भूसंपादन कायद्याबद्दल लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी हमीदराचाही उल्लेख केला. हमीदर ठरवणारी देशात स्वतंत्र/ स्वायत्त यंत्रणा आहे, त्याला कृषी मूल्य आयोग असे म्हणतात. हमीदर ठरविताना हा आयोग देशातील सर्व राज्यांचे विविध पिकांच्या हमीदराचे प्रस्ताव, त्या पिकाचे देशातील व जागतिक बाजारपेठेतील भाव इत्यादी बाबी विचारात घेत असतो. त्यानंतर ही यंत्रणा हमीदरांची शिफारस केंद्र शासनाकडे करते आणि शिफारस केलेले दर केंद्र शासन जाहीर करते. एवढाच काय तो केंद्र शासनाचा हमीदर जाहीर करण्याचा संबंध.
मात्र राहुल गांधी यांनी कापूस इत्यादी पिकांच्या हमीदरात वाढ केली नाही, असा आरोप केला आहे. त्यांनी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या २०१४-१५ सालच्या खरीप पिकांच्या न्यूनतम आधारभूत किमतीची शिफारस करून केंद्राकडे (फेब्रुवारी २०१४ मध्ये) पाठविलेला अहवाल वाचल्यास त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
परंतु राहुल गांधी पुढील प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील का? : (१) केंद्र शासनाने २०१४-१५ सालचे हमीदर जाहीर करून वर्ष झाले. या काळात काँग्रेसने संसदेत काय भूमिका घेतली? (२) स्वामिनाथन कमिटीने सुचविलेले हमीदर निश्चितीचे समीकरण केंद्र सरकारने नाकारले, याचा उल्लेख राहुल गांधी यांनी केला. भारतीय किसान संघाच्या याचिकेवर केंद्रीय कृषी मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालात शपथपत्र दाखल केले आहे. या शपथपत्रात ‘उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून हमीदर देणे शक्य नाही’, असे म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनामा आणि आदरणीय नरेंद्र मोदींच्या विविध जाहीर सभेत स्वामिनाथन कमिटीच्या अहवालाचा उल्लेख झाला आहे. याबाबत सरकारच्या भूमिकेविषयी राहुल गांधी यांनी अथवा त्यांच्या पक्षाने जाब का विचारला नाही?
कृषी मूल्य आयोग हमीदराशिवाय शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारला अनेक शिफारशी करीत असतो. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने त्याची अंमलबजावणी कधीच केली नाही.
तोच कित्ता भारतीय जनता पक्ष गिरवीत आहे.
मिलिंद दामले, यवतमाळ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा