पाच दशकांहून अधिक काळ निरीश्वरवादी द्रविडी विचारधारेमध्ये अडकलेल्या  तमिळनाडूमध्ये आध्यात्मिक राजकारणाचा जयघोष करीत रजनीकांत यांनी एकदाचा राजकारण-प्रवेशाचा बिगूल फुंकलाय. सर्व आव्हानांवर मात करून तो यशस्वी झालाच तर तेथे बिगरद्रविडी राजकारणाचा श्रीगणेशा होऊ  शकतो.. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘मी कधी येईन, कसा येईन हे कोणालाच सांगता येणार नाही. पण गरज निर्माण झाल्यास आणि योग्य वेळ आल्यास मी नक्की येईन..’’

गाजलेल्या ‘मुथू’ या तमिळ चित्रपटातील ही जबरदस्त हिट झालेली शब्दफेक. ती अर्थातच होती ‘सर’ रजनीकांत यांची. १९९५ दरम्यानचा तो सगळा काळ रजनीकांत यांनी भारावून सोडलेला. तमिळनाडू हे भारतातील वैशिष्टय़पूर्ण राज्य. तिथलं राजकारण तर अधिक वैशिष्टय़पूर्ण. सामाजिक चळवळी, निरीश्वरवादावर आधारलेली द्रविडी विचारधारा, नाटक, चित्रपट या चार खांबांवर ते रेललेलं. रजनीकांत यांच्या राजकारण-प्रवेशाच्या अटकळीसाठी त्यांची तुफान लोकप्रियता अगदी पुरेशी होती. त्यादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप चांगलेच गाजत होते. ‘‘आता देवही अण्णाद्रमुकचं रक्षण करू शकणार नाही..,’’ एवढंच त्यांचं वाक्य १९९६ मध्ये जयललितांच्या पराभवासाठी पुरेसं ठरलं होतं. त्याच्या राजकीय ताकदीचा तो पहिला प्रयोग होता आणि तो त्याच्या चित्रपटासारखाच हिट ठरला होता. त्यामुळे रजनीकांतच्या राजकीय प्रवेशाची औपचारिकताच राहिल्यासारखं मानलं जात होतं. पण अटकळी अटकळीच राहिल्या. रजनीकांत राजकारणाच्या उंबरठय़ावर कायम राहिला; तो त्याने काही ओलांडला नाही.

राजकारण-प्रवेशाची ती संधी सोडून दोन दशकांहून अधिक काळ लोटलाय आणि आता ‘मुथू’च्या शब्दफेकीचा आधार घेत, ‘मी आलोय.. योग्य वेळी आलोय’ अशी ललकारी त्यानं २०१७च्या शेवटच्या दिवशी फुंकली आणि तमिळनाडूच्या राजकारणात एकदमच तिसरा कोन तयार होण्याच्या शक्यतेने सगळेच जण चाचपडताहेत. आतापर्यंत काँग्रेस आणि आता भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांची तमिळनाडूइतकी दयनीय अवस्था अन्यत्र कुठे नसेल. २०१६च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १८८ जागा लढविल्या होत्या. पण एकूण मतं मिळाली उणीपुरी १२ लाख २८ हजार. केवळ २.६४ टक्के. कन्याकुमारीचं ‘बेट’ वगळता भाजपला पाय रोवण्यासही तमिळनाडूमध्ये स्थान नाही. त्याचं कारण सोपं आहे. भाजपच्या राजकारणाचा गाभा आणि प्रतिमा धर्माभोवती, धार्मिक मुद्दय़ांभोवती, हिंदू अस्मितेभोवती फिरणारी. तमिळनाडूला या सर्वाची सक्त घृणा. द्रविडी राजकारणात निरीश्वरवादाला सर्वात मोठे स्थान. त्याचमुळे आजपर्यंत द्रमुक आणि अण्णाद्रमुकला पर्याय निर्माण करण्याचे सर्व प्रयत्न फसले. पण नोंद घेण्यासारखा मुद्दा असा, की ते सारे प्रयत्न द्रविडी राजकारणाच्या मुशीतूनच तयार झालेले होते. पण रजनीकांत तर कदाचित बिगरद्रविडी पर्याय देऊ  पाहताहेत, असं एकंदरीत दिसतंय. कारण आपला राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या कार्यक्रमात रजनीकांत यांचे दोन उल्लेख अतिशय महत्त्वाचे होते. एक म्हणजे थेट भगवद्गीतेचा संदर्भ आणि दुसरे म्हणजे, धर्म आणि जातींच्या आधारावर नसलेलं आध्यात्मिक राजकारण करणार!

१९२० दरम्यानच्या सामाजिक चळवळीनंतर तमिळनाडूमध्ये रजनीकांत कदाचित पहिलाच नेता असेल, की जो आध्यात्मिक राजकारणाची भाषा करण्याची हिंमत दाखवतोय. त्याने चलाखीने धर्माची भाषा केली नाही; पण निरीश्वरवादाचाही अजिबात उल्लेख केला नाही. धर्म आणि निरीश्वरवाद या दोन टोकांमधील अवकाश भरून काढण्यासाठी त्याने आध्यात्मिक हा शब्द जाणीवपूर्वक वापरलाय. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास तो कदाचित बिगरद्रविडी राजकारणाचा श्रीगणेशा करू पाहतोय. त्याच्या भाषणात ‘तुघलक’चे संपादक चो रामस्वामींचा असलेला उल्लेखसुद्धा महत्त्वपूर्ण. दिवंगत रामस्वामी हे भाजपचे मार्गदर्शक आणि संघ परिवाराशी घनिष्ठता सांगणारा सर्वपरिचित चेहरा. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तर त्यांचा आणखीनच घरोबा. हे सगळे संदर्भ रजनीकांतचा कल भाजपकडे असल्याचं सरळसरळ दाखविणारं आहे. रजनीकांतच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन तिथं घुसण्याचे भाजपचे मनसुबे आहेतच; पण ते व्यवहार्य नसल्याची जाणीव स्वत: भाजपलाही आहे. कारण भाजपची विचारधारा स्वीकारण्याची मानसिकता अजूनही तमिळींची नाही. म्हणून भाजपच्याच काही नेत्यांनी नवा पक्षाचा किंवा थेट अण्णाद्रमुकला गिळंकृत करण्याचा सल्ला रजनीकांतांना दिला होता. त्यामुळेच रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाने द्रमुक, अण्णाद्रमुक, काँग्रेसची पोटं दुखली; पण भाजपने मात्र जवळपास स्वागतच केलं.

आजमितीला तमिळनाडूत कधी नव्हे एवढी अफाट राजकीय पोकळी आहे. जयललिता निवर्तल्या, जर्जर एम. करुणानिधी आता जवळपास अंथरुणाला खिळलेत, अण्णाद्रमुकवर कब्जा मिळवू पाहणाऱ्या शशिकला तुरुंगात आहेत, अण्णाद्रमुकची अवस्था अक्षरश: धर्मशाळेसारखी झालीय. रजनीकांत यांना अपेक्षित असलेली हीच ‘योग्य वेळ’ असेल का? कारण सध्याची पोकळी त्यांना चांगलीच खुणावत असल्याचं दिसतंय. राजकीयदृष्टय़ा ती एकदम उत्तम चाल आहे. पण..

पडद्यावरील जबरदस्त लोकप्रियता एवढंच रजनीकांतचं भांडवल. रजनीकांत शिखरावर असताना म्हणजे सुमारे वीस वर्षांपूर्वी राजकारणात आला असता तर त्याने एमजीआर, करुणानिधी, जयललितांचा कित्ता गिरविला असता कदाचित. पण २०१८ मध्ये श्रीगणेशा करून २०२१ मध्ये तसं होईल की नाही, हे ठामपणे सांगता येणार नाही. त्याच्या समोर चार प्रमुख आव्हानं असतील. तो जी आध्यात्मिकतेची भाषा करतोय आणि भाजपशी पूरक असलेल्या राजकारणाची हूल उठवतोय, ती तमिळनाडूला वैचारिकदृष्टय़ा, सामाजिकदृष्टय़ा आणि सांस्कृतिकदृष्टय़ा झेपेल का? एका अर्थाने हा मोठा जुगार त्याने खेळलाय. तमिळनाडूमध्ये द्रविडी राजकारणाला पर्याय शोधताना बिगरद्रविडी विचारांचं साधं सूतोवाच करणदेखील राजकीयदृष्टय़ा आत्महत्या करण्यासारखं आहे. पण ते धाडस त्यानं दाखवलंय. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोनच पर्यायांना कंटाळलेल्या तमिळींना आध्यात्मिकतेचं राजकारण करू पाहणारा रजनीकांत आपलासा वाटेल का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

रजनीकांतसमोरील दुसरं आव्हान म्हणजे त्याची बिगरतमिळ पाश्र्वभूमी. आपल्या सर्वानाच माहीत आहे रजनीकांत हे खरं तर शिवाजीराव गायकवाड. बेंगळूरुमधील एका मराठी कुटुंबात जन्मलेले आणि त्यांचं मूळ कुटुंब पुण्याजवळील सासवडचं. भाषिक अस्मिता टोकाची व तीव्र असलेला तमिळनाडू रजनीकांतला राजकीयदृष्टय़ा स्वीकारेल का? चाहत्यांचं प्रेम पाहता, त्याची स्वीकारार्हता मोठी असण्याचं अनुमान निघू शकतं.

तिसरी उणीव म्हणजे संघटन. रजनीकांत गावागावांमध्ये, चाहत्यांच्या हृदयापर्यंत पोचलाय. पण राजकीय पक्ष उभा करणं सोप्प नसतं. पडद्यावरील सुपरस्टार हा काही राजकीय हमखास यशाचा ‘पासवर्ड’ होऊ  शकत नाही. हवं असेल तर ‘नाडिगर तिलकम’ (अभिनेत्यांमधील रत्न) शिवाजी गणेशन यांच्यापासून ते विजयकांतपर्यंतच्या अनेक स्टार्सची राजकीय कारकीर्द तपासून पाहता येईल. अगदी चिरंजीवीसारख्या तेलगू मेगा सुपरस्टारलादेखील तीन वर्षांतच आपल्या राजकीय पक्षाचं चंबूगवाळं आवरून काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागलं होतं. रजनीकांतकडे ‘रासिकर मंत्रम’ची (फॅन क्लब्ज) मोठी यंत्रणा आहे. पण चाहत्यांची झुंड वेगळी आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या फौजेची पद्धतशीर यंत्रणा वेगळी. ती उभी करण्यासाठी तीन वर्षांचा वेळ रजनीकांतकडे आहे. पण तरीसुद्धा ते मोठं शिवधनुष्य राहील.

आणखी एक मोठं छुपं संकट रजनीकांतसमोर आ वासून उभं आहे. त्याचा फार बोलबाला नाही. अगदी निवडक वर्तुळात त्याची वाच्यता आहे. त्यानुसार, रजनीकांतची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. त्यात तथ्य असेलच तर राजकीय पक्ष जन्माला घालण्यासाठी लागणारा अवाढव्य पैसा उभा करताना त्याच्या नाकीनऊ  आल्याशिवाय राहणार नाही.

राजकीय बदलांवर स्वार होऊ  पाहणाऱ्या ६५ वर्षीय रजनीकांत यांच्यासाठी ही संधी ‘आता नाही, तर कधीच नाही’ अशा स्वरूपाची आहे. रजनीकांतसमोर आणखी एक आव्हान उभं राहू शकतं. ते कदाचित असेल लोकप्रिय अभिनेते कमल हासन यांचं. हासन यांनीसुद्धा राजकारण प्रवेशाचे स्पष्ट संकेत द्यायला सुरुवात केलीय. तसं झालं तर एकीकडे द्रमुक आणि अण्णाद्रमुकशी लढावं लागेल, तर दुसरीकडे कमल हासनसारख्या तितक्याच ताकदीच्या अभिनेत्याशी दोन हात करावे लागतील. रुपेरी पडद्यावर प्रत्येक वेळी ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ हाउसफुल्लची सवय असलेल्या रजनीकांत यांचा राजकारणातील ‘फर्स्ट शो’ तितकाच हिट होईल का..?

लाखमोलाचा प्रश्न आहे हा. केवळ तमिळ राजकारणापुरता नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणासाठीदेखील. तमिळनाडू लोकसभेमध्ये चाळीस खासदार पाठविते, हे लक्षात ठेवलेलं बरं.