सरकारी वैद्यकीय क्षेत्रातील ३००० रिक्त जागांबद्दलची बातमी (लोकसत्ता, ३१ ऑगस्ट) वाचली. आरोग्य संचालनालयाने खासगी क्षेत्रातील अधिक पगार हे त्यामागचे कारण देऊन स्वत:चा नाकत्रेपणा झाकण्याचा प्रयत्न केला आहे.
खासगी क्षेत्रात पदवीधारकांना ३५ ते ४० हजार रुपये पगार दिला जातो आणि शासकीय क्षेत्रात हाच पगार ५० हजार रुपयेच्या आसपास आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यास ७० हजारांच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे.
दुसरा मुद्दा असा की, पदवी घेऊन खासगी प्रॅक्टिस करणे हे कमी उत्पन्न मिळत असले तरी परवडते. कारण शासनाची धोरणे व्यवस्थित नाहीत. सर्वाना आरोग्यसेवा हवी असते, पण दवाखानेच बरोबर नाहीत. कितीतरी प्राथमिक आरोग्य केंद्रे अशी आहेत जिथे डॉक्टरच्या निवासस्थानी नीट शौचालयेसुद्धा नाहीत, पिण्याचे पाणी मिळणेदेखील दुरापास्त असते. अशा ठिकाणी केवळ डॉक्टरच नाही तर कुणीही व्यक्ती जाण्यास कचरते.
खूप प्राथमिक आरोग्य केंद्रे अशी आहेत की जिथे रिक्त जागेमुळे दोन डॉक्टरऐवजी एकच डॉक्टर सर्व कारभार पाहतो, म्हणजे दिवसपाळी अन् रात्रपाळीही तोच करतो, उपकेंद्रांना भेटीही तोच देतो, आरोग्य केंद्राअंतर्गत येणारी सर्व कामेही तोच करणार अन् तेही रोज.. दिवसा काम करून रात्रीही जागरणं अन् तेही रोज! शक्य आहे का हे?
या रिक्त जागांबाबत एक मुद्दा असाही आहे की जर त्या आरोग्य केंद्राचा एक डॉक्टर इन-सव्र्हिस पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी गेला तर इकडे रिक्त झालेली ही जागा रिक्त न दाखवता, ती भरलेलीच दाखवली जाते. त्यामुळे अशा आरोग्य केंद्राचा भार कमीत कमी तीन वर्षांसाठी एकटय़ा डॉक्टरवर पडतो. हे खूप चुकीचे आहे. ही जागा रिक्त दाखवली तर दुसरा कुणीही तिथे येऊ शकतो.
याशिवाय मॅिलजर (आजार नसताना आजार असल्याचे भासवून परत परत दवाखान्यात येणारे लोक), प्रादेशिक किंवा गावातील राजकारण, गावातल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या लोकांकडून स्पेशल ट्रीटमेंटचा अट्टहास, रुग्णकल्याण समितीकडून होणारी रुग्णकल्यााणाची हेळसांड, काही वेळा तर पत्रकारांकडून पशासाठी धमक्या, अपुरा औषध गोळ्यांचा पुरवठा, क्र. १०२ रुग्णवाहिकेत डिझेल टाकायलासुद्धा बजेट वेळेवर न मिळणे, काही उपचार मोठय़ाच दवाखान्यात होत असताना तो उपचार पसे नसल्याचे कारण सांगून प्राथमिक आरोग्य केंद्रातच करण्याचा रुग्णाच्या नातेवाईकांचा अट्टहास, अपुरे प्रशिक्षण असलेल्या एएनएम व एमपीडब्ल्यू आणि त्यांचे गावातील लोकांशी लागेबांधे यामुळे त्यांच्या चुकांसाठी कारवाई करताना येणारे अडथळे.. अशा खूप गोष्टी बारकाईने अभ्यास केल्यास आढळून येतील.
आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा खूप जणांची इच्छा असूनही त्यांना नोकरी देण्यास टाळाटाळ करणे. उपसंचालनालयात अस्थायी उमेदवारांना ऑर्डर देण्यासाठी सर्रास पशांची मागणी केली जाते, हा आरोप जुनाच आहे. खूप भरलेल्या जागा या आभासी असतात, प्रत्यक्षात त्या भरलेल्या नसतात. आता आणखी एक नवीन जीआर आलाय म्हणे की बंधपत्रित उमेदवाराने ज्या उपविभागात ऑर्डर घेतली त्याने संपूर्ण कालावधी त्याच उपविभागात काम करायचे, पण जर त्याच्या जागी स्थायी उमेदवार आला आणि त्या उपविभागात इतरत्र रिक्त जागा नसतील तर बंधपत्रित उमेदवाराने घरी बसून राहायचे का? आणि प्रत्येकाला सोयीच्या ठिकाणी नोकरी हवी असते, त्यात गर काहीच नाही. स्वत:च्या गावात किंवा तालुक्यात जरी नोकरी मिळाली तरी शासकीय सेवेतील डॉक्टरांची गळती बऱ्याच प्रमाणात कमी होईल.
एकंदरीत शासनाला या वास्तव कारणांचे पुनर्वलिोकन करण्याची आवश्यकता आहे, डॉक्टरांना नोकरीच्या ऑर्डरसाठी हेलपाटे मारावे लागले नाहीत, तरी पुरेसे आहे.
डॉ. रितेशकुमार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा