भालचंद्र नेमाडे यांनी काहीही बरळावे व आम्ही ते ऐकावे. यांना ज्ञानपीठ मिळाले म्हणजे हात गगनाला भिडले. मुंबई विद्यापीठात बोलताना आपण किती एकांगी विचार करतो याचा त्यांनी ऊहापोह करणे गरजेचे आहे. इंग्रजीत मराठीइतके अभिजात साहित्य बनले नाही, हे म्हणणे म्हणजे स्वत: इंग्रजीचे अध्यापन करून कोरडे राहणे. सुनीताबाई स्वत: ‘आहे मनोहर तरी’मध्ये लिहून गेल्या की, पुलंनी कोणत्या इंग्रजी संदर्भाने कोणते नाटक/ पुस्तकं लिहिले. पुलंनी जी शैली अंगीकारली होती ती पी.जी. वुडहाऊससारखी होती हे ते कबूल करत. हाच फरक आहे दांभिक व शैलीदार माणसात. एखाद्या भाषेचे गुणगान गाताना दुसरी भाषा कशी वाईट आहे किंवा इंग्रजीतील साहित्यावर असूड ओढणे, याची गरज नसते.
वसाहतवादाने आपल्याला पंगू नाही बनविले, उलट आपल्या समाजातले निखारे जास्त तळपले. नाही तर साहित्य फक्त उच्चभ्रू समाजाची मक्तेदारी राहिली असती. नेमाडेंचे एकंदर बरळणे, एरवी शांत असणाऱ्या कुलगुरू डॉ. संजय देशमुखांनाही सहन झाले नाही. मराठीतले ऱ्हस्व-दीर्घ काढून टाकले तर किती भयानक ‘दीन’पणा येईल ते सांगण्याची नामुष्की देशमुख सरांवर आली. मुलांना इंग्रजी माध्यमात जे पालक घालतात त्यांवर शासनाने कारवाई करावी ही मागणी तर या बरळण्याची सीमा होती. सर्व शिक्षा अभियान हे सरकारचे धोरण सर्वाना शिक्षण व हव्या त्या भाषेत शिक्षण या भूमिकेचा पुरस्कार करते. कोणी कोणत्या भाषेत शिक्षण घ्यावे हे ठरवणारे नेमाडे कोण? मुळात भाषेची बंधने लावायची आज परिस्थिती आहे का? तसे असते तर सर्व शिक्षण िहदी व इंग्रजीमध्ये झालेल्या जयंत नारळीकरांनी आपली सगळी पुस्तके सोप्या मराठीत लिहिली नसती. नेमाडेंना जेव्हा ज्ञानपीठ मिळाले तेव्हा आता काय काय ऐकायला लागणार याची धास्ती होती, तसेच झाले. ते हुशार आहेत, ज्ञानी आहेत. पण व्यवहार्य नाहीत. समाजाशी फटकून वागणारे आहेत. आपण ज्या व्यवस्थेत राहतो त्यावर फक्त आसूड ओढण्यात ते समाधान मानतात. उपाय सुचवत नाहीत.
नेमाडेजी, जरा भूमिका मांडताना आपण आज कुठे उभे आहोत याचा विचार करा. आजही उत्तम ग्रंथविक्री होत आहे. जे जे सकस ते टिकतेच. नाही टिकले तर समाजाची ती गरज नव्हती असे समजून पुढे चालावे.
तेव्हा नेमाडेजी मराठीची काळजी सोडा. निदान समाजाला हे तरी सांगा, की मराठी संवर्धनासाठी तुम्ही काय प्रयत्न केले?
मीरा भारती
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा