‘थप्पडीचे डोहाळे’ हा अग्रलेख (१८ मार्च) वाचला. सर्वोच्च न्यायालयाने जाट आरक्षणाचा निर्णय रद्द केला, त्यामुळे जाट आरक्षण व मराठा आरक्षण यांचा एकमेकांशी समसमान संबंध जोडणे उचित ठरणार नाही.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला, हे राजकीय स्वार्थ पाहणे या दृष्टीने चुकीचेच; पण तरीही या निर्णयाचा समाजातील आर्थिकदृष्टय़ा मागास वर्गावर काय परिणाम झाला व होणार आहे, हेदेखील पाहणे गरजेचे आहे.
मराठा समाजातील ठरावीक प्रभावी घटकांमुळे इतर आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना दुर्लक्षून चालणार नाही. सततचा दुष्काळ, नापिकी यांमुळे मराठा समाजातील विशेषत शेतकरी वर्ग मागास आहे. आर्थिक दुर्बलतेमुळे उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्ये संदर्भातसुद्धा ही कारणे लागू पडतात. मराठा समाजातील छोटय़ाशा हिश्शाचा या आरक्षणामुळे होणारा फायदा पाहून, इतर मोठय़ा प्रमाणात आर्थिकदृष्टय़ा मागास मराठा समाजाच्या हितावर बंधन आणून आपल्या राज्यघटनेत अपेक्षित असलेल्या सर्वागीण सामाजिक विकासाच्या तत्त्वाला आपण मूठमाती देत आहोत का, याचा विचार व्हायला हवा. केवळ ‘३२ टक्के मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देणे चुकीचे’ अशा प्रकारची आकडेमोड व कागदी घोडे नाचवून, समाजातील एका गटास आर्थिक विवंचनेच्या दुष्टचक्रात राहू द्यायचे का?
– शेखर औटे-पाटील, पैठण.
(गजानन माधवराव देशमुख यांनीही
अशाच आशयाचे पत्र पाठविले आहे.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा