‘दुसरी बाजू’ या दिनेश गुणे यांच्या लेखात (रविवार विशेष, १५ मार्च) ‘महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येसाठी दुग्धोत्पादनास योग्य जेमतेम ३७ हजार गाई-म्हशी असतील तर धवलक्रांतीचे भविष्य फारसे उज्ज्वल राहणार नाही’ अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ती यासाठी निराधार आहे, की एक लाख लोकांसाठी दरडोई पाव लिटर दूध रोजचे धरले तरी मागणी पंचवीस हजार लिटर होते आणि प्रति दिन अवघे पाच लिटर दूध देणारी गाय-म्हैस असेल, तर एकूण दुभती जनावरे पाच हजार असली तरी पुरेशी आहेत आणि दैनिक दहा लिटर दूध देणारी जनावरे असतील, तर अडीच हजारच पुरेशी आहेत; पण दूध उत्पादन हा निकषच लावायचा नसेल, तर कितीही जनावरे अपुरीच ठरतील हे मात्र खरे आहे; पण ते शास्त्रीय नाही.
जगभर ‘कमी गायी, अधिक दूध’ हाच धवलक्रांतीचा मंत्र आहे आणि त्यातूनच वेताकाठी दहा हजार लिटर दूध देणाऱ्या गाई जन्मास आल्या आहेत हे सत्य नाकारता येत नाही.
या लेखात गायीच्या दुधाच्या बाटल्यांबाबत जी आकडेवारी दिली आहे त्यावरून ‘गायीच्या दुधाचे एकूण उत्पादन कमी’ आणि ‘गायीचे ढासळते महत्त्व’ असे जे निष्कर्ष काढले आहेत, तेही अचूक नाहीत. कारण बाटलीतील दूध हे फक्त आरेचे असून त्याव्यतिरिक्त गाईचे दूध थलीतून विकणाऱ्या अनेक डेअऱ्या आहेत. त्यांची आकडेवारी घेतली तर खरे चित्र कळेल.
गीर, साहिवालसारख्या देशी गाईंचे वाण अधिक विकसित करण्यासाठी गोकुळग्राम योजना हाती घेणे कसे महत्त्वाचे आहे हे लेखकाने पटवले आहे; परंतु याच अंकात पहिल्या पानावरील ‘गोवंशाला ‘गोकुळग्राम’चा आसरा’ या बातमीत, सदर योजनेत किमान एक हजार भाकड गाईंसाठी एक याप्रमाणे तीन ठिकाणच्या गोशाळांसाठी ९० कोटी रुपये खर्चून पायाभूत सुविधा निर्माण करणार, असे म्हटले आहे. त्यामुळे सदर योजना जातिवंत गाईंच्या विकासासाठी, की भाकड जनावरांसाठी, असा प्रश्न उभा राहतो. गंभीरपणे विचार केल्यास तीन हजार गाईंसाठी नव्वद कोटी म्हणजे प्रत्येक भाकड गाईसाठी (तसे असल्यास) ही रक्कम तीन लाख रुपये होते. याहून महत्त्वाचे म्हणजे मंत्रिमहोदयांनी भाकड जनावरे पाठवण्याचे आवाहन केले असून वाहतूक खर्च देण्याची तयारी दाखवली आहे. त्याप्रमाणे राज्यातील सर्व अतिरिक्त/भाकड जनावरांसाठी अशी तरतूद करणे शक्य आहे काय, याचा विचार आवश्यक आहे.
या (माझ्या) हिशेबात चूक होत असेल, तर अवश्य खुलासा करण्यात यावा, ही विनंती; पण चूक होत नसेल, तर देशातील गोरगरिबांपेक्षा आता गाईगुरांकरिता सरकार उदार झाले असे म्हणावे लागेल.
मुकुंद नवरे, गोरेगाव पूर्व (मुंबई)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा