बाबासाहेब पुरंदरेंना दिलेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार शासनाने परत घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील काही साहित्यिक व विचारवंतांनी दिल्याचे वृत्त (लोकसत्ता, १७ ऑगस्ट) वाचले. कुठलाही निर्णय केंद्र अगर राज्य सरकारने घेतलेला असो अगर नियुक्ती केलेली असो त्याला विरोध आणि निषेध करण्याची अलीकडे टूम निघाली आहे. त्याचे महत्त्वाचे कारण हे आहे की, केंद्रात आणि राज्यात उजव्या विचारांची सरकारे आहेत व विरोध करणारे डाव्या विचारांना मानणारे आहेत.
सरकार कोणत्याही विचाराचे असो, ते आपल्या धोरणाने निर्णय घेणार हे साधे गृहीतक ही मंडळी मान्य करायला तयार नाहीत. आपल्या विचाराचे सरकार नाही म्हणून त्याला ऊठसूट विरोध करायचा असा अलीकडचा तथाकथित साहित्यिक विचारवंतांचा खाक्या असतो. सरकार कोणत्याही विचाराचे असो, ते अशा झुंडशाहीला बधत नसते, परंतु त्यांच्यामुळेच सामाजिक वातावरण कलुषित होत असते. त्यामुळे भालचंद्र नेमाडे, नागनाथ कोतापल्ले आणि विद्या बाळ, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे यांच्या हेतूबद्दल संशय घेता येतो. त्यांचा हेतू सामाजिक सौहार्द कलुषित करण्याचा नसेल तर त्यांनी आपल्या मताचे सरकार येईपर्यंत वाट पाहावी. शेवटी कोणा एकाची अगर निवडक काहींची एखाद्याच्या साहित्याविषयीची मते म्हणजे प्रमाण मत नसते. तसा आग्रहसुद्धा कोणी करता कामा नये.
नामदेव चं. कांबळे, वाशीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा