|| महेश सरलष्कर
गोशाळा बांधण्याचे वचन, मंदिरांमध्ये अभिषेक, शिवभक्त-रामभक्ताचा नारा देत काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये सौम्य हिंदुत्वाचा अंगीकार केला आहे. भाजपच्या उग्र हिंदुत्वाला दिलेले हे उत्तर आहे, असे पक्ष मानत असला तरी, काँग्रेसचे या प्रयोगातून विधानसभाच नव्हे, तर लोकसभा निवडणुकीतही नुकसान होऊ शकते.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी हिंदुत्व या विषयावर चर्चा केली की, भाजपने त्यांची कशी कोंडी केलेली आहे हे लक्षात येते. राम मंदिराच्या मुद्दय़ावर कोणती भूमिका घेतली पाहिजे असे विचारले तर, हा मुद्दा काँग्रेसने सोडू नये, अशी भावना व्यक्त होते. राम मंदिरावर काँग्रेसने अजून तरी उघडपणे मतप्रदर्शन केलेले नाही. पण, काँग्रेस नेतृत्वाने भाजपला मोकळे रान देणे राजकीयदृष्टय़ा तोटय़ाचे ठरेल असा अंदाज व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या काँग्रेसमध्ये मोठी आहे. ‘रामलल्ला मंदिराचे कुलूप काढण्याचा निर्णय केंद्रातील काँग्रेस सरकारचाच होता. एक प्रकारे राम मंदिराचा मार्ग काँग्रेसने सुकर केलेला आहे. मग त्याचे श्रेय फक्त काँग्रेसने का घ्यायचे नाही? रामलल्ला मंदिराचे कुलूप आम्हीच काढले हे ठणकावून सांगायला काय हरकत आहे? राम मंदिराचा मुद्दा संघ परिवार, त्यांचे साधुसंत आणि भाजप या तिघांनीही बळकावलेला आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशात राम मंदिराचा मुद्दा सोडून दिला तर पक्षाचे आणखी नुकसान होईल’, हा उत्तर प्रदेशातून आलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा युक्तिवाद होता. त्याची राम मंदिराभोवतीची मांडणी काँग्रेस सौम्य हिंदुत्वाकडे का झुकलेला आहे याचे विश्लेषण करते. पण या धोरणाचा काँग्रेसला किती फायदा होणार हे मध्य प्रदेशमधील निकालांनंतर स्पष्ट होईल.
मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आणखी दहा दिवसांनी मतदान होईल. शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने मध्य प्रदेशमध्ये गेली पंधरा वर्षे सत्ता राबवली. चौथ्यांदा संधी दिली तर शिवराज सरकार जनतेला काय देणार, या प्रश्नाभोवती काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी स्वतला ‘घोषणा मशीन’ म्हणवून घेतले होते. ‘सचिन तेंडुलकर हा रन मशीन, तसा मी घोषणा मशीन आणि राहुल गांधी फन मशीन’ हे शिवराज यांचे वक्तव्य विकासाच्या ध्येयपूर्तीची अतिशयोक्ती होती. सलग तीन वेळा भाजपचे सरकार असल्याने मतदारांमध्ये विकासाच्या मुद्दय़ावरून असंतोष दिसू लागला होता. ही बाब शिवराज सरकारला अडचणीची ठरेल याचा अंदाज दिल्लीतील भाजपच्या मंडळींना आलेला होता. म्हणूनच त्यांनी ‘नवे चेहरे’ देण्याची क्लृप्ती वापरली. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नव्या मतदारांनी आत्तापर्यंत राज्यात शिवराज सरकारच पाहिलेले आहे. त्यांना बदलाची अपेक्षा असू शकते, हा धोकाही भाजपने तिकीटवाटपात लक्षात घेतला. एका तपानंतर विकासाची फळे जनतेला मिळाली असतील. त्यातून त्यांच्या अपेक्षाही वाढल्या असतील. त्यांची पूर्तता करण्याची क्षमता शिवराज सरकारमध्ये आहे का, याचा विचार कुंपणावर बसलेले मतदार करू शकतात. असा मतदार ऐन वेळी भाजपविरोधात मतदान करू शकतो, त्याला कसे रोखायचे याचा आराखडा भाजपला आखावा लागला आहे. मध्य प्रदेशमध्ये विकासाच्या मुद्दय़ावर शिवराज सरकारला अडचणीत आणले जाऊ शकते ही बाब भाजपने आधीच हेरलेली होती. पण काँग्रेसने सप्टेंबरपासून केलेला निवडणूक प्रचार विकासापासून सौम्य हिंदुत्वाकडे गेला. शिवराजसिंह चौहान यांची हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर कोंडी करण्याकडे काँग्रेसचा कल राहिला.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘कैलास मानसरोवर’हून आणलेला जलकलश महात्मा गांधींच्या समाधीवर वाहिला आणि त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये प्रचार सुरू केला. चौदा वर्षांच्या वनवासाच्या काळात रामाच्या भ्रमणाचा मध्य प्रदेशमधील कथित मार्ग, ‘राम वनगमन पथा’वरून सप्टेंबरमध्ये राहुल यांनी पदयात्रा काढलेली होती. यात्रा काढण्याची कल्पना हरिशंकर शुक्ला या काँग्रेस नेत्याची. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला जिंकायचे असेल तर रामाचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही अशी त्यांची ठाम समजूत आहे. शिवराज यांनी ‘राम वनगमन पथ’ विकसित करण्याचे दिलेले वचन वास्तवात उतरलेले नाही, हा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला. नर्मदा नदी हिंदूंसाठी पवित्र मानली जाते. तीर्थयात्रा करणाऱ्यांसाठी या मार्गावर विश्राम भवन बांधले जातील अशी घोषणा शिवराजसिंह चौहान यांनी ‘नर्मदा परिक्रमे’त केलेली होती. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनीही नर्मदा यात्रा करून हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला होता. दोन आठवडय़ांपूर्वी काँग्रेसने जाहीरनाम्यात प्रत्येक पंचायतीत गोशाळा बांधण्याचे वचन दिले असले तरी त्याचा प्रचार तीन महिन्यांपूर्वीच काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार कमलनाथ यांनी सुरू केला होता. ‘गोशाळा बनवणे ही घोषणा नसून वचन आहे’, असा उघड प्रचार कमलनाथ यांनी केला. शिवलिंगाची पूजा करत असल्याचे राहुल गांधींचे मोठमोठे फलक मध्य प्रदेशभर लावलेले होते. त्यावर ‘मी शिवभक्त, मी रामभक्त’चा नारा होता. राहुल, ज्योतिरादित्य शिंदे, कमलनाथ आणि दिग्विजय सिंह या चारही प्रमुख काँग्रेस नेत्यांनी ठिकठिकाणी मंदिरांना भेटी दिल्या. पूजापाठ केले. पुजाऱ्यांनी दिलेला प्रसाद खाल्ला. त्यातून हिंदू भक्त असल्याची प्रतिमा जाणीवपूर्वक बनवण्याचा प्रयत्न केला. त्याचे प्रत्यंतर अर्थातच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसले. त्यात गोशाळा बांधण्याला प्राधान्य दिले गेले. एक प्रकारे काँग्रेसने मध्य प्रदेशला सौम्य हिंदुत्वाची प्रयोगशाळाच बनवून टाकले असे म्हणावे लागते.
हिंदुत्वाचा आधार घेऊन राजकीय लढाई जिंकता येईल असा विचार मांडणारे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत. मुस्लीम अनुनयाची प्रतिमा हिंदूच्या मनातून गेल्याशिवाय काँग्रेसला त्यांची मते मिळणार नाहीत, असा या कार्यकर्त्यांचा समज दिसतो. गुजरात आणि कर्नाटकात सौम्य हिंदुत्वामुळेच काँग्रेसला यश मिळाल्याचा युक्तिवाद पक्षातील हा वर्ग करतो. त्यामुळे मध्य प्रदेशमध्येही त्याची पुनरावृत्ती केली गेली. पण ही काँग्रेसची दिशाभूल ठरू शकते. त्यामुळे कदाचित मध्य प्रदेशमध्ये सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास निसटू शकतो. सौम्य हिंदुत्वाचा अंगीकार करून कोणता हिंदू काँग्रेसकडे वळणार? उदारमतवादी हिंदूचा संघ-भाजपच्या एककल्ली कडव्या हिंदूत्वाला विरोध आहे. सौम्य हिंदुत्वामुळे तो काँग्रेसकडे येईल असे नव्हे. सौम्य हिंदुत्वाशिवायही असा मतदार काँग्रेसकडे वळेलच. कडवे हिंदुत्ववादी निव्वळ मुस्लीमविरोधासाठी भाजपबरोबरच राहतील. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात उभ्या राहिलेल्या पाटीदार, दलित आणि मुस्लीम या तीनही मतदारांनी सत्ताधारी पक्षाच्या जागा कमी केल्या. पण निव्वळ सौम्य हिंदुत्वामुळे गुजरातमध्ये काँग्रेसला हे यश मिळालेले नाही. उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकीत जाट, दलित आणि मुस्लीम एकत्र आल्याने भाजपचा पराभव झाला. या पोटनिवडणुकीत ‘जीना नहीं गन्ना’ हा हिंदुत्वाच्या विरोधातील नारा होता.
मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. मंदसौरमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारानंतर शिवराज सरकारविरोधात वातावरण तापले होते. राज्य सरकारने भावांतर योजना लागू केली असली तरी त्याचा शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा झालेला नाही. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न देशभरातील शेतकऱ्यांना भेडसावतो, तसा तो मध्य प्रदेशमध्येही आहे. राहुल गांधींनी प्रचारसभांमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या ऐरणीवर आणल्या. बहुतांश राज्य सरकारांसाठी तरुणांमधील बेरोजगारी अडचणीची ठरत असते. अपेक्षा पूर्ण होत नसल्याने तरुण वर्ग राजकीय पर्याय शोधतो. मध्य प्रदेशात बेरोजगारी हा प्रमुख मुद्दा आहे. नाराज बेरोजगार तरुण मतदार शिवराज सरकारच्या विरोधात मतदान करू शकतो. उत्तरेकडील राज्यांमध्ये दलितांनी आंदोलन केले होते. त्याचे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तीव्र पडसाद उमटलेले होते. दलित-आदिवासी मतदारांना आपलेसे करण्यासाठी शिवराजसिंह चौहान यांना अॅट्रॉसिटी कायद्यातील सुधारणांचे समर्थन करावे लागले होते. त्यात ब्राह्मण आणि राजपूत हा भाजपचा परंपरागत मतदार नाराज झालेला होता. मध्य प्रदेशच्या मतदारांनी शिवराज सरकारची उचलबांगडी करण्याचे ठरवले तर ते काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना मते देतील. मध्य प्रदेश असो वा राजस्थान, प्रत्येक राज्यात निवडणुकीत स्थानिक मुद्दे प्रभावी ठरू शकतात. हे मुद्दे हिंदुत्वाशी नव्हे, तर विकासाशी निगडित आहेत. त्यामुळे सौम्य हिंदुत्वाची कास धरून काँग्रेसला यश मिळेलच असे नाही. तरीही काँग्रेसला तिथे यश मिळालेच तर त्यात बिगरहिंदुत्वाचाच वाटा अधिक असू शकतो.
mahesh.sarlashkar@expressindia.com