नेमून दिलेले काम चोखपणे करण्याऐवजी दुसऱ्यांना उपदेश करण्याची खोड हा भारताचा सार्वत्रिक व्यक्तिविशेष. पुणे व मुंबईच्या पोलीस आयुक्तांची विधाने या व्यक्तिविशेषाला साजेशी आहेत. महिलांवरील वाढत्या अत्याचारांमुळे सध्या वातावरण प्रक्षुब्ध झाले आहे. अशा परिस्थितीत पोलीस दलातील सर्वात ज्येष्ठ पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून समंजस कारणमीमांसा व व्यावहारिक उपाययोजनांची अपेक्षा असते. ते न करता या दोन्ही अधिकाऱ्यांनी अत्यंत अतार्किक सूर लावला. इंग्रजी माध्यमांतून मिळणारे शिक्षण व संस्कृत भाषेबद्दलची अनास्था ही समाजातील वाढत्या हिंसाचाराची कारणे असल्याचा शोध मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी लावला, तर महिलांनी कायम मिरची पूड व लहानसा चाकू स्वत:जवळ बाळगावा, असा सल्ला पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिला. असाच सल्ला ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनीही दिला होता. सत्यपाल सिंह यांच्या संस्कृतच्या अभ्यासाबद्दल दुमत नाही. त्या क्षेत्रातील त्यांची जाणकारी ही वादातीत आहे. पोलीस दलातील माणूस संस्कृतसारख्या विषयात रस घेतो व अनेक परिषदांना स्वखर्चाने हजर राहतो ही बाब निश्चितपणे कौतुक करण्यासारखी आहे; परंतु पोलीस दलाच्या कार्यक्षम कारभाराशी त्याचा संबंध काय? हिंसाचार रोखण्यासाठी संस्कृतचा अभ्यास नव्हे तर दंडशक्ती हाच सर्वोत्तम उपाय आहे, असे संस्कृत सुभाषितांमध्ये जागोजागी सांगितले आहे. ही दंडशक्ती परिणामकारतेने, नि:पक्षपातीपणे व कोणावरही अन्याय न करता वापरण्यासाठी पोलीस दल आहे. पोलीस दलाच्या या कामाबद्दल बोलण्याऐवजी सत्यपाल सिंह यांनी सुसंस्कृत होण्याचा उपदेश लोकांना केला. समाजातील मूल्यव्यवस्था बळकट असेल तर गुन्ह्य़ांची संख्या कमी होईल हे खरे. मात्र तो लांबचा उपाय आहे. मूल्यव्यवस्था बळकट करण्याची यातायात करण्यापेक्षा पोलीस दलाचा कारभार सुधारणे अधिक सोपे व तातडीने करता येण्याजोगे आहे. सत्यपाल सिंह यांच्यासारखी सर्वोच्च पदावर बसलेली ‘सुसंस्कृत’ व्यक्ती हे काम अधिक चांगल्या तऱ्हेने करू शकते. या कामाकडे लक्ष देण्याऐवजी समाजशिक्षणावर त्यांनी प्रवचन देण्याची काहीएक गरज नाही. पोळ यांचा सल्लाही मुख्य प्रश्नावरून लक्ष उडविणारा आहे. स्वत:चे संरक्षण कसे करायचे याबाबत पोलिसांच्या सल्ल्याची मुलींना गरज नाही. ती माहिती त्या स्वत: करून घेत असतात वा त्यांचे पालक त्यांना शिकवितात. मुलींना निर्भयपणे फिरता येईल असे वातावरण तयार करणे हे पोळांकडून अपेक्षित आहे. चाकू बाळगण्याचा आज मुलींना मिळणारा सल्ला उद्या प्रत्येक माणसाला दिला जाईल. सध्या प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला स्वत:ची सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागते. अनेक बडे नेते, उद्योगपती, चित्रपट कलाकार खासगी सुरक्षा ठेवतात. प्रत्येक नागरिकानेही स्वत:ची सुरक्षा व्यवस्था ठेवावी, म्हणजे पोलिसांवरील ताण कमी होईल, असे हळूहळू सांगितले जाईल. नागरिक कर भरतात ते सुरक्षा मिळावी म्हणून. ती त्यांना मिळवून देण्यासाठी कणखर कृती करणे अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अपेक्षित असते, उपदेश करणे नव्हे. लोकांना चाकू बाळगण्याचा सल्ला देणे हे आपल्यावरील जबाबदारी झटकण्यासारखे आहे याचे भान गुलाबरावांना नसावे. पोलीस दलातील सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करून दिली. त्याला सहा वर्षे उलटली. राज्य सरकारने त्यातील एकाही सूचनेची अंमलबजावणी केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचना पोलिसांना अधिक स्वातंत्र्य देणाऱ्या आहेत. लोकांना उपदेश करण्याआधी या सूचनांचा पाठपुरावा सत्यपाल सिंह व पोळ यांनी जाहीरपणे करून सरकारवर दबाव आणावा. ते त्यांचे कर्तव्य आहे, सल्ला देणे नव्हे.
वाह्यत उपदेश
नेमून दिलेले काम चोखपणे करण्याऐवजी दुसऱ्यांना उपदेश करण्याची खोड हा भारताचा सार्वत्रिक व्यक्तिविशेष. पुणे व मुंबईच्या पोलीस आयुक्तांची विधाने या व्यक्तिविशेषाला साजेशी आहेत. महिलांवरील वाढत्या अत्याचारांमुळे सध्या वातावरण प्रक्षुब्ध झाले आहे. अशा परिस्थितीत पोलीस दलातील सर्वात ज्येष्ठ पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून समंजस कारणमीमांसा व व्यावहारिक उपाययोजनांची अपेक्षा असते.
First published on: 04-01-2013 at 02:59 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lecture in book