स्वभाव हे एक अजब रसायनांचे मिश्रण असते. त्याची पूर्ण ओळख कुणालाच कधीच होत नाही. हत्तीला चाचपडणाऱ्या त्या सात आंधळ्यांसारखा, आपल्या मनाला भावणारा दुसऱ्या व्यक्तिमत्त्वाचा एखादा पलू म्हणजे दुसऱ्या माणसाचा स्वभाव असे आपण मानतो आणि त्या माणसाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नक्की करून टाकतो. मग कुणाच्या लेखी कुणी योगी पावन मनाचा ठरतो, तर दुसऱ्या कुणाला तो भोगी तामसीपणाचा वाटू लागतो. या रसायनाचे रंग वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळे दिसतात. राजकारणाचे असेच असते. सामान्य माणसाला राजकारणाचे नेमके अंतरंग कुठे समजते? जे समोर दिसते, तेच राजकारण असल्याच्या समजुतीने तो आपल्या परीने त्यातले भले तेवढे शोधत राहतो आणि तेवढे सापडले, की आपल्यापुरत्या त्या भल्याचा कर्ता करविता जो कोणी असतो, तो नेताही आपल्या प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी धडपडू लागतो. या धडपडीतूनच, त्या नेत्याचा खरा चेहरा मुखवटय़ाआड जातो. पुढे तो मुखवटा हाच आपला खरा चेहरा आहे असे त्या नेत्यालाही वाटू लागते आणि आपल्या मुखवटय़ाआड एक चेहरा दडला आहे, याचा नेत्यालाही विसर पडू लागतो. पण ती काही फार समाधानाची स्थिती नसावी. ती घुसमटवून टाकणारी, बेचन अवस्थाच असली पाहिजे. मुखवटय़ाआड सक्तीने दडविलेला चेहरा अशी बंदिवान स्थिती फार काळ सहन करू शकत नाही. कारण मनाचा प्रभाव मुखवटय़ापेक्षा चेहऱ्यावर अधिक असतो. मन बंड करू लागते, तेव्हा मुखवटय़ाचे बेगडी पदर फाडून खरा चेहरा बाहेर येतो आणि स्वभावाचा कुणालाच माहीत नसलेला एखादा पलू उसळून समाजासमोर येतो.
नेत्यांनी आपल्या भावना सार्वजनिक स्वरूपात व्यक्त कराव्यात का, हा खरे म्हणजे समाज-मानसशास्त्राच्या अभ्यासाचा विषय असला पाहिजे. डोक्यावर बर्फाची लादी आणि जिभेवर खडीसाखर घेऊनच कायम राजकारणात वावरण्याची काळजी घेणाऱ्या त्या मुखवटय़ांची असे करताना किती बरे घुसमट होत असेल? आपल्या मनातल्या वेदना, सल, संताप, मत्सरादी भावना व्यक्त करून मोकळे व्हावे असे त्यांना कधीच वाटत नसेल? एखाद्या नेत्याने, महानगरातील ज्या विशाल सभांमध्ये स्वत:ला वर्षांनुवष्रे मानाने मिरविलेले असते, त्याच सभेच्या व्यासपीठावरून अपमानित होऊन खाली उतरण्याची वेळ येते तेव्हा, डोक्यावरची बर्फाची लादी फेकून द्यावी, जिभेवरचा खडीसाखरेचा खडा थुंकून टाकावा आणि मनात धगधगणारी संतापाची गरळ ओकून टाकावी असे त्याला खरेच वाटत नसेल?.. सहजपणे समोर येऊ पाहणारा सत्तेचा सर्वोच्च वाटा अवचितपणे नाकारला जातो आणि मनात रुंजी घालणारी भविष्याची स्वप्ने अचानक मातीमोल होऊन जातात त्या क्षणी व्यक्त होणाऱ्या संतापाचा, मुखवटा फाडून टाकण्याचा मोह आवरण्याची कसरत करताना एखाद्याला अतोनात त्रास झाला नसेल? राजकीय कर्तृत्वाच्या जोरावर स्वत:चे स्थान निर्माण करू पाहणाऱ्या एखाद्या वजनदार नेत्याला केवळ प्रस्थापित घराणेशाहीचा प्रभाव पुसणे अवघड झाल्याने प्रादेशिक पक्षाची मोट बांधून राष्ट्रीय नेतेगिरीचा मान मिरविण्याची वेळ येते, तेव्हा त्याच्या स्वभावातील संतापाचे ते रसायन उसळी मारून बाहेर येण्याची धडपड करत नसेल?
पण असे होत असले, तरी मुखवटय़ाचे रंग उडू नयेत आणि आतल्या चेहऱ्याच्या रेषाही उघडय़ा पडू नयेत याची कसरत राजकारणातील प्रत्येकाला करावीच लागते. त्यामुळेच तर मुखवटय़ाआडची अनेक गुपिते अजूनही शाबूत राहिली आहेत. नाही तर, राजकारणात अराजक माजण्यास वेळ लागला नसता आणि ज्यांना पावन मनाचे योगी मानले, ते तसे नाहीत व ज्यांना तामसी भोगी मानले तेही खरोखरीचे तसे नाहीत हे केव्हाच उघड झाले असते. म्हणूनच, नेतेगिरीला भावनांच्या विळख्यात अडकवून घेणे फारसे आवडत नसावे. कोरडा मुखवटा पांघरणे हा उत्कृष्ट नेतेगिरीचा आवडता गुण असतो. राजीव गांधींच्या हत्येनंतरच्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर स्वार झालेल्या काँग्रेसच्या यशानंतर सोनिया गांधींनी देशाचे नेतृत्व करावे यासाठी त्यांच्यासमोर व्यक्त झालेल्या भावनांनी मुखवटे फाडून बाहेर उसळी घेतली होती. दहा वर्षांची निरंकुश सत्ता संपवून देशाच्या सर्वोच्च पदावर आरूढ होण्यासाठी दिल्लीत दाखल झालेल्या नेत्याने संसदेच्या पायरीवर माथा टेकला, त्या क्षणीदेखील कदाचित, मुखवटय़ाआडच्या चेहऱ्यावरच्या भावनांना आवर घालणे त्यांना अवघडच गेले असावे. पण असे क्षण अपवादाचेच असतात.
मनाला स्पर्श करणाऱ्या अशा भावना जेव्हा सार्वजनिकपणे समोर येतात, तेव्हा कदाचित त्यावर भलेपणाचा रंग चढलेला असेल, पण स्वभावातील राग-द्वेषाच्या रसायनाचे मिश्रण असे सार्वजनिकरीत्या समोर येणे मात्र, नेतृत्वगुणाबाबतच्या समाजाच्या विश्वासाला धक्कादायकच ठरते. नेतृत्वगुण आणि भावनांच्या सार्वजनिक आविष्कारावर अशी चर्चा सुरू झाली, की जाहीर सभांमध्ये आपण भोगलेल्या राजकीय त्रासाचे पाढे वाचत अश्रू ढाळणारे चेहरे आठवतात, सार्वजनिक ठिकाणी संतापलेली ‘ममता’ळू रूपे समोर येऊ लागतात, आणि सर्वसंगपरित्यागाची प्रतीके असलेली भगवी वस्त्रे परिधान करूनही मुठी आवळत िहसक, विद्वेषी वक्तव्ये करणाऱ्या साधू-साध्वींचे राजकारणाच्या मुखवटय़ाआडून डोकावणारे चेहरे दिसू लागतात. व्यथा, वेदना आणि कळवळ्यांच्या भावना सार्वजनिक स्वरूपात व्यक्त करणे ही एक असाध्य कला असते, आणि ती कला साधून त्या भावना व्यक्त करणे ही चांगली कल्पना असली तरी संताप, क्रोध, मत्सराच्या भावना दाबण्याची सार्वजनिक कसरत ज्याला साधते, तोच खरा नेता ठरतो. डोक्यावरचा बर्फ आणि तोंडातील खडीसाखरेचा खडा कधीही विरघळणार नाही, याची काळजी घेण्याचीच ही कसरत असते. राग, चिंता आणि मत्सराचे जाहीर प्रदर्शन करणाऱ्याचे नेतृत्व, ते सार्वजनिक जीवनातील असो, वा व्यावसायिक क्षेत्रातील असो, कधीच फार काळ टिकत नाही. रागाने खदखदणारी मने काही काळ अशा नेतृत्वाच्या पाठीशी उभी राहतात, पण मन शांत होताच त्याकडे पाठही फिरवितात, असा मानसशास्त्रीय संशोधनाचा निष्कर्षच आहे. उलट, संकटाच्या वेळी संवेदनशीलता दाखविणाऱ्या भावनांचे आविष्कार मात्र, नेतृत्वावर मान्यतेची तात्कालिक मोहोर तरी उमटवून जातात.
त्यामुळे, नेतेगिरी करणाऱ्यांनी भावनांच्या सार्वजनिक आविष्काराच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. राग-द्वेषाचा सार्वजनिक आविष्कार तर टाळलाच पाहिजे. सदैव हसऱ्या चेहऱ्याने वावरणारे, संगीताच्या तालावर थिरकणारे आणि त्यामुळेच समाजाला आपलेसे वाटणारे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा परवा त्यांच्या घरी झालेल्या एका कार्यक्रमात एका महिलेवर कमालीचे संतापले. महाराष्ट्राच्या हसऱ्या मुख्यमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना सार्वजनिक ठिकाणी संताप आवरता आला नाही, आणि कुणा प्रश्नकर्त्यांला मर्यादेत राहण्याची समज त्यांनी दिली.
असे काही अनपेक्षित घडते, तेव्हा मुखवटय़ाआडच्या चेहऱ्यांविषयीची उत्सुकता वाढू लागते. भावनांचा सार्वजनिक आविष्कार टाळणे अशक्य होऊन तो व्यक्त करण्याची अपरिहार्य वेळ वारंवार येऊ लागली, तर मुखवटे कायमचे उतरवूनच ठेवले तर?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा