‘सीतारामाची लक्ष्मणरेषा’ व ‘नवे सुभेदार’ हे अग्रलेख (२१ आणि २४ एप्रिल) तसेच ‘सुधारकांचे न ऐकणारे..’ हे पत्र (२४ एप्रिल) वाचले. एका अग्रलेखात म्हटले आहे की, गेली २८ वष्रे औरंगाबाद महापालिका सेना-भाजपच्याच ताब्यात आहे. पण महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या या शहरातील नागरिकांना किमान बरे रस्ते वा घरी नळाला पाणी या बाबीदेखील या तीन दशकांत सत्ताधीशांना करून दाखवता आलेल्या नाहीत. हीच गोष्ट मुंबईच्या बाबतीतही आहे. गेली २०-२५ वष्रे या शहराची महापालिका सेना-भाजपच्याच ताब्यात आहे. पण याच काळात या शहराची अधोगती होत होत आता ते बकाल झाले आहे. तरीही, माय-बाप जनता याच युतीला पुन: पुन्हा निवडून देते. याचे उत्तर अन्य अग्रलेखात आहे: ‘धर्म नावाच्या अफूच्या गोळीने भाजपने कालच्या मध्यम वर्गातून विकसित झालेल्या आजच्या उच्च आणि निम्न मध्यमवर्गीयांस आकर्षति केले.’
या पाश्र्वभूमीवर, वर उल्लेख केलेल्या पत्रातील ‘प्रेक्षकांची बुद्धीही दहा-बारा वष्रे वयाच्या मुलांइतकी असते, असे समजून चित्रपट किंवा मालिका बनवल्या जातात’ हे वाक्य म्हणजे आजच्या विचारशक्ती गमावून बसलेल्या व चंगळवादी संस्कृतीच्या आहारी गेलेल्या समाजाचे अचूक मूल्यमापन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकांत समाजाचे नेतृत्व मध्यमवर्गातून आलेल्या बुद्धिवाद्यांनी केले होते. पण आज हाच मध्यमवर्ग कमालीचा आत्ममग्न झाला असून आपली ऐतिहासिक जबाबदारीच विसरला आहे. त्यामुळेच चारित्र्यसंपन्न, हुशार व नि:स्पृह कार्यकत्रे-नेते असूनही डावे पक्ष मागे पडले आहेत. अशा वातावरणात भाजप- शिवसेनेसारख्या कायम भडक राजकारण करणाऱ्या पक्षांचे न फावले तरच नवल. भारतातील राजकारण खरोखर निकोप होऊन त्याला वैचारिक अधिष्ठान प्राप्त व्हावे असे वाटत असेल, तर एका बाजूला डावे पक्ष व दुसऱ्या बाजूला पूर्वीच्या स्वतंत्र पक्षासारखा भांडवलदारी विचारसरणीचा पण धर्मनिरपेक्ष पक्ष आणि मध्ये काँग्रेससारखा मध्यममार्गी पक्ष अशी विभागणी असायला हवी. तरच धर्म, भाषा, प्रांत यासारख्या संकुचित व निर्थक मुद्दय़ांपासून या तथाकथित महान देशाची मुक्तता होईल. पण हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा जनतेचे डोळे उघडतील. तोपर्यंत वेळ निघून गेलेली नसावी म्हणजे झाले.
संगीता जानवलेकर, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा