महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांनी संपूर्ण देश सुन्न झाला आहे. त्याचे पडसाद लोकसभा आणि राज्यसभा येथेही तीव्र स्वरूपात उमटले, बऱ्याचशा नेत्यांनी बलात्काराच्या गुन्ह्य़ाला फाशीची शिक्षा व्हावी किंवा जी शिक्षा होईल ती इतकी कडक स्वरूपाची असावी, की बलात्कार करणाऱ्याला चांगली दहशत बसेल, असे मत व्यक्त केले. त्या प्रकारच्या घटनाच अशा असतात की, ऐकणाऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. परंतु ज्याला कायद्याचे राज्य चालवायाचे असेल त्याला मात्र असे भावुक होऊन निर्णय घेता येत नाहीत. आपल्या कायद्याचा गाभा हा माणूस आणि त्याचे मानवी स्वातंत्र्य हा असल्यामुळे तुम्ही कुठलाही कायद करा तो कितीही कडक करा त्याची शिक्षाही अत्यंत कठोर करा, त्यात पळवाट ही राहणारच. कारण ते माणसांनी माणसांसाठी केलेले कायदे असतात हे लक्षात ठेवले पाहिजे. उपनगरी रेल्वे प्रवासात महिलांना जो अश्लील हावभाव आणि चाळ्यांचा त्रास होतो तो अनन्वित स्वरूपाचा आहे. त्याचा समाचार महिलांनी बेदरकारपणे केला पाहिजे. प्लॅटफॉर्मवरच्या अशा टोळक्यांचा सामूहिकपणे समाचार घेऊन त्यांना सळो की पळो करून सोडा. त्यासाठी एखादा खास साप्ताह मुक्रर करा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट करावी लागेल, दूरदर्शनवरील उत्तान स्त्री-देहाच्या जाहिराती आणि सिनेमात गाण्यामध्ये हमखास दाखवल्या जाणाऱ्या नृत्यातील बलदंड पुरुषांच्या देहाला झोंबणाऱ्या कमीत कमी कपडय़ांतील स्त्रियांचा समूह, त्यांच्या हावभावातून प्रकट होणाऱ्या िलगपिसाट वृत्ती संबंधित पुरुषांकडून कसली अपेक्षा करत आहेत हे समजायला परिपक्व माणसाची गरज नाही. अशा दृश्यांवरही महिलांनीच तीव्र प्रतिक्रिया द्यायला हवी. कायद्याचे काम कायदा करेल. पण महिलांनी धर्य दाखवले पाहिजे. समर्थाचे एक वचन लक्षात ठेवा, सदा सर्वदा राम सन्निध आहे, कृपाळूपणे अल्प धारिष्टय़ पाहे.
– मोहन गद्रे, कांदिवली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा