ख्यातनाम पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना पर्यावरण क्षेत्रातील मानाचा टेलर पुरस्कार जाहीर झालेला आहे. सर्व पर्यावरणप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांसाठी ही निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. डॉ. गाडगीळ यांच्या पर्यावरण आणि जैवविविधता क्षेत्रातील भरीव कामगिरीवर यानिमित्ताने शिक्कामोर्तब झालेले आहे.
डॉ. गाडगीळ हे ‘पश्चिम घाट सर्वेक्षण समिती’चे अध्यक्ष होते. त्यांनी पश्चिम घाट या जैववैविध्याच्या दृष्टीने संवेदनशील परिसराचे केलेले विस्तृत सर्वेक्षण आणि येथील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी दिलेले प्रस्ताव व सूचना यांना टायलर पुरस्कार समितीने अधोरेखित केलेले आहे. विशेषत: लोकसहभागावर आधारित निसर्गसंवर्धनासाठी त्यांनी धरलेला आग्रह पुरस्कार समितीने विशेष बाब म्हणून ग्राहय़ धरलेला आहे.
ज्या अभ्यासाला आणि सूचनांना आंतरराष्ट्रीय पातळीवर वाखाणले जाते त्यांना आपल्या देशात काडीचीही किंमत दिली जात नाही ही यातील खेदजनक बाब. पर्यावरण क्षेत्राविषयी खरी कळकळ असणारे जयराम रमेश पर्यावरणमंत्री असताना त्यांनी माधव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापली होती. हा अहवाल जनतेसमोर आणण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना न्यायालयीन लढा द्यावा लागला होता. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या चारही राज्य सरकारांनी या अहवालाच्या शिफारसींना एका सुरात विरोध केलेला होता. विकासाला खीळ घालणारा अहवाल म्हणून त्यावर टीकाही करण्यात आली. केंद्र सरकारने पाठोपाठ कस्तुरीरंगन समिती नेमून एक प्रकारे या अहवालाचे अवमूल्यनच केलेले होते.
निसर्गसंरक्षण आणि संवर्धन हे विषय आपल्या देशात पुरेशा प्रगल्भतेने हाताळले जात नाहीत, ही वस्तुस्थितीच आहे. एतद्देशीय वैज्ञानिकांच्या प्रयत्नांना जगाने मान्यता द्यावी, परंतु आपणाला त्यांच्या कामगिरीचे महत्त्व पटू नये हा इतिहासच डॉ. माधव गाडगीळ यांच्या रूपाने पुन्हा एकदा घडत आहे. ‘पिकते तिथे विकत नाही’ असे येथेही व्हावे?
ऋजुता खरे, चिपळूण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा