दिल्ली युनिव्हर्सिटीतल्या सुमारे ७६ % विद्यार्थिनींना ह्या कॅम्पसमध्ये असुरक्षित वाटते – असे निरिक्षण आज एका सर्वेक्षणात प्रसिद्ध झाले आहे. डिसेंबरमध्ये दिल्लीत एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर; विद्यार्थिनींना कॅम्पसच्या आतमध्ये किती प्रमाणात सुरक्षित वाटते – ते समजून घेण्यासाठी नुकताच हा सर्व्हे करण्यात आला. भारताच्या राजधानीतल्या एका नावाजलेल्या मोठ्या युनिव्हर्सिटीत जर अशी परिस्थिती असेल तर लहान खेड्यापाड्यांमधल्या मुलींना कशा प्रकारच्या वातावरणाला तोंड द्यावे लागत असेल याची आपण कल्पना करू शकतो.
खरंतर, दिल्ली – मुंबईसारखी मोठे शहरे असतील किंवा चंद्रपूर मधले एखादे खेडेगाव असो – सगळ्याच बायकांना रस्त्यावर होणाऱ्या लैंगिक छळणुकीच्या दहशतीखाली जगावे लागते. कधी हा छळ नुसते टक लावून बघण्यापुरता किंवा बसमध्ये धक्के मारण्यापुरता मर्यादित असतो तर कधी सामूहिक बलात्काराचे रूप घेतो! बहुसंख्य मुली आणि महिला याच दहशतीमुळे कुठूनही हल्ला होईल या भितीने सतत सावध रहातात किंवा अनेकदा घराबाहेर पडणेही टाळतात. अगदी शाळा-कॉलेजला जाणे किंवा भाजीबाजारात जाण्यासारखे रोजचे व्यवहार करणेही अनेकजणींना नकोसे वाटते. एखादीने घरच्यांना अशा त्रासाबद्दल सांगितले तर बहुधा तिचेच घराबाहेर पडणे बंद केले जाते. अनेकदा मुली आपसातदेखिल अशा त्रासांबद्दल बोलणे टाळतात आणि त्रास देणाऱ्यांची धिटाई वाढत जाते!
चंद्रपूरजवळच्या सिदूर नावाच्या एका छोट्याशा गावात शाळेत जाणाऱ्या मुलींना एकेकटीला गाठून एक मध्यमवयीन माणूस लैंगिकचाळे करून दाखवत असे. त्याच्या त्रासाला बळी पडणाऱ्या प्रत्येक मुलीला वाटायचे की – फक्त आपल्यालाच असा त्रास होतो आहे! अनेक दिवस या गावातल्या अनेक मुलींनी कुणाकडेच या घाणेरड्या त्रासाविषयी काहीच सांगितले नव्हते. एक दिवस मात्र युनिसेफने चालवलेल्या दीपशिखा वर्गात हा विषय निघाला आणि सगळ्यांच्याच दबलेल्या अनुभवांची कोंडी फुटली. गटातल्या प्रत्येक मुलीला हाच एक माणूस ठराविक ठिकाणी अडवून त्रास देत होता –हे लक्षात आले आणि त्यांनी या त्रासावर उपाय करायचे ठरवले. वैभवी नावाच्या धिटुकल्या दीपशिखेच्या नेतृत्वाखाली एक दिवस सगळ्यांनी मिळून त्या फाजिल माणसाला घेरले आणि गावात घेऊन आल्या – त्याला ग्रामपंचायतीसमोर स्वत:च्या कृत्यांची माफी मागायला लावली आणि त्यानंतर हा त्रास कायमचा बंद झाला.
लातूरच्या बोरिवती गावात काहीशी अशीच घटना घडली. या गावात पमाताई दीपशिखा प्रेरिका म्हणून काम करतात. पण त्यांचे काम वर्ग घेण्यापुरतंच मर्यादित ठेवलेलेलं नाही. वर्गात शिकवली जाणारी मुलीच्या आत्मसन्मानाची मूल्ये प्रत्यक्षात कशी उतरवता येतील त्यासाठी देखील त्या जागरूक असतात. पमाताईंचे घर म्हणजे गावातल्या सगळ्याच मुलींच्या आणि बयांच्या विश्वासाची जागा! आपण एखादी अडचण पमाताईंना सांगितली तर गावातल्या इतर बायांच्या मदतीने त्या नक्की दूर करतील असा विश्वास दीपशिखा वर्गातल्या मुलींच्या मनात तयार झालेला होता.याच विश्वासापोटी बोलायला अतिशय अवघड अशी समस्या घेऊन काही मुली पमाताईंकडे आल्या. त्या काळी बोरिवती गावात ८वीनंतरचे वर्ग भरत नव्ह्ते. गावातल्या अनेक मुलींना बसने शेजारच्या गावात जावे लागायचे. एक माणूस या बसमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलींच्या शेजारची जागा मिळवायचा आणि त्यांच्या अंगावरून हात फिरवायचा; अचकट विचकट बोलायचा. . .माझ्यासोबत सिनेमाला येतेस का- असे विचारायचा. त्या किशोरवयीन मुली अशा वागण्याने बावरून जात असत… सुरुवातीला प्रत्येक मुलगी आपल्यालाच असा घाणेरडा त्रास होतो आहे असे मानून गप्प बसत असे. पण एकमेकींशी बोलल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की आपल्या सगळ्याचजणींना हा त्रास होतो आहे. दीपशिखा वर्गात एक दिवस हा विषय निघाला आणि पमाताईंनी या त्रासाचा बंदोबस्त करायचे ठरवले. एक दिवस सगळ्या पोरींनी त्या आचरट माणसाला बसमधून उतरवले आणि हाताला धरून ओढत ओढत गावातल्या चौकात आणले. सर्वांसमोर त्याला असा काही हाग्या दम दिला की पुन्हा तो माणूस गावात फिरकला देखिल नाही. आता बोरिवती गावातल्या मुलींना बिनघोरपणे शाळेत जायला मिळते आहे!
सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने वावरायला मिळणे हा पुरुषांइतकाच स्त्रीयांचाही हक्क आहे. आपला हा हक्क आपणच ठासून सांगायला हवा. बोरिवती आणि सिदूरमधल्या मुलींनी एकत्र आल्या तेव्हाच त्यांना स्वत:चा हक्क मिळवता आला! खेड्यांमधल्या मुलींसाठी युनिसेफच्या दीपशिखा वर्गांमुळे एक हक्काची जागा तयार झाली आहे – आपण शहरातल्या मुलींनी आणि महिलांनी देखिल स्वत:साठी अशा जागा आवर्जून तयार करायला हव्यात!