बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला माझा व माझ्यासारख्या इतर पुरोगामी लोकांचा विरोध आहे, असे प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झाले, परंतु तो विरोध का आहे हे कोणत्याही बातमीत स्पष्ट झालेले नसल्याने हा खुलासा करणे गरजेचे आहे.
‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहिणाऱ्या कॉ. गोिवद पानसरे यांचा निर्घृण खून झाल्यानंतर एक-दीड महिन्यातच महाराष्ट्र शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. या पुस्तकात पानसरेंनी असे मांडलेले आहे की, शिवाजी महाराज हे सामान्य माणसाला आधार देणारे, रयतेचे राज्य निर्माण करू इच्छित होते. ते मुसलमानांचा द्वेष करणारे नसून, िहदूंचे राज्य निर्माण करणे हा त्यांच्या स्वराज्यनिर्मितीचा हेतू नव्हता. धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचवणे व त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळणे हे पानसरेंच्या खुनामागील एक कारण आहे, असे आम्हाला वाटते. धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराजांची मांडणी केली म्हणून पानसरेंचा खून झाला आणि शासनाच्या बेपर्वाईमुळे खुनी अजून मोकाट आहेत.
पानसरेंच्या खुनानंतर सर्व पुरोगामी कार्यकत्रे पानसरेंचा शिवाजी महाराष्ट्रात सर्वत्र पोचवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत होते, ‘शिवाजी कोण होता?’ ही पुस्तिका मोठय़ा प्रमाणात वितरित करत होते. अशा वेळी शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला विरोधी अशी शिवाजी महाराजांची प्रतिमा प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा वापर केला जात आहे अशी भावना सर्व पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि म्हणून या पुरस्काराला विरोध आहे.
बाबासाहेब पुरंदरे हे शिवचरित्र कथन करणारे शाहीर आहेत, शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांनी त्यांचे जीवितकार्य मानले आहे व ते त्यांनी अत्यंत निष्ठेने केले आहे, महाराष्ट्रातील जनसामान्यांपर्यंत शिवाजी महाराजांचे चरित्र पोहोचवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. शाहिरीमध्ये फक्त इतिहास नसतो त्यात कल्पनेच्या भराऱ्या, गुणवर्णन, काव्य, भावनेला आवाहन असे इतर अनेक घटक असतात. लोकप्रिय शाहिरांच्या कथनातून निर्माण झालेल्या महापुरुषांच्या प्रतिमा या संधिसाधू राजकारण्यांकडून वापरल्या जातात. या प्रकरणात असेच घडले आहे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शाहिरीतून निर्माण झालेली शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या राजकारणासाठी वापरता येईल हे जोखून, ही शाहिरी प्रतिमा म्हणजे शिवाजी महाराजांच्या वास्तवातील राजकीय भूमिका आहेत, असे भासवून त्या आधारे महाराष्ट्रात जे राजकारण केले गेले व जात आहे त्याला आमचा विरोध आहे.
शिवाजी महाराजांची मुसलमानविरोधी प्रतिमा रंगवून त्याचा राजकारणासाठी वापर करणे हे आमच्यासाठी जसे निषेधार्ह आहे तसेच समाजातील जातीय तेढ वाढविण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करणे हेही आमच्यादृष्टीने निषेधार्ह आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा निषेध करताना हा निषेध आपण का करत आहोत हे सांगितलेच पाहिजे, हे आमच्या उशिरा लक्षात आले, ही आमची चूक झाली कारण या पुरस्काराचा निषेध करणाऱ्या इतरांचा बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाला झालेला विरोध हा वैचारिक मतभेद या भूमिकेतून नाही तर तो जातीयवादी भूमिकेतून झालेला असेल हे आम्ही लक्षात घेतले नाही.
आपल्याला जे म्हणायचे आहे ते मांडणारा योग्य प्रतिनिधी समाजकारणात व राजकारणात न मिळणे ही इथल्या सामान्य माणसाची अगदी मूलभूत अडचण आहे. जाती-धर्मनिरपेक्ष राज्य चालवणारे, सुभेदाऱ्या बरखास्त करून सामान्यांचे राज्य आणणारे, या उद्दिष्टांप्रति कृतिशील राहणारे जे शिवाजी महाराज आम्हाला हवे आहेत तसे शिवाजी महाराज इथल्या प्रस्थापित राजकारण्यांपकी कोणालाच नको आहेत.
कविवर्य वसंत बापटांची एक सुंदर कविता आहे.. ‘ त्रलोक्य व्यापुनीही कोठे न राहणारा माझा गणेश नाही मखरात मावणारा’; त्याच धर्तीवर आमचे म्हणणे आहे की, ‘माझा शिवाजी नाही राजकीय पक्षात मावणारा.’
मुक्ता दाभोलकर, पुणे
आमची भूमिका जातीय नाही, हे आम्ही स्पष्ट केले नाही
बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला माझा व माझ्यासारख्या इतर पुरोगामी लोकांचा विरोध आहे,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-08-2015 at 03:54 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letter to editor