‘हिंदू कोड’विषयी डॉ. आंबेडकर काय म्हणाले?
‘राज्यघटनेत जातिअंताचा उपाय नाही’ या शरद पाटील यांच्या एका भाषणातील विधानावरून राम गोगटे, प्रदीप देशपांडे, विजय शिर्के, कॅप्टन भाऊराव खडताळे आणि सरोजिनी वांद्रेकर आदींची पत्रे येत आहेत, ती वाचली. यापैकी वांद्रेकर यांच्या पत्रात (२८ नोव्हें.) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाची खूण असणाऱ्या ‘हिंदू कोड बिला’चा उल्लेख आहे. ब्रिटिशकालीन हिंदू संहिता विधेयक कायदा खात्याच्या अभिलेख खोल्यांमध्ये धूळ खात पडले होते.. पहिल्या नेहरू सरकारच्या कारकिर्दीत कायदेमंत्री असताना डॉ. आंबेडकर यांनी तेथून ते काढले व त्याला नवा आकार देऊन मोठय़ा आशेने ते घटना समितीपुढे आणि नंतर लोकसभेतही मंजुरीसाठी मांडले. डॉ. बाबासाहेबांना हिंदू कायद्यातील काही शाखांची सुधारणा करायची होती. ती त्यांची फार मोठी तळमळ होती. या हिंदू कोड बिलमध्ये जातीचे पूर्ण उच्चाटन त्यांनी केले होते. मात्र हे विधेयक सनातनी लोकांना आणि मंत्रिमंडळातील काहींना आवडले नाही. ते मंजूर करून घेण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी धडपड केली, परंतु ते निराश झाले आणि वैतागून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ‘घाणीच्या उकिरडय़ावर मी राजवाडा बांधला होता!’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उद्गार हिंदू कोड बिलाला होणाऱ्या विरोधासंबंधीच्या निराशेतून आलेले आहेत.
मात्र, बाबासाहेबांचे हेच उद्गार महत्त्वाचे, असे मानण्याचे कारण नाही. ११ जानेवारी १९५० रोजी लोकसभेत डॉ. आंबेडकर यांनी जे भाषण केले, त्यातील अनेक वाक्ये आजही (विशेषत: राज्यघटना आणि मनुस्मृती, टिकूनच राहिलेली जातिव्यवस्था या पातळीवर वाद सुरू असताना) आठवण्यासारखी आहेत.
डॉ. बाबासाहेबांची त्या भाषणातील काही विधाने अशी :
१) हिंदू कोड बिलामुळे मूळच्या हिंदू कायद्यात ज्या सुधारणा करण्यात येत आहेत, त्या सुधारणांचा उद्देश हिंदुजातीवर अन्याय हा नसून सर्वसामान्य जागतिक कायद्याप्रमाणे हिंदू कायद्याला निश्चित स्वरूप द्यावयाचे आहे. सर्व भारतीयांना सर्वसामान्यपणे लागू होऊ शकेल असे सिव्हिल कोड तयार करण्याची ही पहिली पायरी आहे. कुठलाही विचारी मनुष्य या बिलातील मूलतत्त्वांना विरोध करणार नाही. ही तत्त्वे आचरणात कशी येतील याबाबत मतभेद असण्याचा संभव आहे.
२) विवाह किंवा दत्तक याबाबतीत नव्या बिलाने जातिबंधने पूर्ण नष्ट केली आहेत. या दोन्ही बाबतींत आताच्या कायद्यात कडक जातिबंधने आहेत. जातीशिवाय हिंदू नाही अशी आज हिंदूंची स्थिती आहे. परंतु या बिलामुळे विवाह किंवा दत्तक जातिबंधने न पाळता होऊ शकतील.
३) जातीचाच विचार केला तर आपल्या धर्मशास्त्रात दोन नियम दिसतात. मातृसावण्र्याच्या पद्धतीप्रमाणे मुलाला आईची जात मिळते; तर मनू ती अमान्य करतो. त्याला बापाची जात देतो. मिश्र विवाहापासून होणाऱ्या मुलाबाबतही जाती ठरवण्यात आल्या, त्यात फरक आहे. मनूच्या नियमाप्रमाणे बाप ब्राह्मण व आई क्षत्रिय असेल तर मूल ब्राह्मण ठरते व बाप ब्राह्मण आणि आई वैश्य असल्यास बाप आणि आई यांच्या जातींत दोन पायऱ्यांचा फरक असल्याने मूल वैश्य समजण्यात येते. मनूच्या पूर्वी असलेले नियम सांगताना मी म्हणतो की, शंतनू बाप व आई गंगा ही शूद्र आई यापासून झालेल्या भीष्माला क्षत्रिय जात मिळाली. तेव्हा नक्की कोणती जात आम्हाला मान्य आहे हे सांगता येणार नाही. तर कोठे धर्मशास्त्र पाहिजे यासंबंधी नक्की बंधन नाही.
डॉ. बाबासाहेबांच्या अन्य विचारांप्रमाणेच हिंदू कोड बिलाबाबतचे त्यांचे विचार आणि हेतू आजही प्रेरक ठरोत!
– निवृत्ती वासंबेकर, वासंबे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा