‘दारूबंदी चंद्रपुरात, दुखणे नगरमध्ये!’ हे डॉ. अभय बंग यांचे पत्र वाचले (लोकमानस, २७ एप्रिल) समाजात दु:ख निर्माण करणाऱ्या व्यवसायांना आपला रोजगाराचा हक्क म्हणून तो व्यवसाय अबाधित ठेवण्याचे कायदेशीर संरक्षण मागता येईल का? असा प्रश्न डॉ. बंग यांच्यासारख्या संवेदनशील आदरणीय व्यक्तीला पडावा हे क्लेशदायक आहे. खरं तर सोपे उत्तर असलेले प्रश्न अडचणीचे ठरू लागले, की ते प्रश्नच ढाल म्हणून वापरले जातात.
विशेष म्हणजे नतिकतेशी व समाजहिताशी या प्रश्नांचा निकटचा संबंध आहे. या व्यसनांनी समाजातील अनेक घटकांना हानी पोहोचते हे ठाऊक असूनही महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होऊ देणे का बरे शक्य होते आहे? समाजात दु:ख, त्रास निर्माण करणारे दुसरे उदाहरण ध्वनिप्रदूषणाचा व्यवसाय करणारे डीजे, ढोलताशे, बँड इ.चे देता येईल.
सध्या तरी विधायक शक्ती आवाहित करून एक सशक्त व्यसनमुक्त समाज घडविण्याचे काम डॉ. अभय बंगसारखे समाजधुरीण करत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. जोपर्यंत दारूची घृणा वाटून तिचा उपद्रव कमी व्हावा, अशी मनापासून इच्छाशक्ती असणारे राज्यकत्रे, ती राबवणारी प्रशासकीय यंत्रणा व या सर्वाना पाठबळ देणारे पत्रकार असा संच तयार होत नाही तोपर्यंत आपल्या हातात काहीही उरत नाही. यासाठी समस्त निव्र्यसनी मंडळींनी गप्प बसू नये. दारूमुळे कौटुंबिक, सामाजिक व आरोग्याची हानी होते हे काय सुजाण शासन व प्रशासन यंत्रणेला कळत नाही? बुद्धिभेद करणाऱ्या जाहिरातीसुद्धा बंद व्हायला हव्यात. दारूच्या कारखान्यांना उत्तेजन देणारी शासन यंत्रणा आहे हे जेवढे खरे तेवढेच, ‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करू नका,’ म्हणून साद घालणारे नामवंत सज्जन आपल्या समाजात आहेत हेही खरे! अशा वेळी संत ज्ञानेश्वरांच्या ‘वाजतसे बोंब कोणी न ऐकती कानी’ वचनाची आठवण होते.
दिलीप रा. जोशी, नाशिक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा