आकंठ राजकारणात अडकल्याने अरविंद केजरीवाल यांचा पाय दिवसेंदिवस आणखीनच खोलात रुतत चालला आहे. केंद्राबरोबरील त्यांच्या दररोजच्या कलगीतुऱ्याने दिल्लीकर बेचैन आहेतच.. पण आपल्याला मार्गभ्रष्ट करण्याचा भाजपचा सापळा ओळखून शांतपणे काम करण्याऐवजी केजरीवाल त्यामध्ये अडकत चालले आहेत. एकंदरीत दीड वर्षांतील त्यांची वाटचाल त्यांना आपच्या मूळ अजेंडय़ापासून दूर नेणारी आहे..

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या व्हॅटिकन सिटीमध्ये आहेत. मदर तेरेसा यांना संत म्हणून घोषित करण्याच्या कार्यक्रमामध्ये भारत सरकारचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून त्यांचा सहभाग आहे. मदर तेरेसा यांच्याशी केजरीवालांचे विशेष नाते. आयआयटी खरगपूरमधून पदवी घेतल्यानंतर भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) जाण्यापूर्वी त्यांनी टेरेसा यांच्यासमवेत ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’मध्ये सुमारे दोन वर्षे काम केले होते. त्यामुळे मदर तेरेसा संत म्हणून घोषित होत असताना व्हॅटिकनमध्ये असण्यामध्ये भावनिक बंध असला तरी त्यांचे सारे चित्त नक्कीच दिल्लीत असेल. कारण मागील आठवडा केजरीवाल, त्यांचे सरकार आणि आम आदमी पक्षाची दमछाक करणारा ठरला. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नाकावर टिच्चून अभूतपूर्व यश मिळविल्यानंतरच्या दीड वर्षांत केजरीवाल प्रथमच एवढे बॅकफूटवर गेले असावेत.

आठवडय़ाची सुरुवात झाली ती पावसाने उडालेल्या दिल्लीच्या दुर्दशेने. दर वेळी तशी ती उडतेच, पण या वेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी हे पावसात आणि त्यानंतर वाहतूक कोंडीत सापडल्याने भारतातच नव्हे, तर जगभरात वाभाडे निघाले. या दुर्दशेला एकटे केजरीवाल खचितच जबाबदार नाहीत. दिल्लीतील तीन महापालिका भाजपच्या ताब्यात आहेत आणि त्या कुशासनासाठी कुप्रसिद्ध आहेत, पण केजरीवालांवर अधिकची जबाबदारी आहे. त्यामुळे दिल्लीकरांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. दर वेळी ते प्रत्येक गोष्टीसाठी नरेंद्र मोदींना जबाबदार धरतात, पण या भंबेरीसाठी मोदींकडे बोट दाखविण्याचे धाडस काही त्यांना झाले नाही.

पावसाच्या तडाख्याने विश्वासार्हता वाहून जाण्यास सुरुवात झाली असतानाच माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूने दुसरा तडाखा लगावला. पुढील वर्षी निवडणूक होत असलेल्या पंजाबमध्ये ‘आप’साठी खूप अनुकूल वातावरण असल्याचे सर्वच जण मान्य करतात; अगदी भाजपवालेही. राज्यसभेची खासदारकी सिद्धूंनी सोडल्यानंतर तर त्यावर शिक्कामोर्तबच झाले होते. त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार लवकरच घोषित केले जाणार असल्याचे ‘आप’चे नेते माध्यमांना अनौपचारिकपणे सांगत होते, पण सिद्धूने अचानकच नव्या पक्षाची (आवाज-ए-पंजाब) घोषणा करून धक्का दिला. यातून ‘आप’बद्दलच्या हवेला टाचणी लागणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा शीख चेहरा शोधताना पुन्हा नाकीनऊ  येणार आहेत. त्यातच पंजाबइतकी फुटीची लागण ‘आप’ला अन्यत्र कोठेही झालेली नसेल. लोकसभेच्या तेरा उमेदवारांपैकी नऊ जणांनी (त्यात दोन खासदारही आहेत) पक्षाविरुद्ध बंड पुकारले आहे. एकूणच ‘गृहीत’ धरलेल्या पंजाबमधील यशावर अनिश्चितता घोंघावते आहे.

हे जणू कमी होते म्हणून दिल्लीचे मंत्री संदीपकुमार यांच्या लैंगिक क्रीडेचे ‘सीडीकांड’ उघडकीस आले आणि एकच भडका उडाला. ‘गंदी बात’ सहन न झाल्याने केजरीवालांनी त्यांची तातडीने हकालपट्टी केली, पण तोपर्यंत पक्षाची खूप हानी झाली. समर्थन करताना एवढी भंबेरी उडाली की सध्या अंथरुणाला खिळून पडलेल्या अटलबिहारी वाजपेयींच्या ब्रह्मचारीपणाचा मुद्दा उगाळण्याचा आचरट प्रकार केला गेला. केजरीवालांनी नंतर मोदींचे ‘स्नूपगेट’ उकरले. ‘बंगळुरूच्या त्या मुलीबद्दल जरा मोदींना विचारा.. त्या मुलीवर पाळत का ठेवली होती, हे शहांना विचारा..’, असे त्यांचे हुकमी शस्त्र होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी बंगळुरूच्या मुलीचा मुद्दा काँग्रेसने खणला होता. मनमोहन सिंग सरकारने चौकशी समितीही स्थापन केली होती. पुढे त्या मुलीच्या गुजरातमधील पित्याने, मीच पाळत ठेवण्याची विनंती केली होती, असे लिहून दिल्याच्या बातम्या आल्यावर ते प्रकरण थंडावले आहे. त्यानंतर क्रमांक राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष यांचा होता. राज्यसभा खुणावत असणारे ते माजी पत्रकार. त्यांनी तर महात्मा गांधी, पं. नेहरू यांच्यापासून वाजपेयींपर्यंत अनेकांच्या चारित्र्याचा जाहीर उद्धार केला. म्हटला तर त्यांचा मुद्दा बिनचूक होता. ‘संदीपकुमारांनी बलात्कार किंवा लैंगिक शोषण केले आहे का? जर तशी तक्रार नसेल आणि दोघांच्या संमतीने बंद खोलीत कृत्य झाले तर तो त्यांचा खासगीपणा नव्हे काय?’ हा तो मुद्दा. त्या क्षणापर्यंत तो योग्य होता. कारण त्या महिलेने लगेच बलात्काराचा गुन्हा नोंदविला.

दिल्लीकरांमध्ये केजरीवाल आजही लोकप्रिय आहेत; पण सरकारला ओहोटी लागल्याचे दिसते आहे. असे का घडते आहे? केजरीवालांना मोदी सरकार सहकार्य करणार नसल्याचे उघडच होते. त्यातून दिल्ली हे काही पूर्ण दर्जाचे राज्य सरकार नाही. पोलीस, जमीन आणि नोकरशाही हे केंद्राच्या अखत्यारीत असतात. तसा कायदा आहे आणि दिल्ली उच्च न्यायालयाने तो स्पष्टपणे अधोरेखित केला आहे. मात्र, केजरीवाल त्यावरून पहिल्या दिवसापासून आक्रस्ताळी भूमिका घेत आहेत. सुरुवातीला त्यांनी नायब राज्यपाल जंग यांना डावलले. आता जंग यांनी केजरीवालांचे निर्णय बदलण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून सुरू असलेल्या कलगीतुऱ्याने दिल्लीकर अस्वस्थ आहेत. दररोज केजरीवालांचा कंपू मोदी आणि जंग यांच्या नावाने खडे फोडत असतो. जंग यांच्याआडून हल्ला करणारे मोदी सरकार काही साळसूद नाही. केजरीवालांना मार्गभ्रष्ट करण्याची एकही संधी ते सोडत नसतात. हा सापळा ओळखून शांतपणे काम करण्याऐवजी केजरीवाल त्यामध्ये अडकत चालल्याचे निरीक्षण खरे ठरते आहे. त्यातही फक्त मोदींना शिव्या घालणे एवढाच अजेंडा असल्याची प्रतिमा केजरीवालांनी करून घेतलेली आहे.

केजरीवालांमधील हुकूमशाही प्रवृत्ती बाहेर डोकावताना दिसते आहे. व्यक्तिस्तोमामुळे ‘आप’ ही चळवळ न उरता अन्य राजकीय पक्षांच्याच वळणावर जाते आहे. केजरीवाल, सिसोदिया, जैन, संजय सिंह, दुर्गेश पाठक, आशुतोष आदी मूठभर नेत्यांच्या हातातील ‘आप’ ही निवडणूक लढविणारी पक्ष संघटना झाली आहे. त्यांना अडविण्याचा प्रयत्न केलेल्या प्रा. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण या विचारी नेत्यांना अत्यंत निर्दयपणे बाहेरचा रस्ता दाखविला गेला. त्यातच केजरीवाल एक गंभीर चूक करीत आहेत. दैनंदिन शासन कारभार त्यांनी पूर्णपणे सिसोदियांवर सोडला आहे. स्वत:कडे एकही खाते घेतलेले नाही. दिल्ली सोडून इतरत्र लक्ष न देण्याचे अभिवचन शपथविधी सोहळ्यात जाहीरपणे देणाऱ्या केजरीवालांनी आपले सारे लक्ष पंजाब व गोव्यावर केंद्रित केले आहे. कारण राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देईनाशी झाली आहे. त्यातूनच मोदींना अतिटोकदारपणे लक्ष्य करण्यात त्यांचा मोठा वेळ चालला आहे. त्याचा राजकीय फायदा प्रारंभीच्या काळात मिळाला; पण आता त्यांची प्रतिमा नकारात्मकतेकडे झुकली आहे.

विरोधकांवर केलेले प्रयोगही आता त्यांच्या अंगलट येत आहेत. ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये ते इतरांना अडकवायचे. आता ‘आप’वर हेच प्रयोग विरोधक करीत आहेत. त्यांचे बारा-तेरा आमदार या ना त्या कारणाने तुरुंगात आहेत किंवा तुरुंगात जाऊन आले आहेत. आणखी काही ‘रांगेत’ आहेत. तीन मंत्र्यांची हकालपट्टी करावी लागलेली आहे. याशिवाय २१ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. आकंठ राजकारणात रुतल्याने त्यांचा पाय आणखीच खोलात रुतत चालला आहे. हे सगळे त्यांना ‘आप’च्या मूळ अजेंडय़ापासून दूर नेणारे आहे. दिल्लीकरांनी त्यांना अभूतपूर्व संधी दिली. काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची चिन्हे धूसर वाटल्याने भाजपविरोधी मतपेढीला पर्याय हवाच आहे. त्या दृष्टिकोनातून देशभरातील अनेक मंडळी केजरीवालांकडे आशा लावून बसली आहेत; पण ‘पाच साल.. केजरीवाल’ या घोषणेचा आतापर्यंतचा प्रवास तितकासा आशादायी नाही.

स्वत:मध्ये आणि एकूणच प्राधान्यक्रमामध्ये तातडीने दुरुस्तीची वेळ आल्याची जाणीव केजरीवालांसारख्या स्मार्ट राजकारण्याला नक्कीच झाली असेल. अभूतपूर्व जनादेशाचा अर्थ व जबाबदारी समजून घेण्यात शहाणपण आहे.. नाही तर राजकीय करंटेपणाच्या यादीत भ्रमनिरास करणाऱ्या आणखी एकाची भर पडायची!

 

– संतोष कुलकर्णी

santosh.kulkarni@expressindia.com

Story img Loader