|| महेश सरलष्कर
भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान मोदींनी विकास, राष्ट्रवाद, हिंदुत्वाची पेरणी करत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा स्पष्ट केली. मतदारांना काँग्रेसची भीती दाखवत स्वत:चे नेतृत्व पक्के केले आणि तमाम कार्यकर्त्यांसमोर पक्षांतर्गत विरोधकांनाही इशारा दिला.
भाजपने राष्ट्रीय परिषद घेऊन तीन महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. हिंदी पट्टय़ातील तीन राज्ये गमावल्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राज्या-राज्यांमधील खासदार-पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर भाषणांमधून काँग्रेसवर टीकाटिप्पणी केली होती; पण मोदी-शहा यांनी एकत्रितपणे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला नव्हता. लोकसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांना थेट आवाहन करण्याची नेतृत्वाची राजकीय गरज होती, ती परिषदेच्या निमित्ताने पूर्ण झाली.
गेल्या साडेचार वर्षांमध्ये मोदी-शहांना राष्ट्रीय परिषद बोलावण्याची आवश्यकता नव्हती, कारण २०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर आल्यापासून भाजपने पराभव पाहिलेलाच नव्हता. पाच वर्षांचा कार्यकाळ संपता संपता मात्र काँग्रेसने मोदी-शहांना मोठा दणका दिला. या द्वयींची भाजपमध्ये ‘आदरयुक्त भीती’ आहे. त्यांना आव्हान देण्याची हिंमत खासगीतदेखील कोणी करत नव्हते; पण तीन राज्ये गमावल्यानंतर मोदी-शहांच्या नेतृत्वाविरोधात उघडपणे बोलले जाऊ लागले होते. पराभवाची जबाबदारी नेतृत्वाने घेतली पाहिजे, नेतृत्व बदलले पाहिजे असे नाराजीचे सूर निघू लागले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नाही तर ‘एनडीए’तील घटकपक्ष दबाव आणतील, मग मोदींना पर्याय शोधला जाऊ शकतो, अशीही चर्चा सुरू होती. या कथित आव्हानांवर मोदी-शहांनी जाहीरपणे कोणतेही भाष्य केलेले नव्हते. राष्ट्रीय परिषदेत अंतर्गत विरोधकांना शहांच्या भाषणाद्वारे मोदींनी सडेतोड उत्तर दिले. आपल्याला आव्हान देण्याचे धाडस दाखवू नका, असा संदेश मोदींनी दिलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील विरोधक मोदींना कसे प्रत्युत्तर देतात हा भाग वेगळा!
राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाच्या अमित शहा यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू नरेंद्र मोदींचे नेतृत्व हाच होता. त्यांच्या भाषणाचे सार मोदींच्या नेतृत्वाला पर्याय नाही आणि त्यांना आव्हान देण्याचा कोणी प्रयत्न करू नये हे होते. परिषदेत व्यासपीठावर मोदीविरोधकांना स्थान देण्यात आलेले होते. लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, राजनाथ सिंह हे विरोधक मोदींच्या आजूबाजूलाच बसलेले होते. या मंडळींमध्ये अरुण जेटलींचाच अपवाद होता. शहांचे म्हणणे होते की, काही क्षण ऐतिहासिक असतात, ते देशाला दिशा देणारे ठरतात. सर्जिकल स्ट्राइक, जीएसटी, नोटाबंदी, तिहेरी तलाक, नागरिकत्व कायदा, आर्थिक दुर्बल सवर्णाना आरक्षण हे मैलाचा दगड ठरणारे क्षण मोदींच्या नेतृत्वाने दिलेले आहेत. एका पंतप्रधानाच्या केवळ साडेचार वर्षांच्या काळात इतके दिशादर्शक क्षण कोणा पंतप्रधानांनी दिलेले नाहीत. मोदी हेच भाजपचा कणा आहेत. त्यांचे नेतृत्व मान्य करून लोकसभा निवडणुकीला सामोरे गेल्यास विजय मिळू शकेल.. शहांनी अप्रत्यक्षपणे मोदी हे भाजपपेक्षा मोठे असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न केला. जेटलींनी आपल्या भाषणात शहांची री ओढली! भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी अजूनही मोदी हेच सर्वात लोकप्रिय आणि निवडणूक जिंकून देणारे नेते आहेत. त्याची प्रचीती परिषदेत आली. शनिवारी परिषदेची सांगता मोदींच्या भाषणाने होणार असल्याने कार्यकर्ते ताटकळत बसले होते. मोदींच्या आधी काही नेत्यांची भाषणे झाली. साडेबारा वाजता सुरू होणारे भाषण अर्धा तास उशिरा सुरू झाले. जसजसा उशीर होत गेला तसे कार्यकर्ते ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी करायला लागले. मग मोदींनी भाषणात आपले नेतृत्व खुंटी हलवून बळकट केले.
कोणत्याही लोकप्रिय नेत्यावर शंका घेतली जाते तेव्हा तो लोकांच्या समोर उभा राहून आपली गरज सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. मोदींनीही तेच केले. मोदी म्हणाले की, बूथ स्तरावर पक्ष मजबूत करा. भाजपचे भक्कम संघटन माझ्यामागे आहे म्हणून मी आहे. मोदी सगळ्या समस्या सोडवेल असे गृहीत धरू नका. पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करा.. कुठलाही महत्त्वांकाक्षी नेता कार्यकर्त्यांसमोर नम्रता दाखवतो. मोदीही कार्यकर्त्यांसमोर नम्र झाले. त्यांनी जिजाऊंना वंदन केले. छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगितली. डॉ. आंबेडकरांच्या कर्तृत्वाची आठवण करून दिली. विवेकानंदांना नमन केले. या थोरामोठय़ांकडून मिळालेल्या प्रेरणेतून सुराज्य आणण्याचा, नवभारत घडवण्याचा संकल्प मोदींनी केला. हमखास यशस्वी ठरणारी मोदींची ही भाषा कार्यकर्त्यांना आवडली, त्यांनी मोदींचा जयघोष केला. कार्यकर्त्यांचा हा प्रतिसाद व्यासपीठावर बसलेले विरोधकही पाहात होते. मोदींच्या भाषणाआधी विरोधकांचीही भाषणे झाली, त्यात त्यांनीही मोदींच्या ‘यशस्वी’ नेतृत्वाचा उल्लेख केला. परिषदेत मंजूर झालेल्या राजकीय ठरावात काँग्रेसला लक्ष्य बनवले गेले आहे. प्रादेशिक पक्षांपेक्षा काँग्रेसच्या जागा कमी करण्यावर अप्रत्यक्षपणे प्रस्तावात भर दिलेला आहे. विरोधकांची महाआघाडी फक्त मोदींना विरोध करण्यासाठीच उभी राहिली असल्याचा मुद्दा प्रस्तावात मांडलेला आहे. इथेही मोदीच केंद्रीभूत आहेत. अर्थातच या प्रस्तावाला वरिष्ठ नेत्यांची सहमती आहे.
विरोधकांना उत्तर देता देता मोदींनी पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेवत थेट देशवासीयांशी ‘मन की बात’ केली. काँग्रेसच्या दोषांवर बोट ठेवत देशाला आपल्याच नेतृत्वाची गरज का आहे, हे ठसवण्याचा प्रयत्न मोदींनी बेमालूमपणे केला. मोदींनी मतदारांना काँग्रेसची भीती घातली. आठवा काँग्रेसची दहा वर्षे. देश काळोखात गेलेला तुम्ही पाहिला आहे. भारत पुन्हा काळोखात जायला हवा आहे का? काँग्रेसची राजवट भ्रष्टाचारी होती. आठवा टू जी घोटाळा, ऑगस्टा हेलिकॉप्टरमधील दलाली. राफेलमधील दलाली. भ्रष्टाचारमुक्त असे एकमेव माझेच सरकार आहे. काँग्रेस सत्तेवर आला तर पुन्हा भ्रष्टाचार सुरू होईल.. वगैरे. तुमच्या पुढे काँग्रेस नव्हे, माझे नेतृत्व हाच पर्याय ठरतो, हा संदेश मोदींना आपल्या भाषणातून द्यायचा होता. काँग्रेसवर आरोप करता करता त्यांनी पुन्हा राष्ट्रवादाला हात घातला. सांस्कृतिक राष्ट्रवादाचा उल्लेख शहा यांनी आधीच केलेला होता. काँग्रेस राष्ट्रवादी नसल्याचे मोदींचे म्हणणे होते. काँग्रेसला देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे कौतुक नाही. काँग्रेसच्या मंडळींना शेजारचे राष्ट्र अधिक जवळचे वाटते. आपल्याच देशातील सत्ताधाऱ्यांच्या कागाळ्या केल्या जातात.. अशी अनेक वाक्ये मोदींनी भाषणात पेरलेली होती. जनसमूहाला आपलेसे करणारी ही सगळी निव्वळ टाळ्यांची वाक्ये होती. त्यावर आता काँग्रेसला स्पष्टीकरण देत बसावे लागेल.
पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पानिपतच्या लढाईचा केलेला उल्लेख राष्ट्रवादाला आळवणी घालणारा होता. पानिपतात मराठे हरले आणि देशाला दोनशे वर्षे गुलामगिरी सहन करावी लागली, असे शहा म्हणाले. लोकसभेची निवडणूक भाजपसाठी पानिपतची लढाई आहे, ती जिंकली की पुढील पन्नास वर्षे भाजपचेच राज्य असेल, असे शहांना ठसवायचे आहे. पुढचे अर्धशतक भाजपचे असेल, असे शहांनी यापूर्वीही अनेकदा सांगितलेले आहे; पण पानिपतचा संदर्भ देऊन लोकसभेची निवडणूक भाजपसाठी अवघड बनली असल्याची बाब अधोरेखित होते. मोदींचे भाषण होण्यापूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये सप-बसपच्या जागावाटपांचे वृत्त आले. सप-बसप युतीने काँग्रेसला स्थान दिलेले नाही. भाजपचा भर काँग्रेसविरोधावर आहे; पण उत्तर प्रदेशात भाजपला सप-बसप युतीशी लढावे लागणार आहे आणि हेच राज्य भाजपसाठी चिंतेची बाब बनले आहे. यादव, दलित, मुस्लीम मतदारांनी एकत्रितपणे भाजपविरोधात मतदान केले तर शहांना अपेक्षित असलेल्या ७४ जागा उत्तर प्रदेशात भाजपला मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळेच मोदी-शहांना राम मंदिराचा मुद्दा भाषणांमध्ये उपस्थित करावा लागला. उर्वरित भारतात राम मंदिरावर मते मिळणार नाहीत याची भाजपला खात्री असल्यानेच हा मुद्दा पक्षनेतृत्वाने न्यायालयावर सोडलेला आहे. मोदींच्या भाषणातही राम मंदिरापेक्षा विकास आणि त्यात काँग्रेस कसा आडकाठी आणत आहे हे सिद्ध करण्यावर होता.
हिंदी पट्टय़ातील पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या मनातील विविध शंकांना विराम देण्याची आणि त्यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी नवा उत्साह निर्माण करण्याची गरज होती. शिवाय, मोदी-शहांना पक्षांतर्गत विरोधही मोडून काढायचा होता. या दोन्ही गोष्टींसाठी मोदी-शहांनी राष्ट्रीय परिषदेचा पुरेपूर वापर करून घेतल्याचे पाहायला मिळाले. भाजपला निवडणुकीच्या रिंगणात उतरवताना मोदींच्या नेतृत्वाला पर्याय नसल्याची बाब मतदारांपर्यंत पोहोचवायची होती. त्यासाठीदेखील ही परिषद उपयोगी ठरली.
mahesh.sarlashkar@expressindia.com