आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून दररोज सकाळी नऊ ते साडे नऊ या वेळेत संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा वृत्तान्त ऐकविला जातो. त्याचे शीर्षक गीत ‘वारी चालली चालली, पंढरपुरा..’ असे आहे. पंढरपूरला वारकऱ्यांची दिंडी जाते. वारकरी वारीला जात असतात. दिंडीतून किंवा एकेकटे. विशिष्ट दिवशी वारंवार एखाद्या ठिकाणी नियमितपणे जाण्याला ‘वारी’ला जाणे म्हणतात. ‘वारी’ यातला विशिष्ट दिवस कालौघात गळून गेला असेल आणि अमुक वारीच्या ऐवजी फक्त वारी हा शब्द उरला असावा.  वृत्तपत्रांनी, विविध वाहिन्यांनी मराठीचे धिंडवडे काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे. त्या दिंडीत सामील न होता ‘आकाशवाणी’ने तरी सर्वसामान्य श्रोत्यांची मराठी आहे तशीच राहू द्यावी ही अपेक्षा!
-शाहू पाटोळे, औरंगाबाद

त्या मानाने आव्हाड भाग्यवानच!
‘संघातले दिवस’ या पुस्तकात स. ह. देशपांडे यांनी लिहिले आहे :  बाबा भिडे यांनी भाषणात सांगितले, ‘मानिबदू कोणी अपमानित केले त्याला शब्दात नव्हे कृतीने उत्तर द्या.’ नंतर रानडे बोलायला उठले. त्यांनी नाना फडणीस यांचा अपमान केला. म्हणून तेथे गो. नी. दांडेकर व त्यांच्या मित्रांनी त्यांना चपलांची माळ घातली आणि सभेतून प्रत्येकाने येऊन त्यांच्या मुस्कटात मारा असे आवाहन केले. अनेक स्वयंसेवक या वीरकृत्यात  सामील झाले. पोलीस चांगले, म्हणून ते वाचले. त्या मानाने जितेंद्र आव्हाड भाग्यवान म्हणायचे.
दत्तप्रसाद दाभोळकर

प्राथमिक शिक्षकांनी पुढे शिकायचेच नाही?
सध्या शिक्षण विभागात कुठेच एकवाक्यता दिसत नाही. शिक्षणक्षेत्रातच जर असे घडत असेल तर विद्यार्थ्यांचे भविष्य फार गंभीर रूप घेईल, म्हणूनच हा पत्रप्रपंच. प्रत्येक क्षेत्रात लायक, कर्तव्यदक्ष असणारे पदोन्नतीस पात्र ठरतात, मग ते कितीही ज्युनिअर असोत त्यांना त्यांच्या कामावरील निष्ठेमुळेच बढती मिळते, परंतु शिक्षणक्षेत्रात असे चित्र पाहायला मिळत नाही.
प्राथमिक विभागामध्ये पदवीधर शिक्षक भरतीमध्ये सर्वत्र गोंधळ होत असताना दिसतो. ११ नोव्हेंबर १९९९च्या शासन निर्णयाचा अर्थच काही जि.प.ला कळलेला नाही. उदा. रायगड, रत्नागिरी, पुणे, इत्यादी. जे ज्येष्ठ आहेत त्यांना पदवीधर शिक्षक नियुक्ती देतो, मग त्यांच्याकडे बी.एड्. असो अगर नसो. त्यांना सक्तीने ती जबाबदारी दिली जाते आणि ज्यांच्याकडे बी.एड्. आहे त्यांना मात्र डावलले जाते.
रायगड, रत्नागिरी, पुणे हे जिल्हे पदवीधर नियुक्ती ही सेवाज्येष्ठतेनुसार देऊन गुणवत्तेला दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. पदवीधर शिक्षकांसाठी बी.एड्. असणे अनिवार्य असताना सेवाज्येष्ठतेनुसार नेमणूक करून पुन्हा पाच वर्षांच्या आत बी.एड्. करून घेतले जाते. परंतु जे उत्साही शिक्षक आज बी.एड्., एम.एड्., पीएच.डी. करून तयार असताना त्यांना नियुक्ती दिली जात नाही. हा शिक्षणाला मारक ठरणारा निर्णय या जि.प. कशा काय घेत आहेत?   प्राध्यापकांना ज्यांनी डॉक्टरेट मिळविली आहे, त्यांना जादा चार वेतनवाढी दिल्या जातात आणि एखादा प्राथमिक शिक्षक जर डॉक्टरेट असेल तर त्याला एकही वेतनवाढ दिली जात नाही! असे का? उलट त्याला पदोन्नती देऊन त्याच्या ज्ञानाचा फायदा शिक्षण क्षेत्राला होण्यासाठी आपण पावले उचलणे गरजेचे आहे तरच भविष्यात हे शिक्षक बी. एड्., एम.एड्., पीएच.डी.  करण्यासाठी पुढे येतील आणि आपोआपच त्यांच्या ज्ञानात भर पडून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हायला वेळ लागणार नाही.
कमलाकर धुळगुंडे,   ताम्हणे करंबे (पो. कोलवट, ता. म्हसळा, रायगड)

कुलगुरूंकडून औचित्यभंग!
मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याच्या वृत्ताने धक्काच बसला. कुलगुरूंच्या या कृतीस अनेक प्राध्यापक, संघटना तसेच शिक्षणप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. राज ठाकरे कोणतेही संवैधानिक पद भूषवीत नाहीत. तसेच ते शिक्षणतज्ज्ञ नाहीत वा तसा त्यांचा लौकिकही नाही. अशा परिस्थितीत डॉ. देशमुख यांनी राज यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणे हे न केवळ अनुचित आहे, तर संकेतांचा भंग करणारेही आहे. नव्या कुलगुरूंचा कार्यकाल अशा घटनेने सुरू व्हावा, ही खरोखरच दुर्दैवाची बाब आहे.
– प्रा. दत्तात्रय बोरवणकर, ठाणे</strong>

सरकारच्या चांगल्या धोरणावरही टीकाच!
‘नसते लोढणे कशासाठी ?’ या संपादकीयात (२४ जुलै) परखड शब्दात राज्यातील शिक्षण परिस्थितीचा योग्य समाचार घेतला आहे. राज्यात आजही शालाबाह्य़ विद्यार्थी मोठय़ा संख्येने आहेत. तसेच अनेक शाळांमधून चांगले विद्यादान होत नाही हेही खरे आहे. पण म्हणून कोचिंग क्लासेस आणि खाजगी संस्थांचा मनमानी कारभार हे कमी महत्त्वाचे प्रश्न कसे ठरतात? क्लासेसच्या अनिवार्यतेमुळे पालकांचे काय हाल होतात ते एक पालकच जाणे. क्लासेसची फी इतकी अवाढव्य असते की त्यासाठी ईएमआयची व्यवस्था असते. तीच रड खासगी शिक्षण संस्थांची आहे. भरमसाट फी घेऊन निकृष्ट दर्जाचे शिक्षण देणाऱ्यांना वेसण घालायच्या प्रयत्नांवर टीका कशाला?
माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

‘संवेदनापटा’ ने शाळा आठवली..
‘संवेदनापट’ हा महेंद्र दामले यांचा लेख (लोकसत्ता, १८ जुल) वाचला. नकाशा हा संवेदनांचा पटच असतो, हे त्यांचे निरीक्षण लेख वाचून उमगले आणि पटलेही. जसे आकाशातल्या ढगांमध्ये, भिंतीवरच्या पोपडय़ांमध्ये आपल्याला वेगवेगळे पक्षी, प्राणी, चेहरे, इ. समूर्त आकार दिसतात, तसेच काहीसे नकाशांचेसुद्धा असते. हे आम्हाला शिकवले, आमच्या भूगोलाच्या नारखेडेसरांनी. राज्यांच्या सीमा न दाखवणाऱ्या भारताच्या नकाशात मद्रास आणि पॉण्डिचेरी (तेव्हाचे) दाखवायची सोपी युक्ती त्यांनी आम्हाला शिकवली होती. तामिळनाडू राज्य भारताच्या दक्षिणेला आहे. डावा हात केरळ, कर्नाटक, आंध्र झाकले जाईल अशा पद्धतीने भारताच्या नकाशावर ठेवला, की उजवीकडे दिसणारी तामिळनाडूची सागरी सीमा ही एका बाजूने दिसणाऱ्याला मानवी चेहऱ्यासारखी प्रतीत होते. कपाळ, नाक, तोंड, हनुवटी अगदी ठसठशीतपणे दिसतात. त्या कपाळावरील कुंकवाची जागा म्हणजे मद्रास शहराचे ठिकाण! आणि नाकावर कुंकू लावले, की झाली पॉण्डिचेरी! नकाशा म्हणजे संवेदनापट हे सरांनी शाळकरी वयातच शिकवले होते, ते आज एवढय़ा वर्षांनी दामले यांच्या लेखाने प्रत्ययास आले.
सत्यव्रत इंदुलकर, ठाकुरद्वार (मुंबई)