महेश सरलष्कर
चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनण्यासाठीची पटकथा नितीशकुमार यांनी लिहून ठेवली होती खरी; पण भाजपने खोडा घातल्यामुळे त्यांना ती नव्याने लिहावी लागली असून त्यात मुख्य भूमिका कोणाला मिळणार हे सांगणे आता कठीण ठरले आहे..
यंदाच्या बिहार निवडणुकीची कथा, पटकथा, अगदी संवाददेखील लिहून झालेले होते. खरे तर दर पाच वर्षांनी तीच कथा लिहिली जात होती. दरवेळी मुख्यमंत्रिपद नितीशकुमार यांनाच मिळत होते. या वेळीही नितीशकुमार यांनी फक्त चित्रपट बनवायचा बाकी ठेवलेला होता. तो बनवणे केंद्रीय निवडणूक आयोगावर अवलंबून होते. त्यांनी हिरवा कंदील दिला की, चित्रीकरण सुरू होणार होते. त्याआधी चित्रपटनिर्मितीची तयारी केली जात होती. नितीशकुमार यांना चौथ्यांदा मुख्यमंत्रिपद हवे होते. त्यासाठी त्यांनी लालूप्रसाद यांच्या बदनाम काळाची मदत घेतलेली होती. पुन्हा यादवांचा काळ सुरू होईल त्यापेक्षा मला मुख्यमंत्री बनवा, बिहारमध्ये पुढील पाच वर्षांमध्ये विकास केला जाईल, अशी कथा नितीशकुमार यांनी रचलेली होती. पण ऐन वेळी भाजपने खोडा घातला आणि तोही इतका उघडपणे की त्या धक्क्यातून सावरायचे कसे, हेच नितीशकुमार यांना उमगलेले नाही. विधानसभा निवडणुकीनंतर ते मुख्यमंत्री होणारच नाहीत असे नाही. पण या निवडणुकीत सर्वाधिक राजकीय नुकसान कदाचित नितीशकुमार यांचेच झालेले असू शकेल.
आपण लिहिलेल्या कथेला छेद देणारी कथा अमित शहा लिहितील याची कल्पना नितीशकुमार यांना आली नसावी. अचानक धक्का देण्याचे मोदी-शहा यांचे तंत्र बिहारमध्ये यंदा वापरले गेले. भाजप आणि जनता दल (संयुक्त) यांची जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्याआधीच लोकजनशक्तीचे कार्यकारी प्रमुख चिराग पासवान यांनी बिहारमध्ये भाजप-लोकजनशक्तीचे सरकार येईल असे भाकीत करून टाकले. भाजपने पाठीत खंजीर खुपसल्याचा नितीशकुमार यांना इतका राग आला की त्यांनी दुपारी एक वाजता ठरलेल्या पत्रकार परिषदेला यायला नकार दिला. मग चारची वेळ ठरली. अखेर पाच वाजता पत्रकार परिषदेला यायला नितीशकुमार तयार झाले. अमित शहांच्या विश्वासातील लोकांकडून नितीशकुमार यांची समजूत काढली गेली. भाजपला नाइलाजाने का होईना ‘लोकजनशक्ती’ला चाप लावण्याची भाषा करावी लागली. भाजपच्या नेत्यांची ‘बिहारमध्ये जे नितीशकुमार यांचे नेतृत्व स्वीकारतील तेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) राहतील’, ‘रामविलास पासवान यांनी लोकजनशक्तीला एनडीतून बाहेर पडू दिले नसते’, ‘पंतप्रधान मोदींचा फोटो लावून प्रचार करू दिला जाणार नाही’ अशी सर्व विधाने करून झाली. पण लोकजनशक्तीने पहिल्या टप्प्यात पाच-सात भाजपवाल्यांना उमेदवारी देऊन टाकली. लोकजनशक्ती भाजपविरोधात लढणार नसून फक्त जनता दलाविरोधात उमेदवार उभे करणार असल्याचीही घोषणा चिराग पासवान यांनी केली. शहा आणि पासवान यांनी लिहिलेली कथा अगदी दमदार निघाली.
नितीशकुमार यांना भाजपशी युती करूनच निवडणूक लढावी लागणार असली तरी आपली कोंडी झाली असल्याचे त्यांनी पुरेपूर ओळखलेले आहे. आता नितीशकुमार यांना आपल्या कथेत बदल करावे लागणार आहेत. लालूंच्या राज्यातील भय ही अत्यंत चपखल कथा होती. त्याला मतदारांनी कोणताही विचार न करता प्रतिसाद दिला असता. मध्यम जातींतील कुर्मीना बिहारमध्ये पुन्हा यादवराज नको आहे. ते नितीशकुमार यांच्याशी बांधले गेले आहेत. कुर्मी आणि अतिमागास दलित जाती हा नितीशकुमार यांचा मताधार. भाजपकडे सवर्ण जातींची मते होती. लोकजनशक्तीकडे पासवान होते. या समीकरणावर बिहारची निवडणूक जिंकणे सोपे होते. भाजप-जनता दल आघाडी पुन्हा सत्तेवर येईल असे मानलेही जात होते. पण आता नितीशकुमार यांनी कथेत स्वत:हून बदल करून भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचा लाभ कदाचित लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) होऊ शकतो. कुर्मी आणि अतिमागास दलित हे मतदार किती साथ देतात यावर हे गणित अवलंबून असेल. जनता दलाच्या उमेदवाराला लोकजनशक्ती आणि आरजेडी-काँग्रेसच्या महाआघाडीच्या उमेदवारांशी लढावे लागेल. लोकजनशक्तीचा उमेदवार कोणाची मते घेण्यासाठी रिंगणात उतरला असेल हे उघड आहे. पण जिथे भाजपचा उमेदवार असेल तिथे त्या उमेदवाराची लढाई थेट विरोधी महाआघाडीशी असेल. तिथे लोकजनशक्तीचा उमेदवार नसेल. नितीशकुमार यांच्या पक्षाच्या- संयुक्त जनता दलाच्या- मतदारांनी भाजपला मदत करायची नाही असे ठरवले तर भाजपसाठी संघर्ष वाढेल. लोकजनशक्ती जनता दलाच्या जागा कमी करण्याचे काम करणार असेल तर जनता दलाला त्याच पद्धतीने प्रत्त्युत्तर देता येईल का, हे पाहावे लागेल.
गेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल आणि आरजेडी एकत्र लढले होते. त्याचा फायदा आरजेडी आणि काँग्रेसला मिळालेला होता. या वेळी हे दोन्ही पक्ष किती लाभ मिळवून घेतात यावर बिहारच्या निकालानंतर सत्तेसाठी होणारा संघर्ष किती तीव्र असेल हे ठरेल. यंदा लालूप्रसाद यादव आरजेडीसाठी निवडणुकीचा प्रचार करणार नाहीत ही बाब पक्षासाठी फायद्याचीच मानली पाहिजे. लालूंच्या मार्गाने इतिहास उगाळण्याची संधी नितीशकुमार यांना मिळणार नाही. पक्षाची धुरा तेजस्वी यादव यांच्याकडे असल्याने नव्या नेतृत्वाची नवलाईही मतदारांना आकर्षित करणारी ठरू शकते. त्या नवलाईतून मुस्लीम-यादव समीकरणापलीकडे जाण्याचा मार्ग आरजेडीसाठी खुला होऊ शकतो. भाजपविरोधातील थेट लढतीमध्ये तो निकाल बदलवणाराही असू शकतो. तो काँग्रेससाठी राजपुतांची मते मिळवणाराही असू शकतो. सुशांतसिंह प्रकरण अखेरीस भाजप आणि जनता दलाला जड गेले! नितीशकुमार यांनी मूळ कथा लिहिली तेव्हा आरजेडी-काँग्रेस यांची भूमिका नगण्य होती. पण भाजपच्या ताज्या डावपेचांमुळे नितीशकुमार यांनी या दोन्ही पक्षांच्या भूमिकेची लांबी वाढवलेली आहे. त्यात छोटय़ा पक्षांच्या तिसऱ्या तसेच चौथ्या आघाडीचीही दखल घ्यावी लागली आहे. उपेंद्र कुशवाह यांच्याकडे कोईरी जातीचे समर्थन आहे. त्यांनी बहुजन समाज पक्षाशी आघाडी केली आहे. पप्पू यादव, चंद्रशेखर आझाद, असदुद्दीन ओवैसी यांचे पक्षही निवडणुकीत उतरले आहेत. मतदारसंघ, उमेदवार आणि जात यांच्या बरोबरीने भाजप-जनता दलाचा अंतर्गत संघर्ष यामुळे नितीशकुमार यांच्या मूळ कथेपेक्षा सुधारित कथानक अधिक रोचक-रंजक बनलेले आहे.
भाजपने नितीशकुमार यांना नामोहरम करताना प्रामुख्याने तीन गोष्टी केल्या. लोकजनशक्तीला एनडीएतून बाहेर पडायला लावून जागांचे समसमान वाटप करून घेतले. जनता दलाच्या पदरात कमी जागा आल्या, छोटय़ा भावाला मोठय़ा भावाच्या बरोबरीने हिस्सेदारी मिळाली. मोठय़ा भावाचे महत्त्व इथेच कमी झाले. लोकजनशक्तीशी जनता दलाला सामना करायला लावून नितीशकुमार यांच्यासाठी लढत तिरंगी केली. लोकजनशक्तीतर्फे भाजपचे उमेदवार देऊन भाजपच्या जागा वाढतील याची परस्पर व्यवस्था करून टाकली. इथे कुठेही नितीशकुमार यांना भाजपवर पलटवार करायला जागा ठेवली नाही. निवडणूक प्रचारात चिराग पासवान यांचे प्रमुख काम नितीशकुमार यांच्या कारभारावर टीका करण्याचे असेल. खुंटलेला विकास, करोनाच्या हाताळणीतील चुका, स्थलांतरित मजुरांचा प्रश्न, बेरोजगारी असे नितीशकुमार यांच्या विरोधातील मुद्दे घेऊन चिराग पासवान शाब्दिक हल्ला करतील. त्यांना नितीशकुमार यांना उत्तर द्यावे लागेल. नितीशकुमार यांना बिहारमधील मतदारांच्या असंतोषाचा चेहरा ठरवले गेल्यामुळे भाजपचे होणारे नुकसान चिराग पासवान रोखून धरतील. निवडणूक निकालानंतर ‘भाजप-लोकजनशक्तीचे सरकार’ सत्तेवर येण्याची शक्यता फार कमी. पण भाजप-जनता दलाला सरकार बनवण्याइतक्या जागा मिळू शकल्या तर नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदी कायम ठेवून भाजप बिहारचे सरकार चालवू शकेल आणि पक्षाचा विस्तार करू शकेल. शिवसेनेने भाजपला काडीमोड देऊन स्वत:चे अस्तित्व टिकवले तशी संधी जनता दलाला भाजप मिळवून देईलच असे नाही. तरीदेखील संधी साधायची असेल तर नितीशकुमार यांना निकालानंतर नव्याने कथा लिहावी लागेल. या नव्या कथेत नितीशकुमार यांच्याबरोबरीने महाआघाडी मुख्य भूमिकेत असू शकेल. इथेही नितीशकुमार यांनाच राजकीय तडजोड करावी लागेल. गेल्या वेळी नितीशकुमार यांनी आरजेडीशी संबंध सोडून सत्तेचा स्वार्थ साधला होता. आताही हाच स्वार्थ साधला गेला तरी नितीशकुमार यांची ताकद मात्र कमी झालेली असेल. नितीशकुमार आणि राहुल गांधी यांचे संबंध वाईट नाहीत. लालूप्रसाद यांच्यापेक्षा नितीशकुमार हेच काँग्रेसला अधिक जवळचे होते. काँग्रेसने कधीही नितीशकुमार यांच्यावर टीका केलेली नाही. मुख्यमंत्री व्हायचेच असेल तर भाजपविरोधाचा धागा पकडूनही नितीशकुमारांना लक्ष्य गाठता येऊ शकते. इथे काँग्रेसची मध्यस्थी महत्त्वाचीही ठरू शकेल. नितीशकुमार यांनी कथा कशीही लिहिली तरी त्यांचे नुकसान होणार; पण भाजप मुख्य भूमिकेत राहणार की नाही हे नितीशकुमार कशी कथा लिहितात यावर अवलंबून असेल. बिहार विधानसभा निवडणुकीचा चित्रपट १० नोव्हेंबरला पडद्यावर आला की टाळ्या कोणासाठी वाजणार हे ठरेल!
mahesh.sarlashkar@expressindia.com