कुंडली, ग्रहदशा, साडेसाती या संकल्पना म्हणजे अंधश्रद्धा असल्या, तरी या ‘पीडे’चे अनुभव येत असतात. ज्योतिषात या पीडा शमविण्याचे तथाकथित उपचार तरी आढळतात. मुंबईकराला या पीडांची ‘त्रिकाळबाधा’ झालेली आहे आणि त्यावर अद्याप तरी कोणत्याही यंत्रणेकडे जालीम उतारा नाही. एखादा भोंदू ज्याप्रमाणे पीडांनी गांजलेल्याच्या माथी पोकळ गंडेदोरे मारून तात्पुरत्या सुटकेची आशा दाखवितो, तसेच तंत्र अलीकडे मुंबईकरांच्या बाबतीत यंत्रणांनीही राबविण्यास सुरुवात केल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे, काही काळापुरत्या त्या दशांची पीडा सुसहय़ वाटू लागते आणि त्या सुखाच्या भावनेत असतानाच पुन्हा त्या पीडा डोके वर काढू लागतात. मुंबईच्या कुंडलीतील साडेसातीच्या घरातील ग्रहांनी वर्षांनुवर्षे जणू त्याच घरांमध्ये आपले बस्तान असे बसविल्याने या ग्रहांच्या प्रभावाला आता मुंबई सरावूनच गेली आहे. पावसाळा सुरू होण्याआधी हे ग्रह अधिक जोमाने हालचाल करू लागतात. केरकचऱ्याने आणि प्लास्टिकने काठोकाठ भरलेले नाले भविष्याचे भेसूर चित्र स्पष्ट करत असतानादेखील, नालेसफाई होतच नाही. रस्त्यावरील खड्डय़ांची समस्या पावसाळ्यात भेडसावू लागणार हे स्पष्ट होऊनही, कोटय़वधी रुपये खर्चून तात्पुरती डागडुजी केली जाते, वाहतुकीचे तीनतेरा, सखल भागातील जलमय दृश्ये, दूषित पाणी, साथीचे आजार, मच्छरांची पैदास, रस्त्यांवरील खड्डे अशा अनेक रूपांनी हे उपद्रवकारी ग्रह मोसमात हातमिळवणी करू लागतात आणि मान्सूनचा पाऊस सुरू होताच संघटितपणे मुंबईवर हलाखीचे हल्ले सुरू होतात. ‘यंत्रणांचे पाठबळ’ असलेल्या या पीडाकारी ग्रहांचा क्षोभ शमविणारे कोणतेही गंडेदोरे किंवा त्याहूनही प्रभावी असा कोणताच उपाय हाताशी नसलेला मुंबईकर जणू हतबलतेने याला सामोरे जाण्याची केविलवाणी धडपड सुरू करतो आणि अगदीच हमरीतुमरीवर आले, तर दीनपणाने त्या पीडेसमोर गुडघे टेकून परिणाम भोगू लागतो. मान्सूनच्या सुरुवातीलाच मुंबईत कोसळलेल्या धुवाधार पावसासोबतच ‘लेप्टोस्पायरोसिस’ नावाची एक पीडा मुंबईत येऊन दाखल झाली. पावसाळ्यात असे काही आजार हातपाय फैलावणार याची पुरेपूर कल्पना असल्याने, आता आजारांच्या साथी सुरू झाल्या, की करावयाच्या उपाययोजनांची जंत्रीही तयार असते. आजार रोखण्याचे उपाय मात्र हाताची घडी घालूनच भविष्यावर नजर ठेवून असतात. खड्डय़ांमध्ये डासांची घरे होतात, तुंबलेल्या नाल्यांमुळे आणि रस्त्याकडेला माजणाऱ्या कचरापट्टीमुळे पावसाळ्यातील रोगराईची पीडास्थाने अधिक जोमाने कार्यरत होतात, हे आता पालिका प्रशासनास माहीत झाले असल्याने, ‘डासांची उत्पत्ती टाळा, पाणी साचू देऊ नका’ अशा जाहिराती देऊन ‘जनजागृती’चा हमखास मार्ग प्रशासनाला सापडला आहे. त्यानुसार यंदा ती प्रथा पार पाडून झाल्यावर आता अचानक लेप्टोस्पायरोसिसने डोके वर काढले आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात गोरेगाव ते दहिसरमध्ये गेल्या आठवडाभरात तीस वर्षांखालील १२ जणांचा या आजाराने मृत्यू ओढवला. २००५ आणि २००७ मध्ये या आजाराने अनुक्रमे ६६ व ७९ बळी घेतले होते. त्या साडेसातीचा फेरा आता पुन्हा मुंबईच्या कुंडलीत सक्रिय झाला आहे. आता पालिका प्रशासन जागे झाले आहे, असे म्हटले जात असले, तरी पुन्हा मुंबईकरांना आपल्या पीडाकारी ग्रहांशी सामना करण्यासाठी बाहय़ा सरसावणे भाग आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा