दिल्लीत पूर्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांना दिवंगत यशवंतराव चव्हाणांचा आधार वाटायचा. आता ती जागा शरद पवारांनी घेतलीय. त्यांच्याबद्दल बिगरराजकीय आदरभाव असतो, त्यांची उत्तुंगता भारून टाकते; पण त्याच वेळी धोबीपछाडच्या शंकेनेही ग्रासलेले असते. म्हणजे एकाच वेळी आदर, आस्था, शंका-कुशंका, भीती अशा उलटसुलट भावनांच्या कल्लोळात सर्वपक्षीय खासदारमंडळी पवारांच्या छायेत वावरत असतात.. 

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांच्या पुढाकाराने ‘सॅटर्डे क्लब’ चालतो. पण या क्लबला पक्षीय रंग नाही. त्यात सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकत्रे, अधिकारी, पत्रकार अशी मंडळी आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘सॅटर्डे क्लब’ दिल्लीत आला होता. स्वाभाविकपणे शरद पवारांनी ‘६, जनपथ’ या आपल्या निवासस्थानी स्नेहभोजन ठेवले होते. प्रफुल्लित मूडमधील पवारांनी मफलीचा ताबा जणू स्वत:कडेच घेतला होता. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि शिवसेनेचे राज्यसभेतील नेते संजय राऊत असे मोजके खासदारही निमंत्रित होते. अनौपचारिक मफल असूनही खुलण्याचे जावडेकरांनी टाळले. पण राऊत मात्र पवारांबद्दल दिलखुलास बोलले. ‘दिल्लीतील महाराष्ट्र म्हणजे पवार’, ‘हक्काच्या मार्गदर्शनाचे ठिकाण म्हणजे पवार..’ वगरे वगरे. पण आपल्या बोलण्याचा विपर्यास होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर त्यांनी पवार आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या मत्रीचा संदर्भ दिला. किंबहुना दिल्लीत गेल्यानंतर शरदरावांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला बाळासाहेबांनीच दिल्याचा दावा करण्यास ते विसरले नाहीत..

िपपरीमधील ‘हिंदुस्तान अँटिबायोटिक्स’चा (एचए) प्रश्न सुमारे वीस वर्षांपासून रेंगाळला होता. केंद्रात सलग दहा वष्रे मंत्री असतानाही आणि स्वत: ‘एचए’ कामगार संघटनेचे अध्यक्ष असतानाही पवारांना तो सोडविता आला नव्हता. पण मोदी सरकारने त्यास मोठी गती दिली. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या अध्यक्षतेखाली अरुण जेटली, अनंतकुमार आदी मंत्र्यांची समिती नेमली आहे. यासंदर्भात ‘एचए’च्या कामगारांचे एक शिष्टमंडळ मध्यंतरी दिल्लीत आले होते. पवारांनी गडकरींना भेटीची वेळ मागितली. त्यानुसार बठक झाली; पण चक्क पवारांच्या निवासस्थानी! एखादी शासकीय बठक विरोधी पक्षातील एका नेत्याघरी होण्याचा हा दुर्मीळ प्रसंग असावा. त्याबाबत शिवसेनेच्या खासदाराला गडकरी नंतर म्हणाले होते की, ‘‘पवारांसारख्या मोठय़ा व्यक्तीला स्वत:च्या कार्यालयात बोलाविणे योग्य वाटले नाही. म्हणून मीच म्हणालो, तुमच्याच घरी बठक घेऊ.’’ अर्थात हा प्रकार अपवाद असावा. महाराष्ट्रासंदर्भातील अनेक बठका गडकरींच्या कार्यालयात झाल्यात आणि त्यास पवार उपस्थित राहिलेले आहेत.

मागील वर्षी साखरेचा प्रश्न फार गुंतागुंतीचा झाला. तो मुद्दा घेऊन भाजपचे काही खासदार मोदींना भेटून निवेदन देणार होते. आपण अगोदर पवारसाहेबांना भेटले पाहिजे, असा दोघा-तिघांचा आग्रह होता. काहींना ते अडचणीचे वाटत होते. पण अखेरीस पाच-सहा खासदार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंसोबत पवारांच्या निवासस्थानी गेले. पवारांचे ‘मार्गदर्शन’ घेऊनच ते पंतप्रधान कार्यालयाकडे रवाना झाले! अगदी निवेदनाचा मसुदाही पवारांनीच तपासून दिला.

हे किस्से आठवण्याचे कारण म्हणजे पवार यांचे नाशिकमधील पिंपळगावमधील व्यक्तव्य. भाजप खासदार मोदींना घाबरतात आणि मोदींना समजावून सांगण्याची विनंती मला करत असल्याचे पवार तिथे म्हणाले. भाजप खासदार मोदींना चांगलेच टरकून असतात, हे जितके खरे आहे तितका खरा आहे तो महाराष्ट्रातील बहुतांश खासदारांशी असलेला पवारांचा उत्तम संपर्क. तो राजकीय नसेलच, असे नाही. थोडा व्यक्तिगत, अधिक राजकीय. त्याचे कारण म्हणजे पवारांचे व्यक्तिमत्त्व. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असो वा नसो, आपल्या व्यक्तिमत्त्वाभोवती भव्य वलय साकारणे पवारांना चांगलेच जमलेय. पन्नास वर्षांच्या भारदस्त संसदीय कारकीर्दीने तर ते आणखीनच घट्ट झालेय. सोबतीला विलक्षण राजकीय कौशल्ये. त्यामुळे दिल्लीत पाय ठेवल्यानंतर गडबडून जाणाऱ्यांना पवार एकदम आधार वाटतात. पूर्वी तसा तो दिवंगत यशवंतराव चव्हाणांबद्दल वाटायचा. ती जागा आता पवारांनी सहजपणे घेतलीय. थोडक्यात सांगायचे तर ते महाराष्ट्रासंदर्भात ‘फादरफिगर’ झालेत. राज्यातील घडामोडींची अद्ययावत माहिती डोक्यात पक्की. मग संसदेतील ‘सेंट्रल हॉल’मध्ये गप्पाष्टक सुरू झाले की शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना औरंगाबादमधील पाणी योजनेबद्दल आस्थेने विचारायचे. गरज असेल तर भेटण्यासाठी तुमच्यासोबत येतो, असे आश्वस्त करायचे. मग हळूच भाजपमधील काही मराठा खासदारांना बाजूला घेऊन त्यांना सुचवायचे, ‘‘अरे, तुम्हीच मराठा आरक्षणाचा मुद्दा हाती का घेत नाही? नाही तर (नारायण) राणे तो पळवतील बघा..’’ मध्यंतरी राणेंनी मराठा आरक्षणासाठी जोर लावल्याचा त्यामागे संदर्भ होता. नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांवर सरकारने कठोर र्निबध लावले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यातील सहकार क्षेत्राची तडफड चालू आहे. पवारांनी जंगजंग पछाडले तरी मोदींनी ताकास तूर लागू दिलेला नाही. पण गप्प बसतील ते पवार कसले? शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दिलेल्या स्नेहभोजनप्रसंगी भाजपच्या काही निवडक खासदारांना ते म्हणाले, ‘‘आता तुम्हीसुद्धा पक्षावर दबाव आणा. मोदींना भेटून जिल्हा बँकांवरील र्निबध हटविण्याची मागणी करा.. शेवटी जनतेला आपल्याला तोंड द्यायचेय.’’ राजकीय परिभाषेत हा काडय़ा घालण्याचा किंवा उचकविण्याचा प्रकार होता; पण पवारांच्या गुरुसल्ल्यानंतरही भाजपचे खासदार मोदींना भेटल्याचे ऐकिवात नाही. कारण सर्व उपाय थकल्याने शेवटी पवारांना सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढण्याची भाषा करावी लागलीय.

राष्ट्रवादीची पाश्र्वभूमी असलेल्या भाजप खासदारांमध्ये पवारांबद्दलचा आदरभाव अजूनही कायम दिसतो. भिवंडीचे कपिल पाटील तर पवार दिसले तरी आदराने लवून पायाला हात लावतात. त्यांच्याशिवाय सांगलीचे संजयकाका पाटील, जळगावचे ए. टी. नाना पाटील, नंदूरबारच्या तरुण खासदार डॉ. हीना गावित आदी मंडळी आता भाजपमय झाली असली तरी त्यांच्या मनात पवारांबद्दल हळवेपणा असू शकतो. एक खासदार म्हणाले, ‘‘पवारसाहेब मोठा माणूस. स्थानिक राजकारणामुळे आम्हाला राष्ट्रवादी सोडावी लागली; पण पवारसाहेबांना आम्ही दैवताप्रमाणे मानतो. यातून राजकीय अर्थ काढू नका. कारण हा आदरभाव बिगरराजकीय स्वरूपाचा जास्त आहे.’’

दुसरीकडे भाजपमधील काही खासदार मात्र पवारांपासून जाणीवपूर्वक चार हात दूर राहतात. त्यामध्ये किरीट सोमय्या, डॉ. प्रीतम मुंडे, अनिल शिरोळे, राजू शेट्टी ही ती नावे. विदर्भातील बहुतांश खासदार पवारांच्या ‘रडार’वर नाहीत. विदर्भाशी पवारांची न जुळलेली नाळ त्यातून डोकावते. शिवसेना खासदारांबरोबरील पवारांच्या नात्यामध्ये अस्पष्टता जाणवते. दिवंगत बाळासाहेब व पवारांमध्ये निकटचे संबंध होते. पण तसे उद्धव ठाकरेंबरोबर नसल्याचे प्रतििबब अस्पष्टतेच्या रूपाने पडलेय. कारण पवारांच्या किती जवळ गेलेले ‘मातोश्री’ला चालणारेय हे अजून पक्के समजत नाहीये. त्यातून धरसोड चालू असते. काहींची खूपच सलगी, तर काही सुरक्षित अंतरावर. पण पवारांवर कुण्या भाजप (अगदी शिवसेनेच्याही) खासदाराने टीका केल्याचे ऐकिवात आहे? नाही. पण राज्यसभेतील अमर साबळेंनी ते धाडस केले. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या दुरुपयोगाचा मुद्दा पवारांनी काढल्यानंतर सर्वात अगोदर त्यांच्यावर टीका करणारे साबळे होते. नंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले सरसावले. पण आपल्याच खासदाराचे मुद्दे लगेचच प्रदेशाध्यक्ष दानवेंनी स्वत:च खोडून काढले.

फडणवीस सरकार पश्चिम महाराष्ट्राचा हिस्सा विदर्भ व मराठवाडय़ाकडे पळवीत असल्याचा आरोप मध्यंतरी पवारांनी केला होता. त्यावर चिडलेल्या एका भाजप खासदाराने पवारांवर टीका करणारे खरमरीत पत्र खरडले; पण ते प्रसिद्ध करेपर्यंत त्याचा अवसानघात झाला. आपल्या पश्चातबुद्धीचे समर्थन करताना तो म्हणाला, ‘‘पवार धडधडीत खोटे बोलत असतानाही दानवे गप्प बसले. विदर्भ-मराठवाडय़ातील खासदार तोंडातून शब्द काढायला तयार नाहीत. मग मी एकटाच कशाला त्यांना अंगावर घेऊ? पूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडे पवारांविरोधात अंगार ओतायचे. आता एकटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना अंगावर घेताना दिसतात. पण इतरांचा काही भरवसा नाही. त्यामुळे ‘मोठय़ां’च्या या खेळात भाग न घेण्यातच शहाणपणा. आपण व आपला मतदारसंघ बरे.’’ मागील वर्षीच्या ऐन दुष्काळात पवारांनी अमृत महोत्सव धूमधडाक्यात साजरा केला; पण त्यावर टीका करण्याची िहमत भाजप-शिवसेनेने दाखविली नसल्याचा संदर्भ द्यायलाही तो खासदार विसरला नाही.

खासदारांबरोबरील पवारांच्या संबंधांची झलक दाखविणारी ही काही उदाहरणे. पण यातून पवार सगळेच्या सगळे (‘द कम्प्लिट पवार’) उलगडत नाहीत. एक गोष्ट मात्र नक्की की महाराष्ट्रात या घडीला त्यांच्याएवढा तोलामोलाचा खासदार दुसरा नाही. बरे, व्यक्तिमत्त्वातील बेमालूम मिश्रणामुळे पवारांकडे पाहण्याचा राजकीय व बिगरराजकीय चष्मा वेगवेगळाही करता येत नाही. म्हणूनच एकाच वेळी त्यांच्याबद्दल (अ)राजकीय आदरभाव असतो, त्यांची राजकीय उत्तुंगता भारून टाकत असते; पण त्याच वेळी कधी ‘गेम’ होईल, या शंकेने ग्रासलेले असते. म्हणजे एकाच वेळी आदर, आस्था, शंका-कुशंका, भीती अशा टोकदार भावनांच्या कल्लोळातच ही खासदारमंडळी पवारांच्या पसरट छायेत वावरत असतात. यात भर मोदी-पवार यांच्या संबंधांमधील गूढतेची आणि औत्सुक्याची. त्याबाबत नंतर कधी तरी..

 

संतोष कुलकर्णी

santosh.kulkarni@expressindia.com

Story img Loader