‘मोदींनी आत्ममग्नतेतून वेळीच बाहेर यावे’ हे पत्र (लोकमानस, २० एप्रिल) वाचले. मोदींवर नेहमीच आत्ममग्न असल्याचा आरोप केला जातो, मात्र तो चुकीचा आहे असे मला वाटते. कोणताही नेता हा आम्ही इतरांहून वेगळे कसे हे सांगण्याचा आणि करून दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो, यात काही गर आहे असे मला वाटत नाही.
मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून निर्णयच घेतले नाही हा आरोप हास्यास्पद आणि न पटण्याजोगा आहे. जर निर्णयच घेतले नसते तर इतका विरोध झाला असता का? आणि ९-१० महिन्यांत अपेक्षा ठेवणे हे कोणाला तरी पटण्यासारखे आहे का? घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हायला व फरक दिसायला काही कालावधी लागेल. लगेचच अपेक्षा करणे चुकीचे आहे. प्रशासकीय पातळीवर कारभारात सुलभता आणण्यासाठी खूप मोठी पावले त्यांनी उचलली आहेत.
मोदींवर परदेशवाऱ्यांवरून टीका होत असते. आतापर्यंत त्यांनी ज्या ज्या देशात दौरे केले त्याचे करार, फलित सर्वाना वाचण्यासाठी खुले आहेत. जर आपल्याला काही निर्णय घ्यायचे असतील तर आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा अनुकूल असे वातावरण तयार करावे लागते. जरी आपण सार्वभौम राष्ट्र असलो तरी आपल्याला काही गोष्टींसाठी परदेशांवर अवलंबून राहावे लागते ही गोष्ट नाकारता येणार नाही. जागतिकीकरणामुळे या गोष्टींना महत्त्व आले आहे. आधुनिक काळात सरकारची भूमिका कमी होत चालली आहे, सरकार उत्पादनात लक्ष घालू शकत नाही. त्यामुळे परदेशी गुंतवणूक महत्त्वाची ठरते. सध्या सरकारच्या तिजोरीची अवस्था पाहता आपल्याला काही गोष्टींसाठी परदेशी भांडवलावर अवलंबून राहावेच लागणार आहे. आणि अलीकडील जागतिकीकरणाच्या काळात प्रत्येक राष्ट्राला इतर राष्ट्रांवर अवलंबून राहावेच लागत आहे. त्यामुळे थोडी वाट पाहावी, असे मला वाटते.
गणेश उ. शेळके, िपपरी-चिंचवड (पुणे)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा