसात हजारांच्या घरात राहिली आहे. गेल्या बुधवारी एका दिवसात साडेआठ हजार रुग्णांची भर पडली होती. प्रतिदिन मृत्यूही शंभरहून जास्त झाले आहेत. सणासुदीमुळे दैनंदिन रुग्णवाढ १५ हजारांपर्यंतही जाऊ शकते, असे करोनासंदर्भातील तज्ज्ञ गटातील सदस्यांचे म्हणणे होते. त्यांची भीती खरी ठरेल अशी परिस्थिती दिल्लीत पाहायला मिळते. दिल्लीत दररोज सुमारे ४० हजार जलद प्रतिद्रव नमुना चाचण्या, तर सुमारे १९ हजार आरटी-पीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. अधिकाधिक चाचण्या केल्या जात असल्याने रुग्णांची संख्याही वाढलेली दिसत असल्याचे दिल्ली सरकारचे म्हणणे आहे. शनिवारी दिवसभरात २१ हजार नमुना चाचण्या झाल्या आणि रुग्णवाढही ३,२३५ इतकी झाली. चाचण्याही निम्म्या झाल्या आणि रुग्णांची वाढही निम्मी दिसली. गेल्या काही दिवसांमध्ये संसर्ग दर सुमारे १४ टक्के राहिला आहे. केंद्र व राज्य सरकार लोकांना सातत्याने करोनासंदर्भातील नियमांचे पालन करा, गरज असेल तरच घराबाहेर जा, आपल्यामुळे लोकांना करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घ्या, असे सांगत आहेत. पण त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन करूनदेखील लोक ऐकत नाहीत असे पाहायला मिळाले आहे. सणासुदीचे दिवस असल्याने देशातील इतर शहरांप्रमाणे दिल्लीतील बाजारपेठा तुडुंब भरून वाहत आहेत. तिथे नियमाचे पालन केले जात नाही. बाजारात विशिष्ट शारीरिक अंतर राखून खरेदी करता येत नाही, अनेकांना मुखपट्टी घालण्याचा त्रास होतो. काहींना वाटते की, करोना संपुष्टात आलेला आहे. काहींना वाटते की, त्यांची तब्येत इतकी ठणठणीत आहे की त्यांना करोना होण्याची शक्यता नाही. लोकांमधील हा निष्काळजीपणा कोणतेही सरकार दूर करू शकत नाही. दिल्ली सरकारलाही त्यात यश मिळालेले नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पत्रकार परिषदा घेऊन ‘मन की बात’ करत असतात. त्यातून त्यांनी लोकांना करोनाचे गांभीर्य समजावून सांगण्याचा प्रयत्न करून झाला. दिल्लीत बाजार, रेस्तराँ, चित्रपटगृहे खुली झाली आहेत. सर्व मार्गावरून मेट्रो धावू लागली आहे. बस पूर्ण क्षमतेने चालवल्या जात आहेत. सभा-समारंभांना दोनशे लोकांच्या उपस्थितीला मुभा देण्यात आलेली आहे. दिल्ली सरकारने टाळेबंदीचे शिथिलीकरण केले असल्यानेही करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.

दिल्लीत पहिली लाट जून-जुलैमध्ये आली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये करोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढले होते. साथरोगाच्या सुरुवातीच्या काळात दिल्लीत पुरेशा आरोग्यसुविधा उपलब्ध नव्हत्या, पण सहा महिन्यांच्या कालावधीत त्यात सुधारणा झाली असल्याचे दिसले. तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली तरी उपचार क्षमता असल्याचा दावा दिल्ली सरकारने केला आहे. ‘दिल्ली करोना’ या सरकारी अ‍ॅपवर- किती खाटा उपलब्ध आहेत, याची अद्ययावत माहिती मिळते. त्यानुसार करोना रुग्णांसाठी १६,६५४ खाटा असून त्यांपैकी ७,८९३ उपलब्ध आहेत. त्यातही अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसनयंत्र असलेल्या १६५, तर कृत्रिम श्वसनयंत्र नसलेल्या २६२ खाटा उपलब्ध आहेत. अतिदक्षता विभागांतील ८० टक्के खाटा भरलेल्या आहेत. घातक प्रदूषणामुळे करोनाचे गंभीर स्वरूपाचे रुग्ण वाढण्याचा धोका असल्याने दिल्ली सरकारला उपचार सुविधा पुरवण्याबाबत सतर्क राहावे लागणार आहे.

दिल्लीतील करोना आणि प्रदूषणाची गंभीर होत जाणारी परिस्थिती लक्षात घेऊन केंद्राने पुन्हा हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी करोना आटोक्यात आणण्यासाठी बैठक बोलावली होती, तशी ती या वेळीही घेण्याची वेळ आली. पहिल्यांदा केंद्र सरकारने हस्तक्षेप केला तेव्हा आरोग्यसेवा केंद्रे, नमुना चाचण्यांसाठी प्रयोगशाळा, सरकारी रुग्णालयांमधील व्यवस्था या सर्वाची कमतरता जाणवत होती. या वेळीही गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता विभागांमध्ये खाटा उपलब्ध असणे हे मोठे आव्हान असेल. त्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारला तयारी करावी लागणार आहे. खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा करोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशी मागणी दिल्ली सरकारने केली होती. तिला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती, पण आता ती उठवण्यात आली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील अतिरिक्त खाटा करोना रुग्णांना उपलब्ध असतील.

केंद्राच्या हस्तक्षेपाला पूर्वीही दिल्ली सरकारने आक्षेप घेतलेला नव्हता, आताही घेतला जाणार नाही. दिल्लीतील तिसरी लाट आटोक्यात आणल्याचे सगळे श्रेय पूर्वीप्रमाणे या वेळीही केंद्र सरकारला जाईल. त्याचा भाजपकडून कदाचित गवगवा केला जाईल, त्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आक्षेप नसेल. केंद्र व राज्य यांच्या संयुक्त प्रयत्नांतून तिसऱ्या लाटेवर मात केल्याचा आनंद कदाचित साजरा केला जाईल. पण दोन दिवसांत दिवाळीचे वातावरण संपल्यावर करोनाचे आव्हान परतवून लावण्यासाठी सज्ज व्हावे लागेल.

mahesh.sarlashkar@expressindia.com

Story img Loader