समाजवादी पक्षातील किळसवाण्या भाऊबंदकीमुळे २०१७ मधील निवडणुकीत अखिलेश यांना कदाचित फटका बसू शकतो; पण दीर्घकालीन राजकारणाचा विचार करता कुटुंबातील ही उभी फूट त्यांच्या पथ्यावरच पडू शकते.
२०१४ मधील ऑगस्टचा पहिला आठवडा असावा. नरेंद्र मोदी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होते. वातावरणात सर्वत्र मोदींची हवा होती. संसद त्यास अपवाद नव्हती. त्या वेळी संसदेच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या समाजवादी पक्षाच्या संसदीय कार्यालयामध्ये मुलायम सिंह हताश आणि निराशपणे बसले होते. उत्तर प्रदेशामध्ये झालेल्या न भूतो, न भविष्यती अशा र्सवकष पराभवाने त्यांना अंतर्बाह्य़ धक्का बसलेला दिसत होता. मोदी त्सुनामीचे कोडे त्यांना उलगडत नव्हते. भाजपला ८० पकी ७३ जागा. छे, छे. त्यांचा विश्वासच बसत नव्हता. दोन वर्षांपूर्वी विधानसभेला जबरदस्त यश मिळविलेल्या समाजवादी पक्षाला फक्त पाच जागा. त्याही मुलायमांच्या कुटुंबातील उमेदवार होते तिथे.
‘‘ये कैसा संभव है..?’’ त्या कार्यालयात खिन्नपणे बसलेले मुलायम काही मूठभर पत्रकारांना विचारत होते. ‘‘अखिलेश गेल्या दोन वर्षांपासून नुसता तरुण, तरुण करतो आहे; पण या तरुणांना मोदींनी कधी पळविले तेसुद्धा कळले नाही. तरुणांच्या नादाला लागून जुन्याजाणत्यांना बाजूला करण्याची चूक भोवली..,’’ ते बरेच काहीबाही बोलत होते. त्यांच्या तोंडून अनेक गोष्टी ऐकल्यावर आपल्या मुलाच्या क्षमतेबाबत त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह उमटायला लागल्याचे स्पष्टपणे दिसत होते. किंबहुना अविश्वासाची बीजे पेरली गेल्याचेही जाणवले. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी अखिलेशवर जाहीर हल्ला चढविला. ‘‘तुझ्यामुळे (लोकसभेतील पराभवाने) पंतप्रधानपदाचे माझे स्वप्न कायमचे भंगले,’’ अशी बोच त्यांनी उघड केली. त्यानंतर वेळोवेळी ते अखिलेशना कानपिचक्या देत. नेताजींनी शेवटी स्वत:च्या मुलालाच वारस केल्याची सल असलेले आपले बंधू शिवपालांना चुचकारण्यासाठी ते असे बोलायचे. फाटाफुटीच्या उंबरठय़ावरील कुटुंबात समतोल साधण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. पण ही कसरत फार काळ चालणार नसल्याचेही जाणवायचे. स्वाभाविकपणे कुटुंबात उभी फूट पडत चालली होती. अखिलेश, मुलायमांचे चुलत बंधू प्रा. रामगोपाल यादव एकीकडे आणि मुलायमांची दुसरी पत्नी साधना गुप्ता-यादव (छुप्यापणाने) आणि शिवपाल दुसऱ्या बाजूला. स्वत: मुलायम तराजू तोलायला. कधी इकडे, कधी तिकडे. त्यातच अमरसिंहांच्या ‘पक्षवापसी’ने आधीच गढूळलेल्या वातावरणात अविश्वासाची भर पडली. घरे फोडणारे अशी अमरसिंहांची प्रतिमा. तरीही अखिलेश, रामगोपाल व आझम खान यांचा तीव्र विरोध डावलून नेताजींनी त्यांना पावन केले. अमरसिंहांवरील या जिवापाड प्रेमाचे रहस्य स्वत: मुलायमांनी उघड केले. अमरसिंह नसते तर सात वष्रे तुरुंगात खडे फोडत बसावे लागले असते, असे त्यांनी जाहीरपणे अखिलेशना सुनावले. पण दिल्लीमध्ये अशी ‘सेटिंग’ लावण्याबरोबरच अमरसिंह नेताजींसाठी ‘आणखी खूप काही’ करतात. त्याबद्दल न बोललेले बरे.
धुमसत होतेच. त्यानुसार भडका उडालाच. जितकी मुलायमांची घराणेशाही ओंगळवाणी, त्यापेक्षा भाऊबंदकी किळसवाणी. सर्वासमक्ष काका आपल्या मुख्यमंत्री पुतण्याला धक्काबुक्की करतो काय, त्याच्या हातातील माइक हिसकावून घेतो काय.. लखनौ व सफईमधील (मुलायमांचे गाव) यादवकुळातील या नाटय़ाने अनेकांना रामायण, महाभारतातील अनेक पात्रांची आठवण झाली.असो.
कुटुंबकलहात मुलायम अखिलेशऐवजी शिवपालांच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र आहे. पण अनेकांना तो एके काळचे पलवान असलेल्या मुलायमांचा धोबीपछाड वाटतोय. आपल्या मुलाचा मार्ग कायमस्वरूपी प्रशस्त करण्यासाठी शिवपालबरोबर नुरा कुस्ती घडविल्याचा डाव. ही ‘थिएरी’ मांडणाऱ्यांच्या मते, मुलायम अशा पद्धतीने खेळले की अंतिमत: सहानुभूती अखिलेशना मिळाली आणि शक्तिशाली मंत्रिपदे गमावून शिवपालना हात चोळत बसावे लागले. पण यात फार दम नाही वाटत. अशा वादळी नाटय़ाचे दिग्दर्शन सोपे नसते. कोणत्याही क्षणी हातातून सुकाणू निसटण्याचा धोका असतो. पण मुलायम ‘उत्तर प्रदेशचे शरद पवार’. महाराष्ट्रात काहीही खट्ट घडले की बहुतेकांना त्यात पवारांचा हात दिसतो. तसेच मुलायमांचे आहे. कोणताही डाव टाकण्याच्या नेताजींच्या क्षमतेवर भय्या मंडळींचा अतीव आणि अतिरंजित विश्वास आहे.
पण हा डाव असो किंवा ‘हाताबाहेर गेलेल्या मुला’मुळे आलेली असहायता असो. खरोखरच यात बाजी मारली ती अखिलेशनीच. बहुतांश आमदार पाठीशी आहेत म्हणून नव्हे तर स्वत:च्या नावावर मते मिळविण्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलाय म्हणून. मुलायमांपाठोपाठ मते खेचणारे अखिलेश एकमेव. मग भले पक्ष शिवपाल चालवीत असतील. ते मुलायमांच्या जातकुळीतील. धाकदपटशाच्या राजकारणात त्यांचा हातखंडा. साम, दाम, दंड, भेद पद्धतीचे त्यांना वावडे नाही. पसा व गुंडगिरी ही त्यांची दोन शस्त्रे. नेताजींनी याच बळावर राजकारण केलेले. पण ही गुंडागर्दीची प्रतिमा अखिलेश बदलू पाहतोय. मुलायमांच्या दरबारातील अनेक गुंडपुंड मानकऱ्यांना अखिलेशने बऱ्यापकी खडय़ासारखे बाजूला ठेवलंय. डी. पी. यादवासारख्या कुख्यात डॉनला शेवटपर्यंत समाजवादी पक्षात पावन करून घेऊ दिले नाही. जेलबंद मुख्तार अन्सारी या गुंडाच्या कौमी एकता दल या कडव्या मुस्लीम पक्षाला सामावून घेण्यास शेवटपर्यंत विरोध केला. या सर्वातून अखिलेशने स्वत:ची मवाळ प्रतिमा उभी केली. त्यावर आधुनिकतेची रंगरंगोटी केली. मोदी लाटेचा धडा घेऊन केलेल्या व न केलेल्या कामांचे उत्तम मार्केटिंग चालू केले. भले युवा वर्ग लोकसभेला मोदींमागे गेला असेल. पण त्यांच्यामध्ये अखिलेशनी स्वत:ची मतपेढी बांधल्याचे दिसते. त्यातूनच यादव व मुस्लीम (एम-वाय) या पारंपरिक मतपेढीची मर्यादा ओलांडली. समाजवादी पक्षाच्या बीभत्स चेहऱ्याची अॅलर्जी असलेल्या अनेकांना मवाळ व आधुनिक अखिलेशचा चेहरा बऱ्यापकी भावतो. हे नेपथ्य अगोदरच तयार केल्याने भाऊबंदकीच्या नाटय़ातून सर्वाधिक सहानुभूती अखिलेशना मिळविता आली. त्यामुळे २०१७ मधील निवडणुकीत कुटुंबकलहामुळे अखिलेशना कदाचित फटका बसू शकेल; पण दीर्घकालीन राजकारणाचा विचार करता ही उभी फूट अखिलेशच्या पथ्यावरच पडेल. वय त्यांच्या बाजूने आहे. मुलायमांच्या पश्चात त्यांचेच नेतृत्व सर्वमान्य राहणार असल्याचे सुस्पष्ट दिसते आहे. कारण मुलायमांबरोबरच शिवपालांचीही उपयुक्तता संपेल आणि शेवटी जो जिंकेल, त्याबरोबर मुलायम राहतील. घर भी मेरा, घाट भी मेरा..
या यादवीच्या परिणामांची चर्चा राजधानीत झडू लागली आहे. संभाव्य पडझडीच्या भीतीने बिहारच्या धर्तीवर उत्तर प्रदेशात महाआघाडी करण्याचे मुलायमांचे मनसुबे आहेत. त्यासाठी अजितसिंहांचा राष्ट्रीय लोकदल, नितीशकुमारांचा संयुक्त जनता दल, लालूप्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर काँग्रेसचीही मोट बांधण्याची धडपड चालली आहे. समाजवादी सावलीत जायला इतरांना अडचण नाही; पण काँग्रेस संभ्रमात आहे. स्वबळावरील सत्तेची भाषा केल्यानंतर ४१७ पकी शंभरच्या आसपास जागा लढण्यास राहुल गांधी कितपत तयार होतील? शिवाय, शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले आहे. मग त्यांचे काय करायचे? त्यामुळे काँग्रेसचे सध्या ‘कभी हाँ, कभी ना’ असे चालले आहे. शिवाय महाआघाडीसाठी पुढाकार शिवपालांचा आहे. त्याकडे अखिलेश कसे पाहतात, यावर बरेच काही अवलंबून असेल. तसेच महाआघाडी करायची झाल्यास समाजवादीच्या वाटय़ाला अडीचशेच्या आसपास जागा येतील. ते तर सुमारे साडेतीनशे उमेदवार यापूर्वीच जाहीर करून बसले आहेत. थोडक्यात हे कडबोळे कसे आकार घेते ते महत्त्वाचे. याउपर मुलायम बेभरवशी. महाआघाडीला धोबीपछाड कधी देतील, याचा नेम नाही. दुसरीकडे अखिलेशच्या गोटाचे अघोषित सेनापती रामगोपाल यादवांच्या निवडणूक आयोगाकडील चकरा वाढल्या आहेत. त्याने अखिलेश नवा पक्ष काढणार असल्याच्या चच्रेला चांगलेच वंगण मिळत आहे. तसे झाले तर मुलायमांचा समाजवादी पक्ष इतिहासजमा झाल्याशिवाय राहणार नाही. नव्वदीच्या दशकात मुलायमांनी एकसंध जनता दलाला असेच इतिहासजमा केले होते.
दुसरीकडे, मायावती व भाजपमधील अस्वस्थता वाढली आहे. आतापर्यंतच्या जनमत चाचण्यांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा दाखविल्या जात आहेत. पण समाजवादी फाटाफुटीने मुस्लीम मते मायावतींकडे जाण्याच्या भीतीने भाजपला ग्रासले आहे. मायावतीही मुस्लीम मतांचा आक्रमकपणे पाठलाग करत आहेत. त्यांच्या सभांमध्ये आता तर थेट कुराणपठण केले जाते आणि पवित्र हादिसमधील वचनांचा हवाला देऊन बसपासाठी मते मागितली जातात. याउलट भाजपचा डोळा फुटीर यादव मतांवर राहील.
उत्तर प्रदेशातील सद्य:स्थितीच्या वर्णनासाठी एकच शब्द पुरेल : संभ्रम, संभ्रम आणि संभ्रमच..
हा धूसरपणा संपण्यास आणखी काही काळ लागेल. तोपर्यंत वाट पाहिलेलीच बरी.
santosh.kulkarni@expressindia.com