‘डॉ. आंबेडकर आणि संघ परिवार’ हा मधु कांबळे यांचा लेख (२६ एप्रिल) वाचला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल संघाला वाटणारा आदरभाव हा काही संघात नव्याने झालेला बदल नाही. संघ स्वयंसेवकांसाठी डॉ. आंबेडकर ‘प्रात:स्मरणीय’ आहेत. मुळात डॉ. आंबेडकरांचे विचार व संघ विचार यांत द्वैत नाहीच आहे. दोन्ही विचारांच्या मुळाशी एकजिनसी निकोप समाज व त्या आधारे सशक्त राष्ट्रनिर्मितीची तळमळच आहे. पू. डॉ. हेडगेवारांनी सर्व भेदांना सामावून घेऊन केवळ एकजीव समरस िहदुत्व-विचाराच्या आधारावर समाज संघटन करण्यासाठी संघाची स्थापना केली. ‘न िहदू पतितो भवेत, िहदव: सहोदरा: सर्वे’ ही घोषणा पूजनीय गोळवलकर गुरुजींनी सर्व िहदू धर्माचार्याच्या मुखातून वदवून घेतली. ‘जर अस्पृश्यता अयोग्य नसेल तर जगात काहीच अयोग्य नाही’ अशा नि:संदिग्ध शब्दांत पू. बाळासाहेब देवरसांनी संघाची जातिभेदविषयक भूमिका स्पष्ट केली. अस्पृश्यताविरोधी अनेक कायदे करून अस्पृश्यता नष्ट करता येणार नाही. कायदे करून समाजाची मानसिकता बदलता येणार नाही, तर एकत्वाची भावना व समरसतेचा संस्कार जोपासूनच हे समाजपरिवर्तन शक्य होईल. हे काम दीर्घ पल्ल्याचे आहे. संघ गेली ९० वष्रे हे काम आपल्या पद्धतीने करत आहे. त्यास हातभार लावण्याऐवजी बुद्धिझम विरुद्ध ब्राह्मिनिझम इ. कपोलकल्पित संघर्ष उभे केल्याने मात्र समाजाचा बुद्धिभेद होत राहील.
-विनय सोमण, अंधेरी (पू)
पूर्वग्रहदूषित संघविरोधकच संघाला बदलू देणार नाहीत
विरोधी मतप्रवाह असलेल्या वैचारिक संघटनांनी बदलावे अशी अपेक्षा असते. मात्र तसे बदल होताना दिसले की त्याचे स्वागत करण्याऐवजी त्याला ढोंग ही उपमा देऊन दुर्लक्ष करायचे, हे अजब तर्कट आहे. संघाच्या बाबतीत तर हा नियम त्रिकालाबाधित सत्य ठरतो. नुकतेच संघाच्या ऑर्गनायझर व पांचजन्य या नियतकालिकानी डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीदिनी गौरव विशेषांक प्रसिद्ध केले. याच विषयावरील परिषदेत डॉ.नरेंद्र जाधव, अर्जुन डांगळे, ज.वि.पवार हे सहभागी झाले. या घटना खरे पाहता सामाजिक परिवर्तनाच्या शुभसंकेत आहेत. परंतु याही वेळेस अशा घटनांवर सकारात्मक प्रतिसाद देण्याऐवजी त्याच्याकडे साशंकित नजरेने पाहिले जात आहे. मधु कांबळे यांचा लेख अशा साशंकित नजरांना बळ देणारा वाटतो.
अनेक वेळा तर असेही वाटते की, संघाला बदलावे असे वाटले तरी पूर्वग्रहदूषित असणारे संघविरोधक संघाला बदलू देणार नाहीत. वास्तविकरीत्या संघाचे कार्य हे जातीअंताचेच आहे. परंतु संघाला नेहमीच वर्णवर्चस्ववादी ठरवले गेले. परंतु रा.स्व.संघान्दो िहदू धर्मातील चारही पीठांच्या शंकराचार्याना एका व्यासपीठावर बोलावून हे जाहीर केले होते की, ‘अस्पृश्यता हा िहदू धर्माला लागलेला कलंक आहे व यापुढे त्याला पातक समजण्यात येईल.’
लेखात लिहिल्याप्रमाणे ‘जातव्यवस्था ही धर्मातील शास्त्रावर असलेल्या श्रद्धेमुळे आहे व म्हणून ही श्रद्धाच नष्ट केली गेली तर जातव्यवस्था नष्ट होईल ’ हे खरे असले तरी, प्राप्त परिस्थितीत समाजातील बहुसंख्य लोक असे आहेत की ज्यांची धर्मश्रद्धा कुठल्याही कारणाने कमी होईल याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत जातीअंताचे कार्य अधिक बिकट होत जाईल. याकरिता धर्मश्रद्धेला नष्ट न करता त्यालाच आधार बनवून जातीअंताचे कार्य अधिक सुलभ होऊ शकते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे िहदू धर्म नाकारणारे होते यात शंकाच नाही. परंतु िहदू धर्म नाकारण्यामागे अस्पृश्यता व जातिव्यवस्था हे घटक कारणीभूत होते. हे दोन घटक वेळीच दूर झाले असते तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे िहदू धर्माबाबत असलेले मत नक्कीच वेगळे असू शकले असते. हाच प्रयत्न आज रा.स्व.संघ करत आहे. संघाच्या शाखेत प्रवेश करताना, संघकार्यकर्त्यांच्या घरी जेवताना कोणालाही जात विचारली जात नाही. राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने स्वत:ची जात, भाषा, वेश इ. विविधता विसरून राष्ट्र म्हणून एकत्र यावे असेच प्रयत्न संघ शाखेमध्ये होतात. यापकी कुठल्याही घटकाचा अडसर राष्ट्रहितासाठी एकत्र येण्यामध्ये असू नये.
संघाचे ध्येय असे नसते तर इतके वर्षे संघ टिकून राहू शकला नसता. हजारो प्रचारकांच्या तप आणि त्यागावर संघाचे कार्य निर्माण झाले आहे. ज्यामध्ये जात व्यवस्थेला कुठेही थारा नाही. अशा प्रकारे जातीअंताचेच कार्य संघाकडून होत आहे. एका अर्थाने जातविरहित समाजाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य संघाकडून होत आहे.
प्रसाद जोशी, मानवत (परभणी)
[ ‘डॉ. आंबेडकर आणि संघ परिवार’ या लेखानंतर किंवा लेखातील मुद्दय़ांसंदर्भात आणखीही पत्रे आली आहेत. त्यांचा प्रसिद्धीसाठी विचार केला जाऊ शकतो.]
काँग्रेस, कम्युनिस्ट, शिवसेना यांत आता संघाची भर!
संघ परिवाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची जयंती साजरी केली आहे, मधू कांबळे यांच्या लेखात (२५ एप्रिल) वाचल्यावर आश्चर्य वाटले. लेखात उल्लेख झाला की काँग्रेस, कम्युनिस्ट हे सारेच पक्ष जयंती साजरी करीत होते. या राजकीय पक्षांनी जयंती साजरी करण्याचा त्यांचा हेतू मात्र वेगळाच असणार यात शंका नाही. आजपर्यंत दलितांच्या मतांचा वापर करून घेण्यात काँग्रेस आघाडीवर होती. त्यामुळे मते खेचण्याशिवाय दुसरा काय हेतू असणार, हे उघड आहे. महाराष्ट्रात नामांतराचा ठराव झालेला असताना औरंगाबादच्या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी ज्या पक्षाने कायमच विरोध केला आहे, असा शिवसेना गेली काही वर्षे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्यासाठी धडपडत आहे. त्यात आता संघ परिवाराची भर पडली आहे.
संघ परिवाराने ज्या मनुस्मृतीचे समर्थन केले त्या मनुस्मृतीचे डॉ. आंबेडकरांनी दहन केले होते. ‘भारत हा सर्वधर्मसमान असणारा देश आहे’ आणि ‘भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे’ असे विचार राज्यघटनेने देशातील नागरिकांना दिलेले आहेत; त्यापुढे भगवद्गीता हा िहदू धर्माचा एक ग्रंथ.. तरीही तो ‘राष्ट्रीय ग्रंथ’ कसा होऊ शकतो? भारताच्या लोकांनी स्वत:साठी तयार केलेला राष्ट्रीय मूल्ये निश्चित करणारा ग्रंथ डावलून एका धर्मग्रंथाला ‘राष्ट्रीय ग्रंथ’ म्हणणे हा घटनेचा अपमान नव्हे का?
‘मंदिरांच्या संख्येपेक्षा ग्रंथालयांवर अधिक भर द्या’ असे विचार मांडणारे डॉ. बाबासाहेब कसे पटत असणार, हा पडणारा प्रश्न आहे. कारण ‘मंदिर वही बनायेंगे’ ही घोषणा संघाने कधीही नाकारलेली नाही.
डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी करणे चांगली सुरुवात आहे हे ठीक; पण रा. स्व. संघाने आंबेडकरांचे विचार स्वीकारले तर ती खरी सकारात्मक गोष्ट होईल.
मारोती संग्राम गायकवाड, उंद्री (जि. नांदेड)
बिल्डरधार्जिणी सरकारे भूकंपाकडेच नेणार
‘तिसऱ्या जगाचे शाप’ हा अग्रलेख वाचकांना जागृत करणारा आहे. सामान्य नागरिकही या अशा घटनांना कसा जबाबदार असतो हे भीडभाड न ठेवता त्यात मांडले आहे. मुंबई ही भारतातील भूकंपप्रवण क्षेत्रात येते, असे भूकंपतज्ज्ञ गेली अनेक वष्रे सांगत आहेत. १९६८ च्या डिसेंबरात असा पहिला इशारा दिला गेला होता. मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार ते थेट पालघर, डहाणू हा पाणथळ व खाजणाचा भाग. या ठिकाणी सध्या चाळीस-पन्नास मजल्यांच्या इमारती उभ्या राहत आहेत. सह्याद्रीच्या कुशीत शहरे निसर्गाचे नियम धाब्यावर बसवून उभारली जात आहेत आणि आपले सरकार हे सारे पाहत आहे. १९९३ साली लातूरमध्ये झालेला भूकंप विसरू नका, त्या ठिकाणी जे उद्ध्वस्त झाले त्यांच्या कुटुंबांची घडी आजही धड बसलेली नाही. सरकारे यात लक्ष घालतील असे मला वाटत नाही, कारण त्यांच्यावर बिल्डर लॉबीचा प्रभाव आहे.
मार्कुस डाबरे, पापडी (वसई)
किती उदार?
शिवसेनेचे सर्व खासदार एक महिन्याचे वेतन ‘पंतप्रधान साहाय्यता निधी’ला देणार आहेत. आता त्यांनी ही एकूण रक्कम किती होते, तसेच खासदारांच्या मदतीची घोषणा ‘ट्वीट’ करणारे आदित्य ठाकरे यांनी स्वत: किती रकमेची मदत केली ते प्रसिद्ध करावे, म्हणजे शिवसेना किती उदार झाली ते समजेल.
– विजय पां. भट, विलेपाल्रे पूर्व (मुंबई)