दलित राजकारण व चळवळीची दशा / दिशा यांबद्दल मधू कांबळे यांचे  विश्लेषण ( रविवार विशेष : १२ एप्रिल)  अगदी योग्य आणि मार्मिक आहे. पण बाबतीत माझे  मत काहीसे वेगळे आहे. ते मांडावेसे वाटले, म्हणून हे पत्र.  
१) आंबेडकरी विचार, चळवळ आणि राजकारण ह्यांचे विश्लेषण आपण समान पातळीवर केले आहे. विचार हे शाश्वत असतात, चळवळ त्या विचारांना मूर्त रूप देते आणि राजकारण कदाचित तत्कालीन प्रश्नांवर काढलेले उत्तर असू शकते. त्यामुळे ह्यांची गल्लत केल्यास विचारांचे नुकसान तर होतेच, शिवाय चळवळीचे राजकीयीकरण होते आणि राजकारणही ताणले जाते.
२) एकंदरच भारतीय विचारसरणीवर आणि चळवळींवर राजकारणाचा प्रचंड प्रभाव जाणवतो. प्रत्येक विश्लेषण राजकारणापासून चालू होते व राजकारणावर संपते. त्यामुळे विश्लेषण केवळ वर्तमान काळातच अडकून राहते. दलित विचार, चळवळ आणि राजकारणा बाबतही नेमके हेच झालेले दिसून येते. माफ करा, पण आपल्या लेखातही  हा गोंधळ दिसून आला. त्यामुळेच कदाचित भूमिहीनांचे आंदोलन असो, पँथरचे आक्रमक आंदोलन असो, नामांतराचे वा आजचे इंदू मिलचे आंदोलन असो, राजकारणाची तत्कालीक गरज भागवण्यासाठी अस्मितेचे, मुद्यांचे रूपांतर ‘वैचारिक लढय़ात’ होते. त्यातून तत्कालिक गरज कदाचित भागत असेल, पण विचारांचे कायमचे नुकसान होते.
३) लेखात नेमके हेच म्हटले आहे, की राजकारणापायी विचारांचे / चळवळीचे नुकसान होत आहे. पण जेव्हा उत्तर शोधण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा पुन्हा हाच गोंधळ उफाळून येतो. उत्तरही राजकारणाच्या मार्गातून चळवळ आणि त्या माध्यमातून वैचारिक विजय असे शोधले जाते.
४) लेखात ‘वेगळी ओळख’ यावर खूप भर दिला आहे. वेगळेपणा टिकवण्याची गरज कदाचित असेल पण त्याचा अट्टाहास किती धरावा? भूमिहीनांच्या समस्या, दलित-शोषितांचा विकास, त्याबाबतच्या योजना, त्यात होणारा भ्रष्टाचार हे केवळ दलित चळवळीचे किंवा दलित पक्षांचे प्रश्न का असावेत? त्यावर केवळ दलित चळवळीनेच आवाज का उठवावा? किंवा त्यांनी आवाज उठवला की नाही हा त्या चळवळींचा मापदंड का असावा? आंबेडकरांनी समतेचा आग्रह धरला होता, दलित चळवळ पण याच ‘समतेचा’ लढा लढत आहे. समतेचा लढा लढताना वेगळ्या विचारांचा आग्रह धरेपर्यंत ठीक आहे, पण त्याचा दुराग्रह झाल्यास तो समतेला घातक ठरू शकतो, असे काही का वाटत? अशा ‘वेगळेपणाच्या’ भावनेतूनच कदाचित तथाकथित उच्च-वर्णीयांनी विषमतेची बीजे रोवली असावीत.
५)  आरक्षण किंवा एकंदरच ‘सकारात्मक कृतींचा’ आग्रह हा  सर्वाचाच असावा. दलित/ शोषितांचा विकास  ही सगळ्यांचीच जवाबदारी आहे. केवळ दलित नेतृत्वाची नाही.
अर्थात, ही आदर्श  परिस्थिती आहे. आजही कळत-नकळतपणे जातीव्यवस्था व उच्च-नीचपणा (अनेकदा खाजगीत) घरा-घरात व्यक्त होतो. माझेही घर, आई-वडील, नातेवाईक, (जातीतील) मित्र आणि कदाचित मीही यात असेन. पण ‘विशेष ओळख’ (Exclusive Identity) असण्याचा आग्रह एकंदरच राष्ट्र-समाजाला धोकादायक ठरू शकतो. भारताचा इतिहास हे उत्तम उदाहरण आहे. तथाकथित उच्च-वर्णीयांनी रुजवलेली विषमता, समाजातील हेवे-दावे यांमुळे आपले एक राष्ट्र म्हणून, एक समाज म्हणून अपरिमित नुकसान झाले आहे. त्यामुळे मला असे वाटते की, ‘वेगळी ओळख’ ठेवण्याचा हा अट्टाहास दलित विचार, चळवळ आणि राजकारणाला घातक ठरेल.
अभिषेक चौधरी, नवी दिल्ली

मराठी साहित्यात  सारंगांबद्दल अढीच
‘भारतीय नवतेचा नावाडी’ हे विलास सारंग यांच्या साहित्याचा यथोचित आढावा घेणारे विशेष संपादकीय (१६ एप्रिल) वाचले आणि पटले.  आधीच एवढुश्या असलेल्या मराठीच्या ‘साहित्य-तळ्या’मध्ये ‘साहित्य-आवर्षणा’मुळे अनेक डबकी आणि हातझरे पडलेले आहेत.  त्यातील तीर्थाला वास सुटलाय, पण सारेच ‘अध्यात्मिक अवस्थेत’ पोहोचलेले असल्याने हे कुणाला कळत नाही. त्यामुळे, सारंगांची थोरवी कळण्याइतपत साहित्य भान आहे कुणाकडे किंवा आपल्याला बुवा नाही त्यातलं कळत अशी कबुली देण्याचा मोठेपणा आहे कोणाकडे?
दिवंगत कुरुंदकर ते हयात असलेले सुधीर रसाळ असे काही अपवाद सोडले तर , मराठीत समीक्षक होते किंवा आहेतच कोण? पुस्तक परिचय आणि परीक्षण यांना समीक्षा समजणारे आपले माध्यमातील  बंधू आणि वाचक तर आणखीनच  थोर! सारंग इंग्रजीत लिहित असल्याने मराठी साहित्यिकात त्यांच्याबद्दल अढी असावी. ते कुठल्या कंपूत शिरून कुचाळक्या करीत राहिले असते तर त्यांच्या निधनाची बातमी आतल्या पानावर एक दोन कॉलमात आटोपली नसती .
राहिली त्यांच्या साहित्याची बाब. त्यांच्या साहित्याची उंची मोजणारा कुणी मराठीत आहे काय? आधी साहित्य आकळले तर त्यावर लिहिता येईल ना !  हिंदू कशी वाईट आहे ,हे सिद्ध करण्यासाठी तीन-तीन दिवसांची चर्चासत्रे झाली, पण तीवर कुणी समीक्षा नाही लिहिली . तेवढेही भाग्य सारंगांच्या वाटय़ाला येऊ नये ?
शाहू पाटोळे, औरंगाबाद</strong>

कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Maharashtra News : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करत आक्रोश मोर्चा, मनोज जरांगेही सहभागी

निष्क्रियता निर्माण करण्यासाठीच संतवाणी सांगितली जाते..
संतांनी गेल्या दोनपाचशे वर्षांत दिलेले उपदेश त्या त्या काळातील परिस्थितीत जनतेला मनाची शांती राखून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरले असतीलही, परंतु, त्या सर्वाचेच विचार म्हणजे फार मोठे गहन  तत्त्वज्ञान होते असा आजही दृढ समज असलेल्या आमच्या झापडबंद जनतेला हे कळत नाही की एका छोटय़ाशा भूभागापलीकडे त्यांची पुसटशी ओळखही नव्हती. अवघ्या पृथ्वीतलावरचा तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस बहुतेकांना ठाऊकच नाही. तथाकथित बुद्धिवंतांनी आखलेल्या आपल्या शिक्षण व्यवस्थेने शालेय शिक्षणापासून आणि पालकांनी- थोरामोठय़ांनी अगदी आमच्या जन्मापासून संतांच्या शिकवणीबद्दल अध्यात्मयुक्त  आदरभाव आणि त्यावर स्वत काही वेगळा विचार केलाच तर पापभावनायुक्त भीती याचा भडीमार केल्यामुळे आजही तमाम जनतेला त्या बुद्धीभेदाने घट्ट मिठी मारली आहे.
सुविचारांना अध्यात्म चिकटल्यामुळे व पापक्षालनाची सोय अध्यात्माने आधीच करून ठेवल्यामुळे ‘मुखी राम कृती वाम’ बोकाळलेली दिसून येते. संतांच्या उक्तीचे अनुकरण करणाऱ्यांच्या धार्मिक भावना, अंध श्रद्धा, अवैज्ञानिक घटकांनी ओतप्रोत भरलेली  जीवनशैली यात कुठेही स्वीकारात्मक बदल झालेला नाही. किंबहुना एक ‘माणूस’ म्हणून जे जे काही आपल्याला सामान्यज्ञानाने ठाऊक आहे तेच संतांची वाणी म्हणून सांगत फिरण्याची काहीही आवश्यकता नाही.  संतांची वाणी सांगून आजवर संपूर्ण देशात प्रचंड मोठी निष्क्रियता निर्माण केल्यामुळेच आपण मानव विकास निर्देशांकात, व्यवसाय सुलभता निर्देशांकात, आर्थिक विकास निर्देशांकात जगाच्या कितीतरी मागे राहिलो आहोत. आता तरी संतांना निरोप द्यायला हवा, तरच संत महिम्याचा घट्ट पगडा असलेल्या आत्ताच्या पिढीनंतर उदयास येणारी नवीन पिढी आपल्या देशाला विकसित देशांच्या रांगेत बसवण्यासाठी प्रगतीच्या वाटेवर नेऊ शकेल.  
प्रफुल्ल चिकेरूर, नाशिक

सर्वच श्रद्धा कुचकामी असू शकत नाहीत
‘संतांना निरोप’(शरद बेडेकरांचे ‘मानव विजय’- १३ एप्रिल) या लेखातील बहुतेक सर्व मुद्दे मान्य आहेत. तरी त्यातील स्वर किंचित चढा लागला आहे असे  वाटते. त्यामुळे लोकांची प्रतिक्रिया विरोधाचीच होईल की काय, अशी भीती वाटते.
संतांना निरोप द्यायचा, तर संत म्हणजे कोण? हा प्रश्न येतो. सहसा संतांना ईश्वर  आणि सर्वसामान्य माणूस यामधील दुवा समजले जाते. मग संतांना नाकारणे म्हणजे ईश्वराला नाकारणे आहे का? (बहुधा होय.) संत आणि त्यांचे चमत्कार सर्व धर्मामध्ये दिसून येतात. म्हणजे संतांच्या असण्याची एक गरज सर्व लोकात निदान आजपर्यंत तरी आहे का? असली तर का? याच विचार व्हायला हवा. आणि संतांना निरोप देताना त्यांची जागा भरून काढण्यासाठी मानसोपचार तज्ञ  आणावे लागतील का? कारण सर्वाची बौद्धिक क्षमता सारखी असत नाही. याचाही विचार व्हायला हवा.
लेखाच्या मधे कम्प्युटरवर काम करणाऱ्या मुलांचा फोटो आहे. यातून आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरावी असा संदेश जातो. तो बरोबच आहे. पण येतून माणसाचे जीवन यंत्रवत  होत आहे, हीदेखील वस्तुस्थितीच आहे.
केवळ विज्ञान-तंत्रज्ञान ‘माणसाला’ सुखाने जगण्यास पुरेसे असते का? अगदी ‘सर्वसुखी’ असलेल्या माणसालादेखील काहीतरी कमतरता, कसलीतरी भीती वाटत असते. विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी विज्ञानाला मर्यादा आहेत. तसेव समता, बंधुता, एकता अशा गोष्टी विज्ञानाच्या कक्षेत येत नाहीत. अगदी प्रगत विज्ञानाच्या मदतीनेदेखील, माणसाने माणसाला मदत करण्याची मर्यादा संपते, तेव्हा तो दबाव सर्वचजण सहन करू शकतात, असे नाही.  
त्यामुळे लोकांना ‘साध्या सोप्या देवाची गरज’ आजही वाटतेच. लोकांच्या कशावरतरी श्रद्धा ठेवण्याच्या गरजेचा विचार, सन्मान केला पाहिजे. या दृष्टीने लेखातील ‘श्रद्धेमुळे स्वतंत्र विचार करण्याच्या क्षमतेचे खच्चीकरण होते.’ या वाक्यावर आक्षेप घेता येईल. कारण श्रद्धा काही फक्त देवावर किंवा संतवचनांवर असते असे नव्हे. तसेच सर्व श्रद्धा कुचकामी नसतात. एखाद्या कलेवर, खेळावर, संशोधनावर श्रद्धा ठेवून माणसे चांगली कामे करू शकतात. अनेकांनी केलेली आहेत.
लेखात लोकसंख्येचा उल्लेख आहे. या विस्फोटाचे एक कारण म्हणजे विशेषत: ‘मुलग्याने’ मरताना पाणी पाजणे व नंतर श्राद्ध करून पितरांना नरकात जाण्यापासून सोडवणे, मोक्षापर्यंत नेणे अशा कल्पना पूर्ण त्याज्यच आहेत. परंतु माया व मोक्ष या मूळ कल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न केला, तर  ‘जाणीव’  असलेल्या माणसाचे अस्तित्व, विश्वाचे अस्तित्व, त्यांच्यामधील नाते याचा हा विचार होता. हा विचार पूर्वीच्या लोकांनी त्यांच्या परीने केलेला होता, असे दिसून येते.
संत आणि संतसाहित्य हा आपल्या इतिहासाचा  भाग आहे. तो आपण पुसून टाकू शकत नाही. विज्ञानाच्या इतिहासात ज्याप्रमाणे कधीकाळी ‘पृथ्वी केंद्रस्थानी  आहे व जग पृथ्वीभोवती फिरते’ अशी समजूत होती, हा इतिहास म्हणून स्वीकारला जातो व त्यात झालेला बदलही स्वीकारला जातो. त्याप्रमाणे पूर्वीच्या संतांचे असे असे  सांगणे होते, त्यातील इतका भाग कालबाह्य  आहे व इतका भाग आपण आहे तसा किंवा काही बदल करून स्वीकारू शकतो, असे मध्यममार्गी धोरण स्वीकारावे असे वाटते.
अशा लेखांचा उद्देश जर लोकांचे पतपरिवर्तन करावे, असा असेल तर, असे वाटते की, अभिनिवेशपूर्ण मांडणीमुळे आपली मते मांडल्याचे समाधान तेवढे मिळेल. हेतूला बाधा मात्र येईल.
सुनेत्रा मराठे, पुणे</strong>

मुंबईत घरे.. काय खरे?
‘सामान्यांसाठी चार वर्षांत मुंबईत ५७ हजार घरे!’  हे वृत्त (लोकसत्ता, १६ एप्रिल) आल्हाददायक असले तरी सामान्य माणसाच्या मनात किंतु उभे करणारे आहे. गेल्या दीड-दोन दशकांत म्हाडाने घरांच्या किमती इतक्या वाढविल्या आहेत की ‘लॉटरीतले’ घर म्हणजे स्वस्त मिळणार ही पूर्वापार समजूत बाद करायला भाग पडले आहे. मुंबईत सर्व काही घेऊ शकलो तरी घर घेणे आता कठीण झाल्याने सरकारी घरांसाठी जितक्या प्रमाणात अर्ज येतात ते पाहून निव्वळ ५७ हजार घरांनी तेही चार वर्षांत किती जणांची गरज भागणार? त्यात पुन्हा गृहनिर्मितीसाठी नवी कंपनी स्थापणार म्हणजे पुन्हा एक नवीन अडचणी उभ्या करणारी व्यवस्था तर ती ठरणार नाही ना?
 सामान्य माणसांना घरे पुरविण्याची खरोखरच तीव्र इच्छाशक्ती असेल तर शहरातील बिल्डर्सना स्वस्त घरे बांधणे अनिवार्य करण्याची गरज आहे. कारण गेल्या दोन दशकांत बिल्डरांनी मुंबईत फक्त टू बीएचके वा त्यापेक्षा मोठे, अतिमहाग फ्लॅट बांधणेच सुरू ठेवले आहे. म्हणूनच सरकारी घरांसोबतच बिल्डर्सनीसुद्धा परवडणारी घरे बांधली तर सामान्य माणसांची घराची गरज निभेल.
माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

चमत्कार हवेच कशासाठी?
‘संतांना निरोप’ या लेखात शरद बेडेकर यांनी संतांच्या कार्याचा आढावा संतुलित शब्दांत घेतला आहे. त्यांच्या कार्याच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. लेखातील चमत्कारांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. निसर्गनियमाचे उल्लंघन म्हणजे चमत्कार. ते उल्लंघन कोणीही करू शकत नाही. म्हणून कोणताही चमत्कार कधी घडलेला नाही. ज्ञानेश्वरांनी िभत चालविली नाही असे म्हटले तरी त्यांच्या थोरपणाला बाधा येत नाही.
माणसाला चमत्काराचे आकर्षण असते. म्हणून चमत्कार कथा लिहितात. त्या केवळ मनोरंजनार्थ असतात. खऱ्या मानायच्या नसतात. फँटम, स्पायडरमॅन, सुपरमॅन यांचे चमत्कार दाखवतात. कारण ही काल्पनिक पात्रे आहेत. कोणाही साधु-संतानी, स्वामी-महाराजांनी, कधीही कसला चमत्कार केलेला नाही. हे सत्य आहे. आपण सत्य स्वीकारले पाहिजे असे बेडेकर म्हणतात ते सर्वाना पटावे. चमत्कार खरे मानण्याचा बालिशपणा सोडून द्यावा. ‘मी चमत्कार करतो.’ असे जो सांगतो तो भोंदू असतो. आणि ते खरे मानणारा निर्बुद्ध असतो.
प्रा. य. ना. वालावलकर, मुलुंड (मुंबई)

निरोप द्यायचाच, तर बुद्धिभेद करणाऱ्या सर्वाना द्यावा
‘संतांना निरोप’ हा  शरद बेडेकर यांचा लेख (१३ एप्रिल) वाचला.  ‘ईश्वर अवतार घेईल व सर्व गोष्टी करेल अशी आमची धारणा आहे’ पण ‘ते चुकीचे आहे’ हे बेडेकरांना मान्य आहे. मग संतांच्या बाबतीत ते ही अपेक्षा का ठेवतात? संतांना जे काही चांगले करायचे होते ते त्यांनी केले यावर ते का थांबत नाहीत? त्यांनी न केलेल्या गोष्टींचे खापर फक्त संतांवर फोडणे कुठल्या विवेकवादात बसते? समाजाचे नेतृत्व फक्त संतच करतात असे नाही. त्यात बुध्दिवादी, सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाचाही सहभाग असतो, असायला हवा. संतांनी चांगल्या विचाराची आणि आचाराची माणसे निर्माण करण्यावर भर दिला मग त्यांना दिशा दाखवण्याचे काम या बाकीच्या लोकांनी का केले नाही याची मीमांसा हा लेख करीत नाही.
वस्तुस्थिती अशी आहे की समाजातील हे बाकीचे नेतृत्व त्याही काळी सुशेगात आणि संवेदनाहीन होते आणि आता तर विचारायलाच नको. मूठभर उद्योगपतींचा विकास करण्यासाठी आजचे राजकीय नेतृत्व शेतकऱ्यांचा आणि निसर्गाचा बळी द्यायला निघाले आहे आणि बुध्दिवादी नेहमीप्रमाणे मुग गिळून बसले आहेत.
दुसरा मुद्दा संतांच्या विचारांच्या कालबाह्यतेचा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, आधी प्रपंच करावा नेटका यांसारख्या विचारांमध्ये कामधंदा सोडून देव देव करा असे कुठे म्हटले आहे? आणि हे विचार कालबाह्य कसे? श्री. गोंदवलेकर महाराजांनी सांगितले आहे की जंगलात जर देव भेटला असता तर जंगलातील प्राण्यांना तो आधी भेटला असता. समर्थ रामदासांच्या दासबोधात अध्यात्म कमी आणि व्यवहारविषयक उपदेश जास्त आहे. सर्व काही भव्य दिव्य करा (िथक बिग) असा संदेश त्यात आहे. किंबहुना सर्वच संतांनी कर्मयोगाचे महत्व वारंवार सांगितले आहे. कुठल्याही चांगल्या गोष्टीचे विकृतीकरण करण्यात आम्हा भारतीयांचा हात कुणी धरणार नाही. म्हणूनच निष्काम कर्मयोगाचा सोयिस्कर अर्थ काम न करण्याचा योग असा आम्ही लावतो.
जसे आम्ही सर्व गोष्टींचे विकृतीकरण केले तसेच संत या संकल्पनेचेही केले. म्हणुनच आज तथाकथित संत, बाबा, बापू लोकांना फसवून अमाप पसा गोळा करत आहेत. गरज आहे ती अशा तथाकथित संतांना निरोप देण्याची. याबाबत विवेकवादाचे म्हणणे काय?
कालिदास वांजपे, ठाणे</strong>

‘मानव-निर्मित’ समस्यांच्या मुळाशी न जाता निष्कर्ष
‘मानव-विजय’ हे शरद बेडेकर यांचं दर सोमवारचं सदर, त्यातील सर्वच निष्कर्ष पटले नाहीत तरी, नि:संशय वाचनीय असतं. मात्र ‘संतांना निरोप’ (१३ एप्रिल) वाचून काही प्रश्न निर्माण झाले.     
सुरुवातीला संतांचे सामाजिक कार्य सविस्तरपणे सांगताना, ‘भक्तिमार्गी संतांनी दैनंदिन जीवनातील निर्मळ आचरणाला व शुद्ध भावनेला महत्त्व दिलं, धार्मिकतेच्या दंभाचा धिक्कार केला’, वगरे मुद्दे मांडून पुढे ‘सर्व संत आपापल्या काळांत अंधश्रद्धा निर्मूलनाचे समाजोद्धाराचे महान कार्य करीत होते,’ असं लेखक म्हणतात. मात्र नंतर ‘आजच्या संदर्भात संत विचारांतील उणिवा’ दाखवताना, ‘संतांनी प्रत्यक्ष व्यवहारात समता आणण्याचा प्रयत्न केला नाही, लोकांवर कोसळणाऱ्या परचक्रांविषयी ते काहीच बोलत नव्हते, स्त्री-शिक्षणाकडे लक्ष दिले नाही, आत्मोन्नतीची शिकवण म्हणून ‘ईश्वरभक्तीच’ सांगितली.. ‘असं सांगून ते पुढे म्हणतात, आम्हा विवेकवाद्यांचा मुख्य मुद्दा, ‘संतांनी भारतीयांना ‘श्रद्धावादी’ बनवलं.  अन् श्रद्धेमुळे स्वतंत्र विचार करण्याच्या शक्तीचं खच्चीकरण होतं!’      
  ‘विवेकवादी व विज्ञानवादी’ असणारे ‘ईश्वरभक्ती अन् श्रद्धा’ या गोष्टींचा नेहमीच धसका घेतात, त्यात नवीन काहीच नाही. त्यातील ‘बाजारूपणा अन् गरश्रद्धेवर’ घाव घालताना ते ‘ईश्वर आणि श्रद्धा’ समूळ उखडून काढण्यात धन्यता मानतात. संपूर्ण ‘ईश्वरनिष्ठ व सश्रद्ध’ असणारेदेखील ‘विवेकवादी व विज्ञानवादी’ असू शकतात, याचं  ‘निव्वळ विज्ञान-विवेकवाद्यांना’ भान राहत नाही. गेल्या शतकात विज्ञानाने जेवढी अफाट प्रगती केली त्याहून अधिक भयंकर विध्वंस अन् कोटय़वधींची अमानुष मनुष्यहत्या झाली. नाण्याची ही दुसरी बाजू सोयीस्करपणे विसरली जाते. पण म्हणून ‘विज्ञानाला निरोप द्या, वा रिटायर करा’, असे कुणी म्हटले तर ते पोरकटपणाचे ठरेल. संतांनी त्यांच्या काळात जे केले ते ‘काळानुरूप’च होते. त्याला आजच्या काळाच्या फूटपट्टय़ा लावून काय साध्य होणार?
‘आपल्या आजच्या समस्यांची उत्तरे आपल्याला आपल्या मायबाप संतांच्या विचारांत मिळणे शक्य नाही..’  हा निष्कर्ष या ‘मानव-निर्मित’ समस्यांच्या मुळाशी न जाता काढला आहे असे वाटते. त्यासाठी ‘विज्ञानाची अध्यात्माशी सांगड’ घालण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा ‘वैज्ञानिक मानव-विजय’ हा पराजयदेखील असू शकेल!
– प्रभाकर बोकील, चेंबूर (मुंबई) मंदार रामदास वैद्य (डोंबिवली),
साहेबराव ठाणगे (नवी मुंबई)  आदी वाचकांनीही या आशयाची पत्रे पाठविली होती.

अतुल पेठेंचा सन्मान त्यांच्या व्यापक योगदानासाठी
‘अहो रूपं अहो ध्वनी’ या पत्रात (लोकमानस १३ एप्रिल) हे लक्षात घेतलेले नाही की अतुल पेठेंचा सन्मान केला गेला तो काही फक्त पुणे मनपा युनियनसोबत त्यांनी केलेला ‘कचराकोंडी’ हा माहितीपट व ‘सत्यशोधक’ यांसाठी नाही.
गेली अनेक वष्रे अतुल पेठे सामाजिक जाणिवेतून समाज-परिवर्तनासंबंधी कलेच्या माध्यमातून पथदर्शी योगदान देत आले आहेत. ‘सेझ’वरील तसेच के. आर. दाते यांच्यावरील माहितीपट, माहिती अधिकाराबाबतचे ‘दलपतसिंग येती गावा’ हे जांब- समर्थ  या जालन्यातील एका कोपऱ्यातील गावातील तरुणांच्या नाटय़-गटासोबत केलेले अभिनव नाटय़, डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांमार्फत महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडवलेली अंधश्रद्धेबाबतची शेकडो िरगण-नाटय़े अशा अनेक मार्गानी पेठेंनी कलेच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत योगदान केले आहे.
कार्यकत्रे म्हणवणाऱ्यांना लाजवेल अशी तळमळ, उत्साह, जिद्द, मेहनत याबद्दल संबंधितांमध्ये पेठे प्रसिद्ध आहेत. तसेच प्रत्येक बाबतीत दर्जाबद्दल ते किती आग्रही असतात हेही पाहण्याजोगे असते. त्यामुळेच काही व्यावसायिक कलाकारांबरोबरच अशिक्षित, अर्धशिक्षित कलाकारांचा सहभाग असलेल्या ‘सत्यशोधक’ला १६ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये प्रवेश मिळाला. अशा सर्व आगळ्या योगदानाचा उचित सन्मान केल्याबद्दल खरे तर पुणे मनपा युनियनला धन्यवाद द्यायला हवेत.  
– डॉ. अनंत फडके, पुणे

Story img Loader