|| महेश सरलष्कर
संसदेत एखाद-दोन काँग्रेस नेत्यांचे प्रखर बोल भाजप नेत्यांच्या जिव्हारी का लागले असावेत? लोकसभेत ‘३०३ जागां’चे प्रचंड बहुमत असूनही टीका सहन न व्हावी इतके सत्ताधारी असुरक्षित झाले का?
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात विरोधकांनी फारसा सभात्याग केला नाही, गोंधळ घालून सभागृहे तहकूब केली नाहीत, त्यामुळे दोन्ही सदनांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर तसेच अर्थसंकल्पावर नीट चर्चा केली गेली. सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी विरोधकांनी सभात्याग करणे सोडून दिले पाहिजे. कारण त्यातून खरेतर सत्ताधाऱ्यांचे फावते. या वेळी विरोधकांनी एखादा अपवाद वगळला तर सभात्याग केला नाही, दमदार भाषणे केली. हेच सत्ताधाऱ्यांना खमके उत्तर ठरले, तेही इतके प्रभावी झाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या पक्षातील असुरक्षितता भर संसदेत उघड केली!
लोकसभेत ३०३ जागा मिळवून, प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा भाजप काँग्रेसवाल्यांच्या दोन-चार भाषणांनी हडबडून जातो, हे पाहणे आश्चर्यकारक होते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर आक्रमक शाब्दिक हल्ला केल्यानंतर पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणाची खरडपट्टी काढणार हे ओघाने आलेच. मोदीही तितक्याच आक्रमकपणे, त्यांच्या विशिष्ट शैलीत बोलतील याचा अंदाज आलेला होता. मोदी कुठेही बोलले तरी त्यांचा बोलण्याचा आविर्भाव एकच असतो. त्यांचे संसदेतील भाषण असो वा लाखो लोकांसमोर प्रचारसभेत केलेले भाषण असो, त्यांच्या बोलण्यातील सूर, चढ-उतार, संवादांची फेक, विरोधकांची खिल्ली उडवण्याची पद्धत एकसारखीच असते. संसदेत बोलायचे आहे म्हणून मोदी अधिक अभ्यासपूर्ण बोलतील असे नव्हे. त्यांचे भाषण लक्षवेधी असते, आकर्षक असते, ते लोकांना-विरोधकांना आपल्या वाणीने गप्प करतात. ते भाजपचे स्टार प्रचारक का आहेत आणि त्यांच्या भाषणामुळे अख्ख्या निवडणुकीची दिशा कशी बदलू शकते, हे त्यांचे भाषण ऐकल्यानंतर समजते. त्यामुळेच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदी काँग्रेस पक्षाला, इतर विरोधकांना आणि विशेषत: राहुल गांधींना धोबीपछाड देतील असे वाटणे साहजिकच होते. पण, त्यांच्या भाषणाचा नेमका उलटा परिणाम झाला. मोदींची दुखरी नस कोणती हे त्यांनी स्वत:च लोकांना जाणवू दिले. काँग्रेसवाल्यांची भाषणे त्यांच्या जिव्हारी लागली हेच खरे.
भाजपचे ‘सर्वेसर्वा’ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशच्या प्रचार दौऱ्यांमध्ये सातत्याने सांगत आहेत की, भाजपचे आणि देशाचे भविष्य म्हणजे २०२४च्या लोकसभा निवडणुकीचे भवितव्य उत्तर प्रदेश ठरवणार आहे. उत्तर प्रदेशात भाजपला जिंकून द्या.. देशाचा पंतप्रधान उत्तर प्रदेश ठरवणार असल्याने उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. पण, या राज्यात भाजपला काँग्रेसने नव्हे तर समाजवादी पक्षाने घाम फोडला आहे. इथे काँग्रेस हा भाजपचा प्रमुख स्पर्धक नाहीच, तरीही विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात मोदींनी संसदेत काँग्रेसवर आजपर्यंतचा सर्वाधिक हल्लाबोल केला. जणू मोदींचे मन काँग्रेसने व्यापून टाकले असावे. ज्यांना ‘पप्पू’ ठरवले, त्यांनीच घायाळ करावे आणि त्यांना तावातावाने ‘स्पष्टीकरण’ द्यावे लागावे, हे ‘राजा’ची सत्तेवरील पकड सैल झाल्याचे तर लक्षण नव्हे, असे कोणीही विचारू शकेल.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणातील न पटणाऱ्या मुद्दय़ांवर प्रल्हाद जोशी, मुख्तार अब्बास नक्वी, पीयूष गोयल हे केंद्रीय मंत्री बाकांवरून उठून तावातावाने आक्षेप घेत होते. राज्यसभेत कधी नव्हे ते उपस्थित राहून मोदी खरगेंचे भाषण ऐकत होते. मोदींच्या उपस्थितीमुळे कदाचित अतिउत्साहित होऊन मंत्रीही खरगेंच्या भाषणात अडथळे आणत असावेत. खरगेंच्या भाषणानंतर मोदी सभागृहातून बाहेर गेले. मग वरिष्ठ सभागृहातील वातावरण थोडे निवळले. त्यानंतर समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव बोलले. यादव यांनी बरीच वर्षे संसदेत घालवली आहेत, त्यांना कदाचित राहवले नसावे. ते म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असते, ते संख्याबळावर कोणतेही निर्णय घेऊ शकतात, विधेयक संमत करू शकतात. तो सत्ताधाऱ्यांचा अधिकारही आहे. विरोधकांकडे संसदेत आपले म्हणणे मांडण्याशिवाय दुसरे कोणतेही प्रभावी आयुध नसते. ते सरकारच्या विरोधात बोलणार, ते त्यांचे काम आहे. त्यामुळे विरोधकांचे म्हणणे सत्ताधाऱ्यांनी ऐकून घ्यायचे असते. मंत्री आक्रमक होऊन विरोधी पक्षनेत्याच्या भाषणावर आक्षेप घेताना आत्तापर्यंत कधी पाहिले नव्हते. ज्येष्ठ मंत्र्यांनी इतकी अपरिपक्वता दाखवावी, ही बाब लाजिरवाणी आहे!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण दीड तासात आटोपले होते. पण अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना त्यांनी भान गमावले असावे. त्या लोकसभेत दोन तास उत्तर देत होत्या, त्यातील बहुतांश वेळ काँग्रेसला दूषणे देण्यात गेला. सीतारामन यांची दोन्ही सदनांतील प्रत्युत्तरे आर्थिक कमी आणि राजकीय जास्त होती. त्यांच्या भाषणातून काँग्रेस पक्षाची चिंता गांधी कुटुंबाला कमी आणि सीतारामन यांना अधिक असावी असे वाटत होते. जणू काही सीतारामन काँग्रेसमधील बंडखोर ‘जी-२३’ गटाच्या सदस्या असाव्यात. याच गटातील मानले जाणारे काँग्रेसचे खासदार कपिल सिबल यांनी अमृतकाळ नव्हे तर ‘राहुकाळ’ अशी टीका केल्यामुळे सीतारामन प्रचंड संतापलेल्या होत्या. विरोधकांनी राजकीय टिप्पणी केल्यामुळे मलाही राजकीय उत्तर द्यावे लागत आहे, असा युक्तिवाद सीतारामन यांनी राज्यसभेत केला आणि काँग्रेस पक्ष कसा डबघाईला आला आहे, ‘जी-२३’ बंडखोर हे काँग्रेसमधील ‘राहू’ आहेत, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अपयशी ठरत आहे, काँग्रेसचा ‘राहुल’ काळ सुरू आहे, अशी शेरेबाजी त्यांनी केली. सीतारामन भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, त्यांचा पक्ष केंद्रात सत्तेत आहे, त्यांच्या पक्षाची संघटना मजबूत आहे. त्यामुळे सीतारामन यांनी विरोधी पक्षाच्या संघटनेकडे लक्ष द्यावे अशी कोणी अपेक्षा करत नाही. शिवाय, काँग्रेस पक्ष कसा चालवायचा, बंडखोरांचे काय करायचे, धोरणे कुठली ठरवायची, प्रचार कसा करायचा हे सगळे काँग्रेसचे नेतृत्व त्यांच्या अकलेने ठरवेलच, त्यात सीतारामन यांनी कशासाठी ‘हस्तक्षेप’ करावा, असा प्रश्न पडावा इतके सीतारामन यांचे भाषण काँग्रेसकेंद्रित होते. शत्रूबद्दल शत्रुत्व इतके भिनत जाते की, शत्रूशी शत्रुत्व केले नाही तर करायचे काय, जगायचे कसे अशी पंचाईत व्हावी. ती बहुधा मोदी आणि भाजपच्या सर्वच नेत्यांची झाली असावी. निदान संसदेतील सीतारामन यांच्या भाषणातून तरी तसेच ध्वनित होत होते.
संसदेत काँग्रेसच नव्हे, इतर विरोधी पक्षांनीही भाजपला चिमटे काढले. त्याचा प्रतिवाद भाजपकडून, ‘नेहरू काय म्हणाले होते’- असा केला जात होता. महागाईपासून गोवा मुक्ती संग्रामापर्यंत अनेक मुद्दय़ांवर नेहरूंची विधाने मोदींनी वाचून दाखवली. तुम्ही म्हणता मी नेहरूंचे नाव घेत नाही, बघा, मी नेहरूंचा उल्लेख करतोय, असे मोदी म्हणाले. पण, असे म्हणत त्यांनी स्वत:च्या बचावासाठी नेहरूंच्या विधानांची ‘मदत’ घेतली हे बहुधा त्यांना कळले नसावे. लढाई अवघड होते तेव्हा भाजपच्या नेत्यांच्या ‘मदती’ला काँग्रेस आणि नेहरू धावून येत असावेत! आत्ताही भाजपसाठी विधानसभेची निवडणूक अवघड होताना दिसते. उत्तराखंडमध्ये दोन-तीन दिवस प्रचार केल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ‘संघर्ष करावा लागेल’, अशी कबुली देतात. भाजपचे नेते गोव्यात पक्षाला १२-१४ जागा मिळतील पण भाजपला सत्ता मिळेलच असे नाही, असे म्हणतात. पंजाबात काँग्रेस की आप अशी चर्चा होते. उत्तर प्रदेशात भाजपसाठी लढाई कठीण झाल्याचे उघडपणे बोलले जात आहे. या कठीण परिस्थितीतून ‘काँग्रेस’च आपल्याला बाहेर काढू शकेल असा विश्वास भाजपला असावा. म्हणूनही कदाचित मोदींनी काँग्रेसच्या चुका संसदेत पुन्हा पुन्हा उगाळल्या असाव्यात. पण काँग्रेस नेत्यांच्या भाषणाने व्यक्तिश: मनाला टोचणी लागली, म्हणून एवढे?
अनौपचारिक गप्पांमध्ये एका भाजप नेत्याने सांगितले होते, ‘गेल्या दहा वर्षांत देशातील नव्याने मतदार झालेल्या तरुणांनी काँग्रेसचे राज्य बघितलेले नाही. त्यांनी बघितले आहे ते मोदींचे सरकार, त्यामुळे साहजिकच ते आता या सरकारमधील चुका काढायला लागलेले आहेत. पण काँग्रेसच्या काळातील वैगुण्ये त्यांना दाखवली नाहीत तर भाजपचे सरकार कसे चांगले, हे त्यांना कळणार नाही. भाजपपुढील हेच खरे आव्हान आहे,’’ सत्तेत टिकून राहण्यासाठी भाजपला काँग्रेसच्या पूर्वेतिहासाची गरज भासते, अशा प्रकारे काँग्रेस ‘मदती’ला येते. हेच काँग्रेसवाले अधूनमधून भाजपवर प्रखर टीका करून त्यांना उघडे पाडतात तेव्हा मात्र भाजपचा तिळपापड होतो. मग, तारतम्य विसरले जाते. त्याची प्रचीती संसदेतील मोदी वा सीतारामन यांची भाषणे ऐकल्यावर कोणालाही येऊ शकेल.
mahesh.sarlashkar@expressindia.com