जयललितांच्या निधनाने तामिळनाडूसारखे राज्य आणि पन्नास खासदार असलेल्या अण्णाद्रमुकचे भवितव्य एकदम अधांतरी बनले आहे. अशा स्वरूपाची परिस्थिती नवीन पटनाईक, मायावती, ममता बॅनर्जी आणि नितीशकुमार यांच्या पश्चात त्यांच्या पक्षांवरही ओढवू शकते. लोकसभेच्या पावणेदोनशे जागांचा फैसला करणाऱ्या या पक्षांचा घास घ्यायला कोणत्या ‘आयत्या बिळातील नागोबां’ना आवडणार नाही?

आपल्या लोकशाहीचे आणि राजकारणाचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे.. घराणेशाही आणि नुसते घराणेशाही म्हटले तरी डोळ्यासमोर काँग्रेसचे नाव येते. मोतीलाल नेहरूंपासून ते आता राहुल यांच्यापर्यंत. परंतु घराणेशाहीवरून काँग्रेसला नावे ठेवणारे बहुतेक सगळेच पक्ष घराणेशाहीच्या रंगामध्ये नाहून निघाले आहेत. मुलायमसिंहांचे कुटुंब तर या घराणेशाहीचे किळसवाणे उदाहरण. मुलायमांच्या कुटुंबकबिल्यात एक मुख्यमंत्री, सहा खासदार, दोन आमदार, तीन जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे आहेत. शिवाय पक्ष घरगडी असल्यासारखाच. मुलायम शिरोमणी असतील; पण अन्य पक्ष काही कमी नाहीत. पत्नी राबडीदेवींना मुख्यमंत्री बनविल्यानंतर लालूंनी धाकटा मुलगा तेजस्वीला बिहारचे उपमुख्यमंत्री बनविले. तेजप्रताप या थोरल्या मुलाकडे बांधकाम, आरोग्य अशी खाती सोपविलीत. मुलगी मिसा भारतीला खासदार केले. तिकडे पंजाबात बाप-मुलगा-सून-मेहुणा हे अनुक्रमे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे मंत्री आहेत. प्रकाशसिंह बादल, सुखबीर, हरसिमरत कौर आणि विक्रमसिंह मजिठिया ही ती नावे. महाराष्ट्राचे तालेवार नेते शरद पवार भले सत्तेबाहेर असतील, पण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे वारसदार आहेत आणि ते सध्या िवगेत आहेत. पुतण्या अजित की कन्या सुप्रिया.. पवारांची निवड सध्या तरी ‘झाकली मूठ’ आहे. शिवसेनेची स्थिती अधिक स्पष्ट. सर्व शंकांना बाजूला सारून बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात शिवसेनेची उत्तम बांधणी उद्धव ठाकरे यांनी केलीय. आता तर पुढील पिढीला म्हणजे आदित्यलाही पद्धतशीरपणे पुढे आणले जात आहे. तिकडे आंध्रात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचा मुलगा नारा लोकेश हळूहळू धडे गिरवू लागलाय. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता सक्रिय खासदार आहे आणि मुलगा के. टी. रामा राव यास मंत्री केलेय. एम. के. स्टॅलिनच्या रूपाने द्रमुकचे भीष्माचार्य एम. करुणानिधी यांचा वारसदार निश्चित आहे. भारतीय राष्ट्रीय लोकदलाची (आयएनएलडी) सूत्रे तिसऱ्या पिढीकडे म्हणजे देवीलालांचा नातू आणि सध्या तुरुंगात असलेल्या ओमप्रकाश चौतालांचे चिरंजीव दुष्यंत यांच्याकडे आहे. दुष्यंत सध्या लोकसभेत आहेत. राष्ट्रीय लोकदलाच्या अजितसिंहांनी आपला मुलगा जयंत चौधरीस पुढे आणण्याची धडपड केव्हापासूनच चालविलीय. फारूख अब्दुल्लांकडून ओमर यांनी नॅशनल कॉन्फरन्सला आणि मेहबूबा मुफ्ती यांनी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला (पीडीपी) यापूर्वीच ताब्यात घेतले आहे.

घराणेशाहीच्या नावाने कितीही बोटे मोडली तरी ती आपल्याला अंगवळणी पडलीय. प्रादेशिक पक्ष तर एकाच नेत्याभोवती फिरत असतात. या पक्षांना अस्तित्वासाठी घराणेशाहीच लागते; पण घराणेशाहीच्या या गलबल्यामध्ये देशात महत्त्वाचे असणारे ‘साडेतीन पक्ष’ असे आहेत, की तिथे घराणेशाही किंवा वारस तर लांबच; पण दुसऱ्या क्रमांकाचाही नेता नीट दिसत नाही. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपाच्या मायावती आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार ही ती ‘साडेतीन’ नावे. ‘साडेतीन’ का? तर पटनाईक, ममता आणि मायावती हे तिघे अविवाहित; पण नितीशकुमारांना मुलगा (निशांत) असतानाही तो कौटुंबिक कारणांमुळे राजकारणापासून कोसो मल दूर आहे. म्हटले तर वारस आहे; पण वारसा हक्कावर या क्षणाला दावेदारी नाही. म्हणून ‘साडेतीन पक्ष’.

नवीन, ममता, मायावती आणि नितीश यांच्या वारसांचा मुद्दा पुढे आला तो जयललितांच्या निधनाने. जयललिता अविवाहित राहिल्या. दत्तक पुत्राला त्यांनी कधीच दूर केलेले. शशिकला शेवटपर्यंत घनिष्ठ राहिल्या; पण जयललितांनी त्यांना कधीच वारस म्हणून जाहीर केले नाही; पण आता जयललितांच्या निधनानंतर तामिळनाडूची सत्ता असलेला आणि पन्नास खासदार असलेला अण्णाद्रमुक पक्ष एकदम पोरका झाल्याचे चित्र आहे.  शशिकला, मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम आणि लोकसभेतील नेते थम्बीदुराई आदी त्रिकुटाच्या हातात पक्ष गेलाय; पण या तिघांपकी एकाकडेही जयललितांसारखा करिश्मा नाही. म्हणून तर अण्णाद्रमुकबाबत शंकाकुशंका आहेत. धूर्त, चाणाक्ष असलेल्या जयललितांनी आपल्या पक्षाचे भवितव्य असे कसे काय अधांतरी ठेवले, याचेच आश्चर्य वाटतेय.

पण अशीच स्थिती पटनाईक, ममता, मायावती आणि नितीशबाबतही नाकारता येत नाही. यात अतिशयोक्ती नाही. नितीशकुमारांना किमान वारस आहे, पण इतर तिघांचे काय? सलग चार वेळा निवडून येणाऱ्या पटनाईकांना ओदिशात साधा स्पर्धकसुद्धा नाही. दिवंगत बिजू पटनाईक यांच्या या वारसाला साधी उडिया भाषासुद्धा नीट बोलता येत नसली तरी ते सोळा वर्षांपासून भरभक्कम बहुमताने मुख्यमंत्री होत आहेत. मात्र नवीन यांच्या पश्चात बिजू जनता दलाचे काय? वारस नाही. चांगले अभ्यासू नेते आहेत या पक्षाकडे.. पण पटनाईकांची पोकळी भरून काढणारा एकही नाही.

अशीच स्थिती मायावतींची. कांशीराम यांनी मायावतींना पुढे आणले. महत्त्वाकांक्षी मायावतींनी ती संधी भरभरून साधली. पवारांसारख्या विलक्षण क्षमतेच्या नेत्याला महाराष्ट्रात स्वबळावर एकदासुद्धा सत्ता मिळविता आली नाही; पण महाराष्ट्राच्या जवळपास दुप्पट असलेल्या उत्तर प्रदेशात मायावती चार वेळा मुख्यमंत्री झाल्या; पण वारस तर सोडाच, त्यांच्या वाऱ्याला उभा राहू शकणारा एकही नेता बसपाकडे नाही. नाही म्हणायला आतापर्यंत सतीशचंद्र मिश्रा सावलीप्रमाणे असायचे त्यांच्यासोबत, पण ते पडले ब्राह्मण आणि जनाधार नसलेले. त्यांना अलगद बाजूला सारून आणि मुस्लीम मतांवर डोळा ठेवून सध्या नसिमीद्दिन सिद्दिकींना मायावतींनी क्रमांक दोनचे स्थान देऊ केलेय; पण मिश्रा काय किंवा सिद्दिकी काय.. मायावतींची जागा कशी घेतील? ना करिश्मा, ना ते दोघे दलित! मायावतींपश्चातची पोकळी अधिक व्यापक असू शकते.

ममताही त्याच वळणावर. डाव्यांची सद्दी संपवून ही वाघीण पश्चिम बंगालची अनभिषिक्त सम्राज्ञी बनली. डावे मरणासन्न आहेत आणि भाजपला ती पोकळी भरून काढता आलेली नाही. अशा स्थितीत एकापाठोपाठ एक निवडणुका खिशात घालणाऱ्या ममतांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा चांगलीच फुललीय; पण त्यांच्या पश्चात तृणमूलचे काय? वारस नाही आणि क्रमांक दोनचा नेताही नाही. मुकुल रॉय, डेरेक ओ’ब्रायन, अमित्र मित्रा आदी ‘नेते’ हे थोडेच नेते आहेत? नाही म्हणायला ममतांना पुतण्या आहे आणि तो ममतांचा फारच लाडका असल्याचे सांगितले जाते. अभिषेक बॅनर्जी असे त्याचे नाव. तो डायमंड हार्बरमधून खासदार आहे. ममतांचा वारस असल्यासारखीच त्याची वागणूक असल्याची तृणमूलची मंडळी सांगतात; पण ममतांनी तसे कधी दाखविलेले नाही. किंबहुना अलीकडे त्या अभिषेकला जरा दूरच ठेवत असल्याचे चित्र आहे; पण असले चढउतार गृहीत धरूनही अभिषेकच्या रूपाने कोणी तरी ‘बॅनर्जी’ तृणमूलकडे असू शकतो.

तसे म्हणायचे झाले तर देशातील दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांचे प्रमुख या क्षणाला विनावारस आहेत. नरेंद्र मोदी अविवाहित आहेत, तर राहुल गांधी अजूनही बोहल्यावर चढले नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चौकट भरभक्कम असल्याने मोदींच्या पश्चातही भाजपचे लहान-मोठे अस्तित्व कायम राहील. अगदी राहुल यांनी विवाह केलाच नाही तरी प्रियांका गांधी-वढेरा यांच्या रूपाने काँग्रेसकडे एक ‘आकर्षक वारस पर्याय’ आहेच. शिवाय प्रियांकांना दोन मुले आहेतच. म्हणजे ‘गांधी’ आडनावाची सोय असल्याने काँग्रेसला दूर दूर तरी नेतृत्वाची काळजी नसावी.

पण लोकसभेत तब्बल पावणेदोनशे खासदार पाठविणाऱ्या उत्तर प्रदेश, प. बंगाल, बिहार आणि ओदिशा या चार राज्यांमधील चार नेत्यांच्या शक्तिशाली पक्षांचे त्यांच्या पश्चात भवितव्य काय असेल? पटनाईक सत्तरीत आहेत, ममता- मायावती- नितीश हे साठ-पासष्टीत आहेत. जयललितांच्या एकाएकी निधनाने अशा एकखांबी, एकतंबू पक्षांच्या भवितव्याबाबतच्या शंका ऐरणीवर आल्या आहेत. जयललितांपासून हा एक महत्त्वाचा धडा हे नेते शिकले तर ठीक. नाही तर आयुष्यभर धडपडून उभ्या केलेल्या पक्षाचे भवितव्य कोण्या ‘आयत्या बिळामधील नागोबां’च्या हातात गेल्याशिवाय राहणार नाही. नेतृत्वाअभावी एक तर शकले उडतील किंवा कदाचित हे पक्ष आपल्या नेत्यांपाठोपाठ इतिहासजमासुद्धा होतील. अर्थातच ही अशक्यकोटीतील शक्यता आहे.

नवीन जी, ममता जी, मायावती जी, नितीश जी, चॉइस इज युअर्स.. टाइम स्टार्ट्स नाऊ!

 

संतोष कुलकर्णी

santosh.kulkarni@expressindia.com

 

 

Story img Loader