कौटुंबिक कलहाने समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव त्रासले असले तरी त्याची चिंता भाजपला सतावताना दिसते आहे. राज्यसभेत वेळोवेळी मदत करत असल्याने मुलायमसिंहांबद्दल कणव वाटते म्हणून नव्हे; तर या भाऊबंदकीने सपावरील विश्वास उडून मुस्लीम मते मायावतींकडे एकगठ्ठा झुकण्याची भीती आहे म्हणून..

तालमीत तयार झालेले मुलायमसिंह यादव हे मंडल आंदोलनाचे अपत्य. मंडल आणि ‘कमंडल’च्या वैचारिक आंदोलनात घुसळून निघालेल्या उत्तर प्रदेशातील सामाजिक-राजकीय मंथनातून मुलायमसिंह कधी ‘नेताजी’ झाले, हे कळलेच नाही. राममनोहर लोहियांचा हा समाजवादी पट्टशिष्य घराणेशाही आणि सरंजामशाहीला विरोध करीत इथपर्यंत पोहोचला आहे. पण गेल्या तीन दशकांत हेच समाजवादी नेताजी अतिघराणेशाहीचे ओंगळवाणे प्रतीक बनले आहेत.

त्यांच्या एका कुटुंबात एक मुख्यमंत्री, सहा खासदार, चार-पाच बडी खाती असलेला एक मंत्री, दोन आमदार, तीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अशी वीस बडी पदे आहेत. स्वत: मुलायमसिंह आझमगडचे खासदार. मुलगा अखिलेश मुख्यमंत्री. थोरली सून डिम्पल कनौजची खासदार, धाकटा भाऊ  शिवपाल उत्तर प्रदेशमधील सर्वात शक्तिशाली मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष, चुलतभाऊ  रामगोपाल राज्यसभेचे खासदार व दिल्लीतील चेहरा, तीन पुतणे लोकसभेत खासदार (लालूप्रसादांचे जावई तेजप्रतापसिंह मैनपुरीचे, धर्मेद्र यादव बदायँचे, अक्षय यादव फिरोजाबादचे खासदार. अक्षय हा रामगोपालांचा मुलगा). दोन पुतणे (अभिषेक यादव  व संध्या यादव) हे इटावा व मैनपुरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. याशिवाय अख्खा पक्ष खिशात. ‘कुटुंब रंगलंय राजकारणात’ अशा गोतावळ्यात मुलायमसिंहांचा धाकटा मुलगा प्रतीक मात्र या साऱ्यापासून दूर. तो व्यवसायात रमला आहे. पण त्याची पत्नी अपर्णा अत्यंत महत्त्वाकांक्षी. मुलायमसिंहांनी तिला लखनऊ कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारी दिली आहे. अपर्णा यांची आणखी एक ओळख म्हणजे त्या स्वयंघोषित ‘मोदी भक्त’ आहेत. याशिवाय सरकार व पक्षामध्ये असंख्य छोटय़ा-मोठय़ा पदांवर असलेल्या जवळच्या-दूरच्या नातेवाईकांची गणना खचितच नाही.

शारीरिक व वैचारिक कसरती करण्याचा मुलायमसिंहांचा अनुभव दांडगा असला तरी या भल्यामोठय़ा  ‘खटल्या’ला ते कसे सांभाळत असतील, ते देवच जाणो. कुटुंबातील धुसफुस कधी ना कधी बाहेर येणार, याची कल्पना सर्वानाच होती. पण ते इतक्या बीभत्स पद्धतीने बाहेर येतील आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर शीतयुद्ध संपून घनघोर लढाईला तोंड फुटेल, याची कल्पना कोणी केली नव्हती. एवढी बेदरकार भाऊबंदकी अगदी मुलायमांच्या राजकीय शत्रूंनाही अपेक्षित नसेल.

वडिलांविरुद्ध मुलगा, काका विरुद्ध पुतण्या, भावाविरुद्ध (चुलत)भाऊ  अशा ‘फ्री स्टाइल’ कुस्त्यांनी नेताजींच्या कुटुंबाचा आखाडा झाला आहे. या कुटुंबात उभी फूट पडली आहे. एका गटात शिवपाल आणि दुसरीकडे अखिलेश व रामगोपाल. या कुटुंबाचे सदस्य नसलेले, पण नेताजींना ‘आपल्या हृदयात (की खिशात!) घेऊन फिरणारे उपरे’ अमरसिंह हे शिवपालांच्या गटात. असेच कुटुंबासाठी उपरे असणारे; पण पक्षाच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग असलेले वादग्रस्त आझमखान हे अखिलेश- रामगोपालांच्या गटात. आणि या दोन्ही गटांना तोलून धरणारे शीर्षस्थ मुलायमसिंह. कधी या बाजूने, तर कधी त्या बाजूने. कुटुंबातील संघर्षांला खरी धार चढली ती अखिलेशसिंहांना मुख्यमंत्रिपदी बसविले तेव्हापासून. शिवपालसिंह मुलायमसिंहांची थेट प्रतिकृतीच. साम-भेद-दंड अशा कोणत्याही मार्गाने धसमुसळेपणाचे राजकारण करणारे शिवपाल हे खऱ्या अर्थाने वारसदार ठरायला हवे होते. पण अखिलेशांना वारसदार ठरविले गेले आणि शिवपाल बिथरले. तरीही त्यांनी पुतण्यासमोर शरणागती पत्करून क्रमांक दोन कसाबसा स्वीकारला; पण मजबूत खात्यांच्या बदल्यात. शिवाय प्रशासनावर, पक्षावर त्यांचीच पकड. यातून संघर्ष सुरू झाला आणि तो बघता बघता आता स्फोटाच्या उंबरठय़ावर पोहोचला.

असे सांगतात, की निमित्त झाले ते राजधानीतील एका पंचतारांकित मेजवानीचे. राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा यांच्या सन्मानार्थ दिलेल्या मेजवानीत अमरसिंह नेहमीप्रमाणे मुलायमांच्या कानाला लागले म्हणे. सोबतीला शिवपाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव दीपक सिंघलही होते. अखिलेशविरुद्ध मुलायमसिंहांचे कान भरण्यात या सर्वाचाच सहभाग असल्याचे सांगितले जाते. हे समजताच संतप्त झालेल्या अखिलेश यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी सिंघल यांची हकालपट्टी केली. मुलायम चिडले आणि त्यांनी अखिलेशची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करून तिथे शिवपालांना बसविले. मग वडिलांची कृती जिव्हारी लागलेल्या अखिलेश यांनीही ‘बंड’ केले आणि थेट शिवपालांकडून महसूल, पाटबंधारे व बांधकाम ही महत्त्वाची खाती काढून घेतली. पुतण्या-काकांतील संवाद तर कधीच संपला होता. आता या घटनेने पिता-पुत्रातीलही संवाद जवळपास बंदच झाला.

निवडणुकीला सात-आठ महिने शिल्लक राहिले असताना ही भाऊबंदकी उफाळून आल्याने समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची दातखीळच बसली आहे. काही जण त्यासाठी ‘रेकॉर्डिग आणि ब्लॅकमेलिंगचे हत्यार सांभाळणाऱ्या’ अमरसिंहांना दोषी धरत आहेत. पण मुलायम त्यांना दूर करण्यास तयार नाहीत. तमाशा झाल्यानंतर नेताजींनी आता कसाबसा तोडगा शोधला आहे. एकूण परिस्थिती पाहून त्यांना अखिलेशला झुकते माप द्यावे लागले आहे; पण शिवपालना दुखावणे अशक्य असल्याची जाणीवही त्यांना आहेच. म्हणून शिवपालांना खूश करण्यासाठी स्वत:च्या मुलाविरुद्ध ते कठोर शब्द वापरीत आहेत. या तात्पुरत्या तहाने वरवरची मलमपट्टी झाली असली तरी नेताजींची अब्रू जायची ती गेलीच. या कुटुंबकलहाने समाजवादी पक्षाच्या होणाऱ्या नुकसानीचे गणित मांडण्यात अनेक जण मग्न असताना भाजपच्या गोटात मात्र विचित्र शांतता पसरली आहे. ही यादवी आपल्याच मुळावर येण्याची भीती भाजपला वाटू लागली आहे. असे वाटण्याचे कारण तसे सोपे-सरळ आहे. मुलायमांचे राजकारण ‘एम-वाय’ (मुस्लीम- यादव) समीकरणावर पोसलेले आहे. बाबरी मशिदीच्या पतनानंतर मुस्लिमांना ‘मुल्ला मुलायमां’चा नेहमीच आधार वाटला आहे. पण त्यामागचा मुख्य आधार आहे तो भाजपविरोधाचा! समाजवादी पक्ष भाजपला रोखू शकत नसल्याचा संदेश ज्या क्षणी जाईल, त्या क्षणी हा समाज मायावतींच्याही मागे जाऊ  शकतो. मुलायमांच्या कुटुंबातील यादवीनंतर नेमकी हीच भीती भाजपला सतावते आहे. ‘अशा स्थितीत जर मुलायमसिंहांच्या हातातून मुस्लीम मतपेढी निसटू लागली तर मायावतींना आपसूकच मोठा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्यासाठी ही मोठी चिंतेची बाब आहे,’ असे भाजपचे एक सरचिटणीस सांगत होते. मुस्लीम मते एकगठ्ठा मायावतींकडे जाऊ  नयेत, यासाठी भाजप देव पाण्यात घालून बसला आहे. मुस्लीम मतांमधील फाटाफूट कशी पथ्यावर पडते, याची चव लोकसभेतील घवघवीत यशाने (राज्यातील ८० पैकी ७३ जागा) भाजपने चाखलेली आहे. म्हणून तर भाजपने आतापर्यंत मायावतींना थेट लक्ष्य करण्याचे टाळले आहे. आमची लढाई समाजवादी पक्षाशी असल्याचे भाजप घसा ओरडून सांगत आहे. यामागे समाजवादी पक्ष (अजूनही) भाजपला रोखण्याच्या स्थितीत असल्याचे मुस्लिमांवर बिंबविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

आतापर्यंतच्या तीन जनमत चाचण्यांमधून समाजवादी पक्ष व भाजपमध्ये स्पर्धा असल्याचे दिसते आहे. पण उत्तर प्रदेशातील विविध स्रोतांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, बहेनजी जोरात आहेत. त्यांच्या सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद खूप बोलका आहे. पण दयाशंकरसिंह प्रकरणानंतर त्यांचीही पंचाईत झाल्याचे दिसते आहे. मायावतींनी २००७ मध्ये दलित व ब्राह्मणांना एकत्र आणून नव्या सामाजिक अभियांत्रिकीचा आविष्कार घडविला होता. या वेळी मात्र ब्राह्मण सोबत येण्याची शक्यता नसल्याची जाणीव होताच मायावती मुस्लिमांशी धोरणात्मक युती करण्याची भाषा बोलू लागल्या आहेत. आतापर्यंत सावलीसारख्या असलेल्या सतीशचंद्र मिश्रांऐवजी त्या नसिमुद्दीन सिद्दिकींना बरोबर घेऊन फिरू लागल्या आहेत. सिद्दिकींना उपमुख्यमंत्री करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मुस्लिमबहुल शंभर मतदारसंघांमध्ये मुस्लिमांना उमेदवारी देण्याची शक्यता त्या अजमावून पाहू लागल्या आहेत. दलित व मुस्लीम राजकीयदृष्टय़ा शक्यतो एकत्र येत नसल्याचा अनुभव असला तरी मुलायमांच्या गृहकलहाने मायावतींच्या पदरी मुस्लीम मतांचे दान आयतेच पडण्याची शक्यता वाढली आहे. मायावतींचे नवे ‘डीएम’ (दलित-मुस्लीम) समीकरण मुलायमसिंहांना आतापर्यंत साथ दिलेल्या ‘एम-वाय’वर (मुस्लीम-यादव) महाग पडू शकते. भाजपचे नेमके हेच दुखणे आहे.

मायावतींचा ऐरावत रोखण्यासाठी भाजपला समाजवादी सायकलची गरज आहे. मायावती सत्तेवर येण्यापेक्षा ‘लवचीक’ समाजवादी भाजपला सोयीचे. थोडक्यात दगडापेक्षा वीट मऊ. त्यामुळे ‘सायकल’ मध्येच पंक्चर होणे भाजपला परवडणारे नाही. उच्चवर्णीयांची मोट बांधलेल्या भाजपचा डोळा ओबीसी व दलितांवर, हुकमाच्या एक्क्याच्या शोधात असलेल्या मायावतींचे लक्ष मुस्लिमांवर आणि त्रिशंकू स्थितीत हुकमाचे पान हातात ठेवण्यासाठी काँग्रेस उच्चवर्णीयांना साद घालत आहे. अशा स्थितीत मुलायमसिंहांना आपले ‘एमवाय’ गणित सांभाळून ठेवायचे आहे. त्यामुळेच, हा एके काळचा तेल लावलेला पैलवान प्रतिस्पध्र्याविरुद्ध कोणता डाव रचतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.

 

– संतोष कुलकर्णी

santosh.kulkarni@expressindia.com

 

Story img Loader