फेसबुकच्या माध्यमातून तरुणाई सगळ्या विषयांवर मते मांडत असते. उपरोधिक विधाने आणि अर्निबध मतप्रदर्शन यांना इथे मज्जाव नाही. अपशब्दांचा वापरही होत असतो. अशा परिस्थितीत शाहीनकडून झालेली चूक कोणाकडूनही होणे शक्य आहे हे ध्यानात घेऊन पूर्वीच याविषयी काळजी घ्यायला हवी होती.
मुळात अशा माध्यमांमुळे कोण्या एका व्यक्तीची भावनिक तिडीक आणि वैचारिक उद्धटपणा यातील भेदच पुसट होत चालला आहे. मुलांच्या शिक्षणाबद्दल मार्गदर्शन करणारे पालक, याबाबत मात्र मार्गदर्शन करत नाहीत. ‘तो त्याचा प्रश्न आहे. तो पाहून घेईल काय ते!’ असाच दृष्टिकोन पाहावयास मिळतो; परंतु सामाजिक व्यासपीठावर व्यक्त केलेले मत वैयक्तिक राहत नाही! ही माध्यमे निव्वळ माध्यमे नाहीत, तर विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारी साधने आहेत. असे नसते तर लाइक, कमेंट अशा सोई उपलब्ध नसत्या!
एकंदरच या माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खरे तर बदलायला हवा. ही माध्यमे आणि वास्तव एकमेकांशी निगडित आहेत हे कळायला हवे. जे जे व्यासपीठावर व्यक्त होते त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरले जाईल, हा संदेश मिळाला पाहिजे, तरच तरुण पिढी निर्भीडपणे विचार व्यक्त करायला आणि विचारांची जबाबदारी घ्यायला तयार होईल. स्वत:च्या विचारांबाबत भ्याडासारखे नमावे लागणार नाही, कारण तो विचार परिपक्वतेतून, समजून उमजून आलेला असेल.
शाहीन धडा प्रकरणात कारवाई होण्यापूर्वी फेसबुकवर काहींनी असंतोष व्यक्त केला. काहींनी सरळ नावाचा उल्लेख करून, तर काहींनी सूचकपणे. यावरून लक्षात येते की, अशा गंभीर परिस्थितीतही तरुण पिढीच्या ‘टेक इट लाइटली’ वृत्तीचा अतिरेक होतो आहे. समाजमनाच्या विरोधात विचार मांडण्याची मुभा हा मुळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गाभा आहे; परंतु स्वातंत्र्य हे खेळणे नव्हे तर शस्त्र आणि अस्त्र आहे. याची जाणीव न ठेवता माफी मागून कातडी बचावणे हे मला अधिक धक्कादायक वाटते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा