शरद बेडेकर यांच्या ‘मानव विजय’ लेखमालेतील ‘भगवन्-भक्ती’ (३० मार्च) लेखात गीता व महाभारताच्या संदर्भात दोन परिच्छेद आहेत. हे दोन्ही ग्रंथ विभिन्न कालखंडांत लिहिले गेले, असे प्रतिपादन लेखात आहे. ते वाचताना मला डॉ. ग. श्री. खेर यांच्या प्रबंधात्मक पुस्तकाची आठवण झाली. महाभारतातले युद्ध खरोखरच झाले असेल आणि त्याच्या प्रारंभी गीता सांगितली गेली असेल तर ती आहे त्या स्वरूपात कथन करायला किमान एक प्रहर म्हणजे तीन तास लागतील! एवढा वेळ समोरासमोर उभे ठाकलेले सन्य शांत राहून उपदेश ऐकेल हे कोणत्याही विचारी माणसाला संभवनीय वाटत नाही. हे सूत्र घेऊन डॉ. खेरांनी मूळ गीतेचा शोध घ्यायला सुरुवात केली. ते संशोधकापेक्षा संस्थाचालक होते. तरीही कुशाग्र बुद्धीच्या बळावर उपरोक्त प्रबंध विधान वेगवेगळ्या पुराव्यांच्या साह्याने तपासून पाहील.
आपले हे लेखन त्यांनी सर्वसामान्यासाठी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. युद्धप्रसंगी संक्षिप्त असलेली गीता पुढील काळात प्रक्षिप्त कशी झाली हे त्यांनी सिद्ध केले. त्यात सांगण्यासारखी विशेष बाब म्हणजे ज्या काळात बहुरंगी छपाई करणे अवघड व स्वप्नवत होते, त्या काळात डॉक्टरांनी संशोधित गीता काळ्या, हिरव्या व तांबडय़ा शाईत छापली होती! त्यांच्या अलौकिक कार्याची दखल कुणीही फारशी घेतली नाही. त्यामुळे गीतेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन जुना, पारंपरिक व गतानुगतिकच राहिला! महाराष्ट्रात असे अनेक क्षेत्रांत घडत आले आहे. आज तरी डॉ. खेरांसारख्या शेकडो संशोधकांची अवस्था ‘नाही चिरा नाही पणती’ अशीच आहे, हे खेदाने नमूद करावे लागते.
विजय काचरे, पुणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा