‘सत्य.. सुंदर.. घराबाहेर!’ हा अग्रलेख (१२ ऑगस्ट) वाचला आणि वृत्तपत्रांनी दुसरीकडे बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडेच.. ध्यानात घेतले नाही याची प्रचीती आली.
अमेरिका आणि भारत या मुळात वेगवेगळ्या जीवन पद्धती आहेत. त्यांची तुलना करणे हेच मुळी चुकीचे (जी चूक मी १० वर्षांपूर्वी आल्या आल्या करत होतो.). भारतातले हिरो वेगळे; तिकडचे वेगळे. मीडिया फक्त मोठे पसे दिसले की लक्ष देते. ‘एन्रॉन’चा पर्दाफाश करणारा दिवंगत गिरीश संत, मोठी नोकरी सोडून त्याची स्वयंसेवी संस्था पुढे चालवणारा श्रीनिवास, सौर ऊर्जेवर काम करणारा ‘आयआयटी’मधला प्राध्यापक शिरीष ब. केदारे हे प्रसारमाध्यमांना आधी सापडत नाहीत हे आमचे दुर्दैव. प्रसारमाध्यमांचे डोळे अमेरिकेत काय होतेय इकडेच असतात! आपले आंबे तिकडे जातात पण आपल्याकडेही असतात. फक्त तिकडच्या आंब्यांचे कौतुक जास्त आणि किंमतही! तिकडची सफरचंदे आपण महाग असून घेतोच.
ज्या देशात एक कंपनी सुरू करायला सतराशेसाठ गोष्टी करायला लागतात, परत प्रत्येक पायरी ही उपयुक्ततेपेक्षा पसे खाण्यासाठीच केली आहे (प्रत्यक्ष अनुभव) अशी सत्य परिस्थिती आहे तिथे ‘स्टार्टअप कल्चर’शी तुलना करणे हास्यास्पद आहे. परंतु हे सांभाळूनसुद्धा आपल्याकडे अनेक तरुण भरारी घेत आहेत, तिकडे प्रसारमाध्यमांचे किती लक्ष आहे हा संशोधनाचा विषय आहे!
पुण्यातीलच उदाहरण घ्यायचे तर एक साधा जायचा-यायचा सुखद अनुभव देणारा रस्ता १० वर्षांत होत नाही याला कारण राजकारण्यांचे तिथल्या जमिनींचे भाव वगळता बाकी कशात रस नाही.
या पाश्र्वभूमीवर इतक्याच वेळात एक जण इथून तिथे जातो काय आणि एका साम्राज्याच्या मुख्य पदी पोहोचतो काय, याचे आपल्या परिस्थितीशी मोजमाप करणे ही मुळातच ‘अॅपल टू अॅपल’ तुलना नाही असे वाटते. आपण आपले आंबे आहेत तिकडे अधिक लक्ष देऊ- पसा हा आधारभूत न धरता!
अतुल कुमठेकर, पुणे
‘वेगळे काय करता आले असते?’
बुधवार (१२ ऑगस्ट) च्या अंकातील शशिकांत सावंत यांचा ‘ओरिजिनॅलिटी’वरचा लेख आणि ‘सत्य सुंदर घराबाहेर’ हा अग्रलेख हे दोन्ही उत्कृष्ट आहेत. प्रश्न नेमका मांडला गेला आहे. उपाय बरेच आहेत, त्यापकी एक सुचवीत आहे. पायथागोरसचा सिद्धान्त प्रमेय म्हणून सोडवला जातो. या सिद्धतेची एकच एक रीत (समांतरभुज चौकोनांचे समान क्षेत्रफळ) शिकवली जाते. पण असेही एक पुस्तक आहे की, ज्यात या प्रमेयाच्या ३६५ सिद्धता दिल्या आहेत म्हणजे वर्षभर रोज नव्या तऱ्हेने करून बघता येईल. म्हटले तर हा अपव्यय वाटू शकतो. पण ‘वेगळं काय करता आलं असतं?’ या प्रश्नाचा रियाझ म्हणून अशा गोष्टी उपयुक्त असतात. तेवढेच आकारमान कमीत कमी पृष्ठफळात मावणारा आकार गोलक (स्फिअर) हा आहे हेही सिद्ध करता येतेच. अशा वेळी साबणाचे फुगे गोलकाकार का बनतात, हाही प्रश्न विचारला गेला पाहिजे. ताणामुळे साबण-पाण्याचे कवच कमीत कमी जागा व्यापू पाहते. पण आतली हवा दाबली गेल्याने ती कवचाला आक्रसण्यास विरोध करते हे द्वंद्व गोलकाकारातच ‘सर्वाधिक सुस्थिर’ राहते. ही सिद्धता भूमितीय नाही पण वेगळी दृष्टी देणारी आहे. गणितातच नव्हे तर कोणत्याही बाबतीत ‘मी असतो तर वेगळे काय केले असते?’ असे स्वप्नरंजन (कारण तसे करणे आपल्याला जमले असते असे नाही) करण्याची सवय लावून घेतली पाहिजे.
उदाहरणार्थ ‘ओरिजिनॅलिटी’साठी अस्सलता हा शब्द दोन्ही लेखांत वापरला आहे. तो ‘ऑथेन्टिसिटी’साठी योग्य आहे. मी ‘ओरिजिनॅलिटी’साठी ‘आदिजनकत्व’ हा शब्द जास्त योग्य आहे असा एकदा तरी उल्लेख करून नंतर ‘ओरिजिनॅलिटी’च ठेवला असता. ‘पिंजरा’ या सिनेमाचा शेवट मी बदलला असता. ‘दुश्मन’मधील राजेश खन्नासारखी ‘मास्तर’लाही त्याच गावाची सेवा करण्याची शिक्षा होते. ती सहन करत असताना त्याच्या लक्षात येते की ‘गुरुजीं’च्या नावाखाली गावात भ्रष्टाचारच चालू आहे. एक सोवळा गुरुजी येईल आणि गाव सुधारेल ही कल्पनाच चुकीची आहे. मीच गुरुजी आहे असे जाहीर करून मास्तर मूर्तिभंजन करतो- ‘प्रेमात पडून तमाशात जाण्याचे स्वातंत्र्य मला होतेच, मीच वेडय़ासारखे ‘गुरुजी’ या प्रतिमेचे रक्षण करत बसलो.’ माझा िपजरा जोरात आपटला असता. पण मुद्दा तो नाही. ‘वेगळे काय करता आले असते’ हा रियाझ चालू राहिला पाहिजे.
राजीव साने, पुणे
निष्पक्षपाती राज्य कुठे?
‘सत्य.. सुंदर.. घराबाहेर!’ हा अग्रलेख (१२ ऑगस्ट) वाचला. प्रतिभेच्या व कर्तृत्वाच्या जोरावर एखाद्याने जागतिक स्तरावर नावीन्यपूर्ण उत्पादनाची निर्मिती करून दाखवणे हा केवळ कळस असतो, जो सर्वाना लांबूनही दिसतो. पण अशी उंची गाठण्याकरता अनेक स्तरांवर किती खोल पायाभरणी आधी करावी लागते याकडे आपले कधी लक्षच नसते. या पायाभरणीमधला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कायद्याचे निष्पक्षपाती राज्य आणि त्या अनुषंगाने कुठल्याही कृत्रिम आडकाठीविना आपापली गुणवत्ता सिद्ध करण्याची समान संधी सर्वाना देणारी विश्वासार्ह व्यवस्था. राखीव जागांच्या धोरणावर टीका केल्यामुळे हा(ही) अग्रलेख टोकाच्या रोषाचे कारण होऊ शकतो; पण संधीची समानता आणि राखीव जागा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, याकडे आपण राजकारणामुळे दुर्लक्ष करत राहतो. मुलांना वयाच्या पंचविशीपर्यंत अर्थार्जन न करता पूर्णवेळ शिक्षण घेऊ देण्यास साह्य़भूत ठरणारी कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक पाश्र्वभूमी भारतात अजूनही आहे. अमेरिकेत तशी ती नसल्यामुळे सोळाव्या वर्षीच अनेक मुले अर्थार्जनाच्या मागे लागतात, हेही लक्षात घ्यायला हवे.
प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>
प्रबोधनाचीही टंचाई!
कांद्याची लक्षणीय भाववाढ होत आहे. त्यामुळे आता आंदोलनेसुद्धा होऊ शकतात. या पाश्र्वभूमीवर कांद्याची की नियमनाची टंचाई? हा डॉ. गिरधर पाटील यांचा लेख (५ ऑगस्ट) अधिकच महत्त्वाचा ठरतो.
‘‘माल काय भावाने विकला हे आडत्यांनी शेतकऱ्याला कळवणे बंधनकारक आहे. कांद्याचे उत्पादन चार लाख कोटींचे; मात्र पणन खात्याच्या आकडेवारीत ४० हजार कोटींची उलाढाल.. काही घटकांचा एकाधिकार झाल्याने शेतकरी व ग्राहक या दोघांच्या शोषणाच्या शक्यता व संधी.. आडत बेकायदाच, हा निवाडा होऊनही सरकार त्याबाबतचा निर्णय जाहीर करायला घाबरते.. परवाना पद्धतीमुळे भाव ठरवण्याचे अधिकार खरेदीदारांकडेच.. बातमी कमाल दराची-एखाददुसऱ्या, तोही व्यापाऱ्याच्याच कांद्याला मिळालेला, साठेबाजीनेच टंचाईचे वातावरण- शेतकऱ्यांची व ग्राहकांची मानसिकता तयार केली जाते.. गुणवत्तेच्या १० टक्के कांद्याची निर्यात तेजीचक्रापूर्वीच होऊन गेलेली असते, कांदा दरात दहा टक्क्यांचीच फेरफार व्हायची शक्यता असते.. उन्हाळी, जास्त दिवस साठवलेला कांदा निर्यातक्षम नसल्याने भाववाढीशी संबंध नसतो’’ हे उद्बोधक आहे.
भाववाढीबाबत दिशाभूल कशी केली जाते, जनतेच्या वेदनेचा रोख भलतीकडे वळविला जातो हे यातून उघड होते.
परंतु कांद्यावरून भावनिक आंदोलने होतात, त्या प्रश्नाच्या मुळाशी जाणारे लोकशिक्षण होतच नाही. वैचारिक प्रबोधन होणे हा आंदोलनांचा पुढला टप्पा गाठलाच जात नाही. ‘प्रबोधनाची टंचाई’ हीदेखील चिंतेची बाब आहे.
-राजीव जोशी, नेरळ
लोकसेवकांची कर्तव्यनिष्ठा
परिवहन मंत्री रावते यांच्या मुलाने पोलिसांशी हुज्जत घातल्याची तसेच त्या अनुषंगाने ‘वडिलांनी’ दिलेले स्पष्टीकरण (लोकसत्ता, १३ ऑगस्ट) वाचले. मुले त्यांच्यासमवेत राहात नसतील तर मुलांनी मद्यपान केले नव्हते असे ते कशाच्या आधारे म्हणतात? जर मुलाने मद्यप्राशन केले नव्हते तर त्याने आवश्यक त्या चाचणीस सहकार्य देणे जरूर होते. खरे तर या प्रकरणात मंत्रीमहोदयांनी त्यांच्याशी संपर्क झाल्यावर ‘नियमाप्रमाणे कारवाई करावी’ या एका वाक्यात प्रकरणावर पडदा टाकणे शोभून दिसले असते. परिवहन मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा उजळली असती. वृत्तामध्ये मुलाने पोलिसांना ‘लाखोली’ वाहिल्याचाही उल्लेख आहे. ही सर्व घटना निश्चितच भूषणावह नाही. अच्छे दिन दाखविण्याचा शब्द दिलेल्या पक्षातील ‘लोकसेवकांनी’ अधिक जबाबदारीने कर्तव्यनिष्ठता दाखवावयास हवी; अन्यथा ‘त्यांच्यात व तुमच्यात फरक काय,’ असा प्रश्न तुमच्या मतदाराला पडू शकतो.
-मधुकर घारपुरे, सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
उचलेगिरी नव्हे, प्रेरणा!
‘ओरिजिनॅलिटीचा इतका अभाव का?’ हा शशिकांत सावंत यांचा लेख (१२ ऑगस्ट) वाचला, बव्हंशी पटलाही. पण त्यांनी जाता जाता आडून केलेला वार मात्र खटकला. ‘हल्लीच ज्या एका मराठी सिनेमाचे कौतुक झाले..’ हा तो आडवार! सरळच हा उल्लेख एलिझाबेथ एकादशीबद्दल आहे. ज्यांनी हे दोन्ही चित्रपट पाहिले असतील त्यांना एकादशी पाहिल्यावर मजीद-माजिदींच्या ऑस्कर पुरस्कारप्राप्त ‘चिल्ड्रेन ऑफ हेवन’ची नक्की आठवण झाली असेल. ‘लोकरंग’मध्ये प्रा. दासू वैद्य यांनी हा उल्लेख केलाही होता. मग सावंत यांनी नाव न घेण्याचे कारण काय?
माझ्या मते कलेच्या क्षेत्रातील प्रेरणा आणि उचलेगिरी यांतील गल्लत याला कारणीभूत असावी. दोन चिमुकल्या भावंडांची परिस्थितीशी झुंज याव्यतिरिक्त या दोन्ही चित्रपटांत साम्य नाही. अशी प्रेरणा विशेषत: कलेच्या क्षेत्रात नवीनही नाही किंवा ती सरळ सरळ उचलेगिरीही ठरत नाही. अन्यथा गुलजार यांचा ‘परिचय’ वा पुलंच्या ‘ती फुलराणी’लाही उचलेगिरी समजावे लागेल. तसे आरोप होतातही; परंतु या कलाकृतींतील वेगळेपण समजूनही येते आणि मान्यही करावे लागते.
प्रस्तुत आक्षेपापुरतेच बोलायचे झाल्यास सायली भंडारकवठेकरच्या ‘गरम बांगडय़ा गरम बांगडय़ा’ ही तरी ‘ओरिजिनॅलिटी’ सावंत सराईत नक्कल या सदरात टाकणार नाहीत अशी अपेक्षा.
-मनीषा जोशी, कल्याण</strong>
भारत-पाक संयुक्त ध्वजवंदन करा
आज पाकिस्तानचा तर उद्या भारताचा स्वातंत्र्य दिन. मग तो या दोन्ही देशांतल्या नागरिकांनी आपापल्या देशांत संयुक्तपणे साजरा का करू नये? भारत आणि पाकिस्तान हे दोघे विभक्त झालेले भाऊ आहेत. दोन्ही देशांनी अधिकाधिक जवळ यावे अशी या देशांतल्या अनेक नागरिकांची इच्छा आहे. ही इच्छा जाहीरपणे व्यक्त करण्याचे संयुक्त झेंडावंदन हे प्रतीकात्मक पण प्रभावी माध्यम ठरू शकेल. आपल्याला शांततामय मार्गाने आणि सख्खे भाऊ म्हणून जगायचे आहे असा संदेश त्यातून जाईल आणि आपले संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांच्या शासनास यातून बळ मिळेल.
अर्थात उपद्रवी, िहसाप्रेमी संघटना या कल्पनेला विरोध करतीलच. दोन्ही देशांत आपापल्या देशाशी द्रोह केल्याची आवईसुद्धा उठवली जाईल. आपल्या देशात दुसऱ्या देशाचा झेंडा फडकवला म्हणून थयथयाट करणाऱ्यांची कुठेच कमतरता नाही. पण जर आपण शांततामय आणि विवेकी लोकशाहीच्या मार्गाने हे करणार असू तर कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. न जाणो, भविष्यात ही कल्पना स्वीकारलीसुद्धा जाऊ शकते. जर सीमेवर इतकी वर्षे नित्यनेमाने एकाच वेळी ध्वज वर नेण्याचा/ उतरवण्याचा कार्यक्रम बिनबोभाट पार पडू शकतो तर मग दोन्ही देशांत वर्षांतून एकदाच हे का होऊ शकत नाही? आपण किती शहाणपणाने ही कल्पना अमलात आणू शकतो यावर बरेच काही अवलंबून आहे.
पाकिस्तानातल्या भारतीय वकिलातीत आणि भारतातल्या पाकिस्तानी वकिलातीत सामान्य माणसांनी जाऊन शुभेच्छा देणे, तसेच ई-मेल, फेसबुक वा इतर सामाजिक माध्यमांतून अशा शुभेच्छा पाठवण्याची सोय असणे हे त्यासाठी महत्त्वाचे आहे.
-अशोक राजवाडे
अनुकरणासाठी सत्ता मिळवलीत का?
सुषमा स्वराज यांच्यावर केलेल्या आरोपांना लोकसभेत उतर देताना त्यांनी, ‘आजवर काँग्रेसच्या राजवटीत काँग्रेसने असे किती लोकांना देशाबाहेर सुखरूप जाण्यासाठी मदत केली’ याचा पाढा वाचला. हा बचावात्मक पवित्रा झाला. हे त्यांच्यावर केलेल्या आरोपांना सयुक्तिक उत्तर नव्हे. काँग्रेसने जे जे केले ते ते तुम्हीही करावे म्हणून देशातील जनतेने भाजपच्या हातात सत्ता सोपविलेली नाही. त्यामुळे दर वेळी आरोपांना उत्तर देताना काँग्रेसने केलेल्या चुकांचा पाढा वाचण्याची सवय भाजपने सोडून द्यावी आणि सभागृहात काँग्रेस नव्हे, देशातील जनता तुम्हाला प्रश्न विचारीत आहे हे पक्के लक्षात ठेवावे. सभागृहातील पंतप्रधान मोदी यांची अनुपस्थिती आणि त्यांचे सर्व प्रश्नावरचे मौन, असे तर सूचित करू इच्छित नाही ना की, मी तुम्हाला एकहाती सत्ता मिळवून दिली, तुमच्याकडे विविध खाती सोपविली, आता त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची. माझ्याकडून कसल्याही मदतीची अपेक्षा करू नका. पण ही कामकाजाची पद्धत शेवट पक्षाच्याच मुळावर बेतण्याची शक्यता दृष्टिआड करून चालणार नाही.
-मोहन गद्रे, कांदिवली (मुंबई)
मांसाहार हे माझे हिंदू धर्माचरण..
‘आता मुद्दय़ावर या’ हा ‘अन्वयार्थ’ (१२ ऑगस्ट) वाचला. जैन धर्म याच देशातील असून तो िहदू धर्मापेक्षा वेगळा आहे, याची जाणीव सामान्य जणांना राजस्थान उच्च न्यायालयाच्या निकालामुळे झाली असावी. देशातील जैन हे बौद्ध, शीख, पारशी, ख्रिस्ती आणि मुस्लीम यांच्याप्रमाणे ‘अल्पसंख्य गटां’त मोडतात. तरीही िहदूंमधील मांसाहारासारख्या चालीरीती, रूढी आणि परंपरांमध्ये ‘खोडा’ घालण्याचे कार्य हे जैनधर्मीय करीत असतात आणि िहदूंमधील काही बाटगे शाकाहारी त्यांना साथ देत असतात. तेव्हा आपण दुसऱ्या धर्मातील धार्मिक चालीरीती, रूढी, परंपरा आणि धार्मिक मूलभूत हक्कांवर अतिक्रमण करीत आहोत असे का वाटत नव्हते?
नेहमी असा तर्क मांडला जातो की, िहदू हा एक धर्म नसून ती गेल्या हजारो वर्षांत विकसित झालेली ‘जीवनपद्धती’ आहे.. इत्यादी इत्यादी. मी ‘मांग’(अलीकडे काही लोक मांग या विशेषणाचे सात्त्विकीकरण करून ‘मातंग’ असे संबोधितात) या जातीत जन्मलो असून माझी जात िहदू धर्माचा अविभाज्य भाग आहे. मला माझी जात आणि धर्म आवडो अगर न आवडो; ती मला आयुष्यभर उरावर घेऊन जगावेच लागेल. िहदू जीवनपद्धती वर्ण आणि जातिनिहाय वेगवेगळी असल्याकारणाने कोणत्या वर्णाने आणि त्यातील जातीने कसे जगावे याचे नियम परंपरेने चालत आलेले आहेत. त्यांचे पालन ते समूह धार्मिक विधी, देवाचार, जन्म/विवाह आणि अंत्यसंस्कार यांतून पाळीत आलेले आहेत. तीच बाब खाद्यसंस्कृतीची आहे. खाद्यसंस्कृती आणि वर्ण व जातिव्यवस्था कप्पेबंद पण घट्ट, ठाशीव, बांधीव आहेत.
सनातन धर्माचा आद्य ग्रंथ भागवत, तसेच भगवद्गीता आणि त्यातून घेतलेल्या विचारांवर रचलेले ग्रंथ यातून कोणत्या वर्णाचा आहार कोणता असतो हे अगदी स्पष्ट सांगितलेले आहे. तसेच ज्या वर्णातील जन जे अन्नग्रहण करतात तसाच त्यांचा स्वभाव आणि आचरण असते, तशीच त्यांची मानसिकता असते असे सांगितले आहे. म्हणून ब्राह्मण वर्णाचा आहार हा ‘सात्त्विक’, क्षत्रिय वर्णाचा ‘राजस’ आणि उर्वरितांचा ‘तामस’ अशी वर्गवारी धर्मानेच करून ठेवलेली आहे. तसेच आमच्या िहदू धर्मामध्ये मांसाहाराचा निषेध केल्याच्या नोंदी प्रमाण ग्रंथांमध्ये नाहीत. असतील त्या ‘प्रक्षिप्त’ असाव्यात.
माझ्या धर्मानेच आहाराच्या ‘चतु:सीमा’ आखून दिलेल्या असल्याने, मी एक धार्मिक व्यक्ती असल्याने मी माझ्या वर्ण आणि जातीनुसार आहाराचे पालन करतो. त्यास कुणी आक्षेप का घ्यावेत? आम्ही आमचे बघून घेऊ.
राजस्थान उच्च न्यायालयाच्या निवाडय़ाने जैन धर्मीयांना त्यांच्या धर्माकडे बघण्याची जाणीव झाली; ते बरे झाले! आम्ही आमच्या आचरणाने इतरेजन दुखावले जाणार नाहीत याची काळजी नेहमीच घेत होतो. आम्हाला आमच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा पाळू द्या, तुम्ही तुमच्या पाळा!
-शाहू पाटोळे, औरंगाबाद
पेंढारकर अण्णांच्या आठवणींची अक्षय ‘शिदोरी’..
भालचंद्र पेंढारकर यांचे व्यक्तिमत्त्व लोभस कसे, याची ही आठवण. माझ्या वडिलांच्या ‘रसिक’ या संस्थेमध्ये कार्यक्रम देण्यासाठी सुमारे ३० वर्षांपूर्वी अण्णा नागपूरला आले होते. माझे तेव्हा गुरुवर्य प्रभाकर देशकर यांच्याकडे संगीताचे अध्ययन चालू होते. अण्णांकडे त्यांचे गुरू रामकृष्णबुवा वझे यांच्या दुर्मीळ चीजा असलेले एक पुस्तक आहे असे मला कळले. मी त्याबद्दल त्यांना विचारल्यावर तू मुंबईला आल्यावर मला भेट, मी तुला ते पुस्तक दाखवीन, असे आश्वासन दिले.
लवकरच मुंबईला जायचा योग आला. मी दूरध्वनी करून भेटायची वेळ घेतली. जाताना त्यांनी परवानगी दिल्यास त्या चीजा उतरवून घेण्यासाठी एक वही घेतली. मुंबई मराठी साहित्य संघात, जेथे अण्णांचे ध्वनिमुद्रण जतन करण्याचे काम चालू होते, तेथेच मी ते पुस्तक बघितले. अतिशय दुर्मीळ अशा त्या बंदिशी बघून मला खजिनाच गवसला. अण्णांनी मला येथेच बसून त्या उतरवून घे, अशी संमतीही दिली. सुमारे तासाभरानंतर ते बाहेरून काम करून आले व मला म्हणाले, तू हे पुस्तक बिऱ्हाडी घेऊन जा, मात्र नीट जपून वापर आणि सगळ्या बंदिशी लिहून झाल्या की परत आणून दे. मला खूपच आनंद झाला.
माझा मुक्काम तेव्हा माझ्या वडिलांचे स्नेही प्रभाकर पेंढारकर यांचेकडे होता. मी सकाळ, दुपार, संध्याकाळ बठक जमवून त्या सर्व बंदिशी लिहून काढल्या. मला मदत म्हणून लक्ष्मीकाकू पेंढारकर यांनीसुद्धा तीनचार बंदिशी नकलून काढल्याचे अद्याप स्मरते. पुस्तक परत करताना मला अण्णांचे आभार कसे मानावेत हे सुचेना. अण्णांनी मात्र, ‘चला या चीजा तुझ्या कामास येतील’ असे अगदी सहजपणे म्हटले.
आणखी एक किस्सा आठवतो. अण्णा नागपूरचे प्रसिद्ध संवादिनीवादक दिवंगत विनायक वालधुरकर यांना घेऊन नागपूरजवळील तीन-चार गावांच्या दौऱ्यावर होते. पावसाच्या त्या दिवसांत मार्गातील नदीला पूर असल्याने एस. टी. बस अडकून पडली. लवकर निघण्याची चिन्हे दिसत नव्हती. अध्र्या-पाऊण तासानंतर अण्णांनी आपल्याजवळील पिशवीमधून एक ब्रेडचा पुडा काढला. एका पुडक्यातून चिवडा काढला आणि वालधुरकरांना दिला व म्हणाले, ‘दौऱ्यावर असे प्रसंग येतातच. जवळ शिदोरी असलेली बरी.’ त्या पोटपूजेच्या भरवशावर दोन-तीन तास चांगले गेले.
अशा या सहृदय कलावंताला विनम्र श्रद्धांजली.
प्रशांत प्रभाकर चाफेकर, नागपूर