‘खालून आग, वर..’ (२५ ऑगस्ट) हे संपादकीय वाचले. मुंबई भाग-भांडवली बाजाराचा निर्देशांक १,६२४ अंकांनी गडगडला, त्याला जागतिक घडामोडी कारणीभूत आहेत. त्यापैकी चीनच्या चलनाचे अवमूल्यन, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, जागतिक पातळीवरील घटलेली निर्यात, तेलाचे कमी झालेले मूल्य यांचा उल्लेख संपादकीयात असून सोन्याची आयात या घटकाचा ऊहापोह नाही. तसेच मुंबई भाग-भांडवली बाजाराची पडझड ही अल्प कालावधीतील घसरण आहे. इतिहास पाहता अशी घसरण ही होतच असते. मुंबई बाजार यातून सावरतो, असेही यापूर्वी दिसून आले आहे.
सात वर्षांनंतर झालेल्या या मोठय़ा घसरणीला जागतिक सामान्य गुंतवणूकदारांना भाग-भांडवली बाजारात गुंतवणूक करण्याची ही उत्तम संधी आहे. जागतिक आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे भागभांडवल (शेअर्स) कमी भावात मिळत असल्यास, योग्य अभ्यास करून ही संधी मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांनी सोडता कामा नये. सोन्याचा भाव वाढत असून त्यात शक्य असल्यास गुंतवणूक करावी. परंतु अडीअडचणीला किती जण सोने विकून तो नफा पदरात पाडून घेतात, हा प्रश्न उरतोच. सोन्याशी सर्वाचे भावनिक नाते आहे; त्याऐवजी त्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.
उद्योगसमूहांचा व्यवसाय विश्वास निर्देशांक (बिझनेस कॉन्फिडन्स इंडेक्स) हा मात्र चिंतेचा विषय आहे. उद्योगविश्वासाठी केंद्रीय वित्त मंत्रालय व रिझव्र्ह बँकेने ठाम निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशी दौरे करून बहुराष्ट्रीय आस्थापनांना भारतात गुंतवणूक करण्यास सांगत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळावे, हीच सदिच्छा!
विनीत शंकर मासावकर, नेरळ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा