‘रविवार विशेष’ (२९ ऑगस्ट) पानांमध्ये अजित अभ्यंकर व प्रभाकर बाणासुरे यांनी बदलत्या कामगार कायद्यांचा अमानवी चेहरा स्पष्टपणे उघड करून दाखविला आहे. या कामगार कायद्यांना विरोध करताना कामगार संघटनांनी बालकामगार कायद्यात केंद्र सरकार करत असलेल्या कायद्यांनाही विरोध करावा. बालकामगार कायद्यातील सुधारणा विधेयक हे लोकसभेत मान्य झाले असून राज्यसभेत चच्रेसाठी आहे. या कायद्यात १४ वर्षांखालील मुलांना त्यांच्या घरगुती व्यवसायात मदत करायला शाळेच्या वेळेव्यतिरिक्त परवानगी दिलेली आहे. खरे तर कुटुंबाच्या दुकानात, शेतात अनेक मुले शाळेच्या वेळेव्यतिरिक्त काम करतच असतात, पण कायदा करून त्याला मान्यता देणारी वरवर साधी वाटणारी ही तरतूद बालकामगार प्रथेला राजमान्यता मिळवून देणारी आहे. देशाचा विकासदर वाढवायला व भांडवलदारांना स्वस्त मनुष्यबळ मिळवून देण्याचा हा खटाटोप आहे.
आज मोठय़ा उद्योगांनी कंत्राटीकरणात उत्पादनाचे छोटे भाग बनवायला देण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. शहरी झोपडपट्टय़ांत घरोघरी अशी उत्पादने सुरू असतात. यात लहान मुलांचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो. त्याला राजमान्यता देण्यासाठी हा बदल होत आहे. ही मुले हे काम शाळेच्या वेळेत करतात की नाही बघण्याची शासन कोणती यंत्रणा निर्माण करणार आहे? आज शाळेच्या पटावर नावे असून वर्षांनुवष्रे गरहजर असणारी महाराष्ट्रात १० लाखांपेक्षा जास्त मुले असूनही त्यांना हजर करण्याचे प्रयत्न होत नसताना हे प्रमाण वाढवायला शासन या घरगुती बालमजुरीला कायदेशीर मान्यता का मिळवून देत आहे..?
दुसरा गंभीर मुद्दा हा आहे की, आज झारखंड व तळकोकणात पालकांना वार्षकि मोबदला देऊन लहान मुलांना शहरी भागात कामासाठी आणणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. मुंबईत अनेक फ्लॅटच्या बंद दाराआड अशी बालमजुरी सुरू आहे. मोठय़ा वयाचे नोकर गुन्हेगारी करतात, यामुळे लहान मुलांना घरकामगार ठेवण्याचे प्रमाण मुंबईत वाढते आहे. या कायद्यामुळे ही मुले आमच्या घरातलीच आहेत, असे सांगणे सुलभ होईल. तीच बाब परभाषिक मजुरांची आहे. उत्तर भारतीय एकदा आले की त्यांच्यामागे गावाकडून अनेक जण येतात. महाराष्ट्राच्या अगदी छोटय़ा गावातही परभाषिक मजूर पोहोचले आहे आणि त्यांच्यासोबत हजारो लहान मुले आहेत. आम्ही कार्यकत्रे जेव्हा त्यांना हटकतो तेव्हा ‘हा माझा मुलगा /पुतण्या’ अशी बतावणी ते करतात. या कायद्याने हे प्रमाण वाढेल. कार्यकर्त्यांनी काय प्रत्येक दुकानात, हॉटेलात काय मालक आणि बालकामगार यांच्या डी.एन.ए. टेस्ट करायच्या का..? जो बेफिकीर कामगार विभाग आजच बालकामगार समस्येकडे पूर्णत: दुर्लक्ष करतो तो कामगार विभाग झोपडपट्टीत जाऊन हॉटेल दुकानात जाऊन मुलांच्या नात्यांची तपासणी करेल आणि ती मुले शाळेत जातात का हे तपासील हे केवळ अशक्य आहे.
तेव्हा कामगार संघटनांनी कामगार कायद्यातील या अमानवी बदलाविषयी बोलायला हवे. शिक्षक संघटनांनी त्यांच्या व्यावसायिक मागण्यांवर बोलताना हा थेट शिक्षणाशी संबंधित विषय असल्याने यावर बोलायला हवे. महाराष्ट्रात जणगणनेनुसार ४ लाख ९६ हजार बालकामगार आहेत. ती संख्या वाढविणाऱ्या या विधेयकाला राज्यसभा खासदारांना पत्र लिहिण्याचे आंदोलन व्हायला हवे. मुलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना व आम्ही कार्यकत्रे या विषयावर राज्यात विभागीय परिषदा घेत आहोत. कामगार, शिक्षक संघटनांनी राज्यसभा खासदारांवर दबाव वाढवला, तर भूसंपादनासारखी शासनाला माघार घ्यावी लागेल
हेरंब कुलकर्णी, अकोले (जि. अहमदनगर )
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा