‘राधे मांवरील टीकेमागे ‘निवडक अंधश्रद्धाविरोध’?’ या पत्रातून (लोकमानस, १२ ऑगस्ट) राधे मांची बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला आहे आणि त्याच भरात, सिनेतारका व राधे मां यांची तुलना केली ती चुकीची आहे असे वाटते. राधे मां या स्वयंघोषित का होईना आध्यात्मिक गुरू आहेत आणि जर एखादी व्यक्ती अध्यात्मातील असेल तर तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असतो. भारतीय संस्कृतीला अध्यात्माची मोठी परंपरा आहे. या परंपरेनुसार आध्यात्मिक व्यक्ती म्हटले की, लोकांच्या नजरेसमोर काही ठरावीक पोशाख परिधान केलेल्या व्यक्ती येतात. आजकाल सिनेतारका तसे कपडे घालतात म्हणून एखाद्या आध्यात्मिक माणसाने तसे कपडे घातले तर ते शोभून दिसणार नाहीच.
कपडे कसे घालावेत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, हे खरे; पण सार्वजनिक वावरात हा प्रश्न वैयक्तिक राहत नाही. लोक तुमच्यावर बोलणारच. ही सामाजिक बंधने आपोआप येत असतात आणि सार्वजनिक जीवनात ‘आध्यात्मिक व्यक्ती’ म्हणून वावरायचे असेल तरी ती पाळावी लागणार, ही सद्य:स्थिती आहे. या राधे मांला काही प्रसारमाध्यमांनी नक्कीच गरजेपेक्षा जास्त प्रसिद्धी दिली हे म्हणता येऊ शकेल, पण याचा संबंध अंधश्रद्धाविरोधी लोकांशी जोडणे चुकीचे आहे. पत्रलेखकाच्या म्हणण्यानुसार राधे मांला जसे स्वातंत्र्य आहे तसे प्रसारमाध्यमांनादेखील आहे, पण आपण काय पाहावे यावर तरी कोणाचे बंधन नाही!
गणेश शेळके, पिंपरी-चिंचवड
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा