केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक लाख रुपये व त्यापेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा ‘पॅन’चा तपशील सादर करणे बंधनकारक करणाऱ्या प्रस्तावित तरतुदीला भारतीय रत्न व आभूषण व्यापार महासंघ यांनी विरोध केला आहे.  कारण (लोकसत्ता- १७ मार्चच्या बातमीतील त्यांच्या म्हणण्यानुसार) भारतात दागिन्यांची ७० टक्के खरेदी ही ग्रामीण भागातील म्हणजे प्राप्तिकराच्या जाळ्यातून मुक्त ग्राहकांकडून केली जाते, पॅनकार्ड नाही म्हणून त्यांच्या दागिनेखरेदीलाच बंदी आणणे अन्यायकारक आणि आधीच संकटग्रस्त असलेल्या सोने आभूषण उद्योगाला मारक ठरेल.
.. शेतीवर अवलंबून असलेला ६५ टक्के वर्ग, जो जीडीपीमध्ये (सकल राष्ट्रीय उत्पन्नात) फक्त १८ टक्के भर घालतो, तो सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे व वारंवार येणाऱ्या नसíगक आपत्तींमुळे भरडून निघत असताना, कायमच हलाखीच्या स्थितीत असताना, त्याच्याकडून ‘देशातील दागिन्यांच्या एकूण खरेदीपकी ७० टक्के खरेदी होते,’ असा आरोप करणे हा खोटारडेपणा व शुद्ध खोडसाळपणा आहे.
सर्व शेतकरी कैवाऱ्यांनी याबाबत रत्न व आभूषण व्यापार महासंघाचा जाहीर निषेध करावा  व अर्थमंत्र्यांना पत्र लिहावे की ‘शेतकरीवर्ग एक लाख रुपये व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची खरेदी तर दूरच, अशा खरेदीचे स्वप्नसुद्धा पाहू शकत नाही, व म्हणून अशा खरेदीकरता ‘पॅन’चा तपशील सादर करणे बंधनकारक ठेवावेच, शेतकरीवर्गाला त्याबाबत काहीही तक्रार नाही.’
चेतन पंडित

विदेशी गाईंविषयी गरसमज नकोत!
‘गोवंश हत्याबंदी : दुसरी बाजू’ दिनेश गुणे यांच्या लेखात (‘रविवार विशेष’ : १५ मार्च) गाईंविषयी गरसमज निर्माण करणारे काही संदिग्ध उल्लेख आहेत. आपण ज्यांना देशी गायी म्हणतो त्यांची दूध देण्याची क्षमता फारच अल्प असते. त्या मानाने संकरित गायी चांगलेच दूध देतात, म्हणून गेल्या २५-३० वर्षांत दुधाची उपलब्धता वाढली आहे. आपल्याला संकरित म्हणजे निकस, कमी गुणवत्तेचे असे समजण्याची सवय जडली आहे. तिच्यामुळे अनेक लोक विदेशी गाईंचे दूधही निकस असल्याचे समजतात आणि तसा प्रचार करतात. या संबंधात गुणे यांनीही काही उल्लेख केले आहेत; पण त्यासाठी कसलेही पुरावे दिलेले नाहीत. ‘‘या कायद्यामुळे दुग्धोत्पादन क्रांती होईल असा या क्षेत्रातील काहींचा दावा आहे,’’ असे गुणे यांनी म्हटले आहे; पण असा दावा करणारे कोण आहेत याचा काहीही थांगपत्ता त्यांच्या लेखातून लागत नाही.
 खरे तर महाराष्ट्रात अशी क्रांती झालेली आहेच आणि ती संकरित गाईंमुळेच झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे.
‘‘देशी गाईंची दूध देण्याची क्षमता कमी असल्याचा समज आहे, पण काही देशी गाईंनी हा समज खोटा ठरवला आहे,’’ असे गुणे म्हणतात; पण असा समज खोटा ठरवणाऱ्या देशी गाई कोणत्या आणि त्यांनी हा समज कसा खोटा ठरवला आहे याची कसलीच नेमकी माहिती त्यांनी दिलेली नाही. केवळ गीर गाईंनी ब्राझीलमध्ये जाऊन आपली क्षमता सिद्ध केल्याचे ते म्हणतात; पण तिथे गीर गायीने किती दूध दिले आहे याचा आकडा त्यांच्या लेखात नाही.  ‘‘शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली तर शेती समृद्ध होईल’’ हे गुणे यांचे म्हणणे खरे आहे; पण ही समृद्धी देशी गाईंनी येणार नाही. ती संकरित गाईंनीच येणार आहे. तसा आजवरचा अनुभव आहे. कोणत्याही देशी गोष्टीचा अभिमान असावा हे खरे, पण देशी गाईंच्या बाबतीत तशी सोय नाही.
अरिवद जोशी, सोलापूर

‘पॅनकार्ड नसते’ ही चुकव्यांची आवई
अखिल भारतीय रत्न व आभूषण व्यापार महासंघाच्या माजी अध्यक्षांचे वक्तव्य (लोकसत्ता, १७ मार्च) वाचले. हे वक्तव्य म्हणजे काही लहान मुले स्वतच कारभार करतात व ओरडा पडू नये म्हणून मोठा भोकाड पसरतात त्यापकी आहे. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीयीकृत बँकांत  PAN (पॅन) शिवाय खाते उघडता येत नाही. त्यामुळे प्राप्तिकराशी सुतराम संबंध नसलेल्या कष्टकऱ्यांनीही पॅनकार्डे घेतलेली आहेत. हे कार्ड मिळवणे सहज साध्य आहे. अर्थमंत्र्यांनी एक लाखाच्या वरच्या सोने खरेदीसाठी पॅनकार्ड आवश्यक करणे हे अव्यवहार्य कसे? एक लाखाची खरेदी करणारा ग्रामीण ग्राहक भले प्राप्तिकर भरत नसला तरी त्याला पॅनकार्ड घेणे सहज साध्य आहे. सराफी व तत्सम धंदा करणाऱ्यांना स्वतला कराच्या जाळ्यात यायचे नसते, म्हणून ही आवई.
– रेखा लेले, अंधेरी पूर्व

हा अत्याचार ‘नारीधर्मा’वर
स्त्री, मग ती अंगावर कोणत्याही रंगाचे वस्त्र ल्यालेली असो भगवे, सफेद वा हिरवे.. आपली संस्कृती तिला माता, माऊली, देवीचा दर्जा देते. ज्या संस्कृतीत कमी कपडय़ातील स्त्री म्हणजे बेशरम म्हणून हिणविली जात असे त्या ऋषिमुनी, संतमहात्म्यांच्या देशात, जिने संसाराचा खेळ मांडला असता तर अंगावर नातवंडे खेळवली असती अशा वयाच्या व्रतस्थ जोगिणीवर बलात्कार व्हावा ही आपल्यासारख्या तिसरी महाशक्ती आणि प्रगतिशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात द्रौपदीला भर दरबारात वस्त्रहीन करण्याइतकेच हीन कृत्य आहे.
हा प्रसंग कदाचित एका धर्माचा दुसऱ्या धर्मावर आपली दहशत बसावी म्हणून केला गेलेला अत्याचार असेल, पण जर शांतपणे विचार केला तर हा प्रसंग नरधर्माच्या पशूने नारीधर्मावर केलेला हल्लाच नाही का? कधी चालत्या बसमध्ये तर कधी विद्य्ोच्या देवळात, देवीरूपी अबलेची शिकार केली गेली आहे. जागा आणि व्यक्ती बदलल्या जातात, पण मनोवृत्ती आणि परिणाम तेच राहतात.
-राकेश परेरा, विरार

संख्येसाठी संकेतांना हरताळ
महाराष्ट्राच्या विधान परिषदेत सभापतीपदावरून जो गोंधळ  झाला आणि तत्कालीन विद्यमान अध्यक्ष मा. शिवाजीराव देशमुख यांना ज्या प्रकारे पायउतार व्हावे लागले ते पुरोगामी महाराष्ट्राला आणि भारताच्या लोकशाही संकेतांना  हरताळ फासणारे आहे!
राष्ट्रपती, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा यांचे अध्यक्ष तसेच अगदी खालच्या पातळीवर विचार केला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पीठासीन अधिकारी या पदांना एक प्रतिष्ठा असते. ती प्रतिष्ठा कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवण्याची जबाबदारी जशी त्यांची स्वत:ची त्याप्रमाणे सदनातील सभासदांची असते. हे संकेतच लोकशाहीचे प्राण असतात. वि. स. खांडेकरांनी एका ठिकाणी लिहून ठेवले आहे, ‘संकेत हे राजमार्गाप्रमाणे प्रशस्त असतात’; पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने केवळ आणि केवळ  आपल्या राजकीय (तसेच अन्य कोणत्या) स्वार्थासाठी असेल हा राजमार्ग अगदी पायवाट करून ठेवली आहे!  
अनिरुद्ध ग. बर्वे, कल्याण पश्चिम

‘आसूड’ नामुष्कीचेच
‘हवाहवासा आसूड’ हा अग्रलेख (१७ मार्च) वाचला. बऱ्याच ठिकाणच्या स्थानिक पक्षनेत्यांच्या आणि पक्ष सत्ताधारी असेल तर अप्रत्यक्षपणे शासनाच्या आशीर्वादाने शिमग्यापासून नवरात्रापर्यंत सर्व उत्सव रस्त्यांवरच साजरे केले जातात. पण नंतर मंडपाचे खांब, त्यांनी झालेले खड्डे, होळीतल्या विटा आणि कचऱ्याचे ढीग हे वाहतुकीला अडथळे करतील अशा तऱ्हेने बरेच दिवस राहतात त्याची तमा कोणालाच नसते. आक्षेप घेणाऱ्यांवर या ना त्या कारणाने सूड उगवला जाण्याची शक्यता असते, तिथेच राहायचे म्हणून रहिवासीही धजत नाहीत.  
नियम धुडकावून लावण्यातच मजा अनुभवण्याची विकृती वाढीस लागल्याने शेवटी न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतात हे क्लेशदायक आहे. सार्वजनिक हितासाठी न्यायालयाचा आसूड लागतो, ही नामुष्की टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.
श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे</strong>

*  ‘अन्वयार्थ’ सदरात ‘पडद्याआडचा आवाज’ या गायिका कृष्णा कल्ले यांना आदरांजली वाहणाऱ्या स्फुटासोबत वापरले गेलेले छायाचित्र हे छायाचित्रकार व सांस्कृतिक कार्यकर्ते संजय पेठे यांनी टिपलेले आहे.   हे छायाचित्र पेठे यांच्या  पूर्वपरवानगीविना वापरले गेले, याबद्दल दिलगीर आहोत.     – संपादक

Story img Loader