ईशान्येकडील तीन राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपची पुन्हा एकदा हवा निर्माण झाली आहे. मात्र सबंध देशाचा विचार करता ही राज्ये छोटी असल्याने पुढील महिन्यात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देशातील राजकीय वाटचाल निश्चित होऊ शकेल..
गेल्या दोन आठवडय़ांमध्ये राजकीय चित्र कमालीचे बदलले. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा, नीरव मोदी याने देशाबाहेर केलेले पलायन, नीरव मोदीला सरकारी अधिकाऱ्यांनी केलेली मदत, मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला १२ हजार कोटींपेक्षा जास्तचा लावलेला चुना यालाच माध्यमांमधून महत्त्व मिळत होते. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याचा निर्धार करून सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर प्रथमच टीका सुरू झाली. काँग्रेसने संधी साधत चौकीदार काय करत होते, असा मोदी यांना उद्देशून सवाल केला. नीरव मोदी प्रकरणावरून पंतप्रधान मोदी हे मौन बाळगून असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करीत आहेत.
भाजपने नेहमीप्रमाणे आधीच्या काँग्रेस आघाडी सरकारवर या घोटाळ्याचे खापर फोडले. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा हा यूपीए सरकारच्या काळातच झाल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला. नीरव मोदी आणि पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. त्यातून लक्ष विचलित करण्याच्या उद्देशानेच मग सरकारमधील धुरिणांनी माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदम्बरम यांच्या अटकेची खेळी खेळल्याचे बोलले जाते. कार्ती चिदम्बरम यांची गेले तीन वर्षे चौकशी सुरू होती. त्यांना परदेशात जाण्याची परवानगी मिळाली होती. परदेशातून येताच त्यांना चेन्नई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. कार्तीच्या अटकेनंतर पंजाब नॅशनल बँकेतील १२ हजार कोटींचा घोटाळा मागे पडला आणि कार्ती चिदम्बरम यांनी वडील वित्तमंत्री असताना कसे व्यवहार केले याचीच चर्चा सुरू झाली. नीरव मोदी प्रकरणावरून भाजपच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ तूर्त दूर झाले.
ईशान्येकडील तीन राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपची पुन्हा एकदा हवा निर्माण झाली. देशातील २१ राज्यांमध्ये सत्ता मिळाल्याने देशात भाजपशिवाय पर्यायच नाही, असे वातावरण तयार करण्यात आले. आपल्या देशाचे राजकारण हे लाट किंवा हवेवर चालते. यामुळे हवेची दिशा कशी असेल हे महत्त्वाचे असते. हवा निर्माण करून लाटेवर स्वार होण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न असतो. वातावरणनिर्मिती करण्यात भाजपचे नेते यशस्वी झाले. ईशान्येकडील तीन राज्ये जिंकल्याने आता २०१९ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची औपचारिकता तेवढी बाकी राहिली, असेच चित्र निर्माण करण्यात आले आहे. त्रिपुरा, नागालॅण्ड आणि मेघालय जिंकल्यावर भविष्यात केरळ आणि पश्चिम बंगाल ही राज्येही जिंकू, असा निर्धार पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केला. ईशान्येकडील विजयाने कर्नाटकात आपोआप भाजपची हवा निर्माण होण्यास मदतच होईल. कर्नाटक कोणत्याही परिस्थितीतजिंकायचेच, असा निर्धारच ईशान्येकडील निकालांनंतर आयोजित केलेल्या विजयसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.
भाजपसाठी पुढील वर्षी होणारी लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. पुन्हा सत्ता मिळवायचीच हे पक्षाचे ध्येय आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या घवघवीत यशाने भाजपच्या शिडात हवा भरली होती. पण गुजरातच्या निकालाने भाजपचे नेते पुन्हा जमिनीवर आले. सत्ता मिळाली असली तरी गुजरातचेच मोदी हे पंतप्रधान आणि अमित शहा पक्षाध्यक्ष असताना पक्षाला आतापर्यंत सर्वात कमी जागा तेथे मिळाल्या. १५० जागांचे स्वप्न बघणाऱ्या भाजपला शंभरीही गाठता आली नाही.
नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर प्रणाली लागू झाल्यापासून आर्थिक आघाडीवर चित्र बदलले. त्याचा फटका भाजपला बसला. विकास दरही कमी झाला होता. निर्यातीवर परिणाम झाला होता. देशातील २३ मुख्य उद्योगांपैकी १५ उद्योगांमध्ये वाढ उणे होती. रोजगारनिर्मितीवर परिणाम झाला होता. आर्थिक आघाडीवर होणाऱ्या परिणामांचे राजकारणावर परिणाम होतात. गुजरात निवडणुकीच्या अगोदर आर्थिक आघाडीवर सत्ताधारी भाजपच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यास काँग्रेसला यश आले होते. गुजरातमध्ये सत्ता मिळाली नसली तरी जागा वाढल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. २०१९च्या निवडणुकीत समविचारी पक्षांची मोट बांधून भाजपला रोखू शकतो, असे वातावरण काँग्रेसच्या गोटात तयार झाले होते. पुढील निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असे भाकीत राहुल गांधी यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात अनौपचारिक गप्पांच्या ओघात व्यक्त केले होते. भाजपला २०० ते २४० जागा मिळाल्यास मित्रपक्ष मोदी यांचे नेतृत्व स्वीकारणार नाहीत, असे काँग्रेसचे गणित असावे. गुजरातपाठोपाठ राजस्थानमधील तीन मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये मिळालेला विजय, मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये मिळलेले यश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या बरोबरीने मिळालेले यश यातून काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन होत असल्याचे चित्र निर्माण झाले. पण ईशान्येकडील राज्यांमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाल्याने गुजरातच्या यशाने निर्माण झालेला उत्साह पुन्हा मावळला आहे. त्रिपुरा आणि नागालॅण्ड या दोन्ही राज्यांमध्ये एकेकाळी सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. मेघालयात सर्वाधिक २१ जागाजिंकल्या असल्या तरी सरकार स्थापन करण्याकरिता आणखी १० आमदारांची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत हे आव्हान कठीण आहे. कर्नाटकची सत्ता कायम राखल्यास लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेसचा आत्मविश्वास वाढू शकतो. ईशान्येकडील राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण २५ जागा आहेत. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, नागालॅण्ड या राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे वा सत्ता मिळाली आहे. ईशान्येकडून जास्तीतजास्त लोकसभेच्या जागा जिंकण्याचे भाजपचे पुढील उद्दिष्ट असेल. २०१४ मध्ये २५ पैकी १० जागा भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकल्या होत्या. पुढील निवडणुकीत २० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट राहणार आहे.
ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपने विजय मिळविला असला तरी ही राज्ये तशी आकाराने छोटी आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देशातील राजकीय वाटचाल निश्चित होऊ शकेल. कर्नाटकमध्ये भाजपला विजय मिळाल्यास लोकसभेची निवडणूक लवकर होणार हे निश्चित. लोकसभेबरोबरच काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची भाजपची योजना आहे. लोकसभेची मुदत मे महिन्यात संपत असली तरी कर्नाटक जिंकल्यास भाजपचे नेते या वर्षांअखेर मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडबरोबर लोकसभेची निवडणूक घेण्याचा विचार करू शकतात. अथवा पुढील वर्षांच्या सुरुवातीला निवडणूक होऊ शकते. कर्नाटकात काँग्रेसने सत्ता कायम राखल्यास गुजरातपाठोपाठ कर्नाटक या मोठय़ा राज्यात फटका बसल्यास भाजपचे नेते लोकसभा निवडणुकीची घाई करणार नाहीत.
भाजपसाठी पश्चिम बंगाल, तमिळनाडू, ओदिशा, केरळ ही राज्ये आव्हानात्मक आहेत. याबरोबरच गेली १५ वर्षे सत्ता असलेल्या मध्य प्रदेशातही आव्हान आहे. राजस्थानमध्ये वातावरण विरोधात तयार झाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थान आणि गुजरातमधील सर्व ५१ जागा भाजपने जिंकल्या होत्या. राजस्थानमध्ये आलटूनपालटून सत्ताबदल होतो. गेल्याच महिन्यात झालेल्या लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एका मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या तीन मोठय़ा राज्यांमध्ये भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने गेल्या लोकसभा निवडणुकीत १६८ पैकी १४७ जागा जिंकल्या होत्या. हा कल कायम ठेवण्याचे पक्षापुढे मोठे आव्हान असेल. ईशान्येकडील राज्यांमधील विजयाने भाजप हा फक्त हिंदी पट्टय़ातील पक्ष ही प्रतिमा आता पुसली जाईल, अशी भूमिका अमित शहा यांनी मांडली आहे. २०१४ च्या निवडणुकीत चांगले यश न मिळालेल्या १२० मतदारसंघांवर भाजपने लक्ष्य केंद्रित केले आहे. उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीसारखे यश अपेक्षित धरण्यात आलेले नाही. यामुळेच गेल्या वेळी खराब कामगिरी झालेल्या १२० पैकी काही मतदारसंघांमध्ये चांगली कामगिरी करण्याची पक्षाची योजना आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा, तेलंगण, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांमध्ये लोकसभेच्या १२५ जागा असून, तेथे भाजपची संघटनात्मक ताकद मर्यादित आहे. या राज्यांमध्ये भाजपने आता लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाच्या नेत्यांचे या राज्यांमध्ये दौरे वाढले असून, बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे विणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तमिळनाडूत कोणत्या तरी पक्षाला बरोबर घेऊन खासदारांचे संख्याबळ वाढविण्याची भाजपची योजना आहे. ईशान्येतील विजयाने भाजपची हवा तर तयार झाली आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत ही हवा कायम ठेवावी लागेल.