मागील संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू होते. त्या दिवशी एका वृत्तवाहिनीने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींच्या बोफोर्समधील सहभागाचे नवे पुरावे उघड केले होते आणि स्वाभाविकपणे भाजप संसदेमध्ये बोफोर्सचे भूत पुन्हा उकरून काढणार होती. ते ओळखून लोकसभा चालू होताच काँग्रेस सदस्यांनी गोरक्षकांचा धुडगूस आणि जमावाकडूनच्या हत्यांच्या मुद्दय़ावरून गदारोळ घालायला सुरुवात केली. गोंधळ थोडा कमी झाल्याचे पाहून भाजपच्या निशिकांत दुबेंनी अपेक्षेप्रमाणे बोफोर्सचा मुद्दा काढलाच आणि भाजप सदस्य तावातावाने बोलू लागले. काँग्रेसचा आवाज एकदमच क्षीण झाला. तोपर्यंत पहिल्या रांगेत बसलेल्या सोनिया गांधी शांत होत्या. पण बोफोर्सचा मुद्दा निघताच त्यांच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता वाढू लागली. बोफोर्सचा मुद्दा निघूनही काँग्रेस खासदार सभागृह बंद पाडत नसल्याचे पाहून त्या संतापल्या आणि ‘‘कामकाज कसं काय चालू राहिलंय? तुम्ही काय करताय?’’ असा प्रश्न त्या काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगेंना विचारू लागल्या. खरगेंनी जवळपास असहायता दाखविताच त्या उपनेते ज्योतिरादित्य शिंदेंकडे वळाल्या आणि त्यांनी हातानेच त्यांना कागदाचे तुकडे सभापतींच्या आसनावर फेकण्याचा आदेश दिला. लगेच खरगेंनी आपल्या पुढय़ातील कागदांचा ढीग बिहारच्या रंजिता रंजन यांच्या हातात दिला. मग त्यांनी त्याचे तुकडे सभापतींच्या दिशेने फेकणे सुरू केले. सुश्मिता देव, अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोईंनीही नंतर तसेच सुरू केले. सोनियांचा उद्देश साध्य झाला होता. बोफोर्सचे भूत पुन्हा बाटलीबंद झाले होते!
त्या दिवशीचे सोनियांचे सभागृहातील वर्तन तसे आश्चर्याचा धक्का देणारे होते. त्यांचे अस्वस्थ होणे, संतापणे, चिडणे आणि सभापतींवर कागदांचे तुकडे फेकण्याचे आदेश देण्यासारख्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी कदाचित विसंगत वाटू शकणाऱ्या बाबी त्या करीत होत्या. विसंगत यासाठी वाटत होते, की त्यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या विक्रमी १९ वर्षांमध्ये अस्वस्थतेचे, संतापाचे जाहीर वर्तन अपवादात्मकच पाहायला मिळालंय.
सोनियांना भारतीय ओळखतात सुमारे ५० वर्षांपासून. त्या थेट राजकारणात आहेत जवळपास १९ वर्षे आणि राजकारणातल्या पदार्पणाच्या पहिल्या दिवसापासून ते सरलेल्या शनिवापर्यंत त्या काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या. ‘गांधी’ आडनाव ही त्यांची सर्वात मोठी ताकद. नाही तर इटलीमध्ये जन्मलेल्या आणि ब्रिटनमध्ये शिक्षण घेतलेल्या परदेशी सोनियांना भारतासारख्या विशाल खंडप्राय देशावर हुकमत कधीच गाजविता आली नसती. पण ‘गांधी’ हे आडनाव त्यांचे एकमेव शक्तिकेंद्र नव्हतेच मुळी. गांधी आडनावामुळे प्रवेश सुकर झाला, जम बसविता आला, कुटुंबाची सत्ता पुनश्च प्रस्थापित करता आली; पण त्यासाठी गांधी आडनावासोबतच लागणारी कौशल्ये त्यांनी लीलया आत्मसात केली, त्यामध्ये कमालीचे प्रावीण्य मिळवले आणि भल्याभल्यांना न समजणाऱ्या काँग्रेस संस्कृतीचा अर्क इतक्या सहजपणे पचविला, ते पाहून अचंबित व्हायलाच लागेल. नेहरू-गांधी घराण्यातून आलेल्या त्या काँग्रेसच्या पाचव्या अध्यक्षा. मोतिलाल नेहरू, पं. नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या चार पूर्वसुरींना ज्या संकटांचा सामना करावा लागला नाही, त्या संशयाच्या संकटाला सोनियांना तोंड द्यावे लागले. त्यांच्या परकीयत्वाच्या मुद्दय़ावरून संशयाची काजळी पेरली जात होती. एरव्ही सुसंस्कृत असलेल्या सुषमा स्वराज यांनी सोनियांच्या परकीय मुद्दय़ावरून स्वत:चे मुंडन करण्याची दिलेली धमकी सर्वानाच आठवत असेल. भाजपबरोबरच शरद पवारांसारखी मंडळीही संशयनिर्मितीमध्ये तितकीच ‘अग्रेसर’ होती. पवारांनी तर बंड केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस जन्माला घातली. काँग्रेसच्या अन्य नेत्यांनाही सोनियांबद्दल कुठे खात्री होती? पण त्यांना ‘गांधी’ आडनावाचा टिळा हवा होता. राहुल आणि प्रियांका हे दोन ‘मूळ वारस’ मोठे होईपर्यंत त्यांना कुणी तरी ‘पार्टटाइम गांधी’ हवा होता. सोनिया ती जागा भरू शकत होत्या. कारण सोनियांच्या नावाने त्यांना स्वत:चेही राजकारण करायचेच होते ना. इंदिराजींची ‘गुंगी गुडिया’ म्हणून हेटाळणी करणाऱ्यांच्या सावलीत वाढलेल्यांना सोनियांना ‘मॅनेज’ करणे खूपच सोपे वाटत होते. अडचणी एवढय़ाच नव्हत्या. भाषेचा मोठा प्रश्न होता. रोमन लिपीत लिहिलेली हिंदी भाषणे त्या वाचून दाखवायच्या. नेत्यांबरोबर धड संवाद साधता येत नसे. मग भाजप आणि समाजवादी ढुढ्ढाचार्य ‘रीडर नॉट लीडर’ अशी त्यांची हेटाळणी करायचे. या सगळ्यामध्ये ‘इंदिराजींची बहू’ एवढेच काय ते त्यांचे मर्यादित भांडवल.
२०१४ नंतर काँग्रेसवर अस्तित्वाचे प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचे मानले जाते; पण पहिले प्रश्नचिन्ह तर १९९६ ते १९९८ दरम्यान उभे राहिले होते. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांचे बदनाम सरकार, सीताराम केसरीसारख्या व्यक्तीने पक्षावर मिळविलेला कब्जा आणि पक्षाला एकत्रित बांधून ठेवणाऱ्या गांधी आडनावाची तीव्र पोकळी यामुळे पक्षाचे भवितव्य झाकोळलेले होते. अशा स्थितीत सोनियांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतली. राजकारणातले अनेक छक्केपंजे समजण्यासाठी वेळ द्यावा लागणार होता. नेमके तेच झाले. १९९८ मध्ये वाजपेयींचे सरकार पडल्यानंतर सोनियांनी राजकीय आयुष्यातील पहिली महाचूक केली होती. मार्क्सवादी चाणक्य हरकिशनसिंह सुरजित आणि मुलायमसिंह यांच्या शब्दांवर भरवसा ठेवून त्या तत्कालीन राष्ट्रपती आर. के. नारायणन यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा दाखल करण्यास गेल्या. ‘मला २७२ खासदारांचा पाठिंबा आहे आणि अजूनही पाठिंब्याची भर पडत आहे,’ असे त्यांनी राष्ट्रपतींना सांगितले; पण लगेचच मुलायमसिंहांनी पलटी मारली आणि सोनिया तोंडघशी पडल्या. भारतीय राजकारणातल्या धोबीपछाडचा त्यांचा हा पहिला अनुभव होता. १९९९ मध्ये निवडणुका झाल्या आणि अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे संख्याबळ आणखी घटले. वाजपेयी पुन्हा पुरेशा संख्येने स्थानापन्न झाले. मग सोनिया विरोधी पक्षनेत्या झाल्या. वाजपेयी सरकारच्या अनेक चुकांनी सोनियांना आणखीनच बळ मिळत गेले. आणि पाहता पाहता भाजपला जबरदस्त झटका देत त्यांनी केंद्रात २००४ आणि २००९ मध्ये सत्ता मिळविली. अनेक राज्यांमध्येही काँग्रेस सत्तेत परतली.
‘मूळ’च्या गांधी अथवा नेहरू नसतानाही सलग दहा वर्षे देशाची सूत्रे हाती ठेवणाऱ्या सोनियांच्या भारतीयांसमोर अनेक प्रतिमा आहेत. इंदिराजींची लाडकी सून, इंदिराजींच्या पार्थिवासमोरच हंबरडा फोडून राजीवजींना राजकारणापासून दूर राहण्याची विनवण्या करणाऱ्या सोनिया, चौकडीच्या सांगण्यावरून नरसिंह राव यांच्याविरुद्ध पडद्यामागून काडय़ा करणाऱ्या सोनिया, सीताराम केसरींची अतिशय वाईट पद्धतीने अध्यक्षपदावरून गच्छंती करणाऱ्या सोनिया, संशयाचे धुके झुगारून राजकारणात प्रवेश करणाऱ्या, परकीय जन्माच्या मुद्दय़ावरून १९९९ मध्ये पवारांच्या बंडाला सामोरे जाणाऱ्या, २००४ मध्ये आश्चर्यकारकरीत्या सत्ता मिळवणाऱ्या; पण संशयाचे वातावरण लक्षात घेऊन ‘अंतरात्म्याचा आवाज’ ऐकून पंतप्रधानपदाचा त्याग करणाऱ्या, ‘द अॅक्सिडेंटल पीएम’बरोबर एकाच वेळी कौटुंबिक ज्येष्ठासारखे, कार्यकारी आणि कायम दबावाखाली ठेवणारे संबंध ठेवणाऱ्या सोनिया, राष्ट्रीय सल्लागार समितीमार्फत ‘सुपर पीएम’ बनणाऱ्या; पण त्याच वेळी रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार, शिक्षण हक्क कायदा अशा दीर्घकालीन सामाजिक संरक्षणाचे कायदे करणाऱ्या, ‘राहुल का नाही?’ असा उलट सवाल करीत वारसदार म्हणून प्रियांकांना पुढे आणण्यास तयार नसलेल्या आणि २०१४च्या लाजिरवाण्या पराभवानंतर पक्षाची सूत्रे हळूहळू राहुल यांच्याकडे सोपवून शांतपणे पडद्यामागे जाणाऱ्या सोनिया.. अशा किती तरी त्यांच्या प्रतिमा भारतीयांच्या मनात रुजल्या आहेत. पण या पलीकडे त्यांचा एक अमीट ठसा उमटला आहे. त्याचे नाव शालीनता! सोनियांच्या प्रदीर्घ कारकीर्दीच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना संशयाच्या जीवघेण्या वेदनेला तोंड द्यावे लागले; पण त्यांची शालीनता बिलकूल संशयातीत होती! वर उल्लेख केलेला एखाददुसरा अपवाद वगळता अनेक आव्हानांच्या, संकटांच्या आणि अपमानांच्या प्रसंगांमध्येही उठून दिसली ती शालीनता आणि सभ्यता. कदाचित युरोपीय आणि भारतीय संस्कृतीच्या संकरातून फुललेली त्यांच्या मोहक शालीनतेची भारतीयांना भुरळ पडली असेल. त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या सर्वाना त्याचा अनुभव नक्कीच आला असेल.
बाकी राहते ते त्यांचे राजकीय मूल्यमापन. मरणासन्न काँग्रेसमध्ये फुंकलेले प्राण ही त्यांची सर्वोच्च कामगिरी. भारतीय मातीत जन्म न घेता भारतीयांचा विश्वास जिंकत देशावर सलग दहा वर्षांसाठी हुकमत गाजवणे सोपी बाब नाही. पथ आणि पदभ्रष्ट झालेल्या काँग्रेसजनांना सोनियाचे दिन त्यांनी दाखविले. पण त्याच वेळी त्यांना काँग्रेस संस्कृतीमध्ये अंतर्बाह्य़ बदल करता आले नाहीत, काँग्रेसला काळसुसंगत बनविता आले नाही, पंतप्रधानपदाच्या अवमूल्यनाला हातभार लावण्यापासून दूर राहता आले नाही.. त्यामुळेच त्यांनी ज्या बिकट परिस्थितीमध्ये पक्षाची सूत्रे हाती घेतली, तेवढय़ाच किंबहुना त्यापेक्षा अधिक बिकट परिस्थितीमध्ये पक्ष सध्या उभा आहे. पुढे नरेंद्र मोदींसारखे आव्हान आहे. नव्या भारताला घराणेशाहीचा मनस्वी तिटकारा आहे. एकामागून एक राज्ये हातातून निसटली आहेत. काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई पुन्हा एकदा हातघाईवर आलीय. एका अर्थाने वर्तुळ पूर्ण झालंय. जिथून सोनियांनी सुरुवात केली होती, तिथूनच राहुलना प्रारंभ करावा लागतोय.
या बेरीज-वजाबाकीचा ‘लसावि’ काढला तर वर्तमानकालीन भारताच्या इतिहासामध्ये सोनियांना मानाचे पान असेल, हे नक्की. त्यांचा ठसा, चांगला किंवा वाईट, कदापि पुसता येणारा नाही..
संतोष कुलकर्णी
santosh.kulkarni@expressindia.com