सोसेल तेवढेच सोशल नेटवर्किंग करा..
नेटवर्क चॅटमध्ये कर्मचारी फारच वेळ घालवतात असे दिसून आल्याने जगभरातील बहुतेक कार्यालयांमध्ये, कंपन्यांमध्ये व्यक्तिगत रूपाने नेट वापरण्यास (पर्सनल चॅट) बंदी घालण्यात आली आहे. अशा वेळी हे महाभाग ऑफिसची वेळ संपल्यानंतर घरी येऊन मुलाबाळांशी किंवा पती-पत्नीशी प्रत्यक्ष गप्पा मारण्याऐवजी पुन्हा लॅपटॉप उघडून बसतात आणि कोणत्याही आभासी मित्रवर्तुळात मग्न होतात. त्यामुळे घराघरांतून किती टायपिंग कराल आणि किती वेळ त्या संगणकाशी खेळाल? असा सूर उमटू लागला आहे.
एका जागतिक सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, एकूण ट्विटस्पैकी काही टक्के ट्विटस्ना तसा काहीही अर्थ नसतो. मग काहीतरी वरचेवर आणि बाष्कळ लिहिण्यासाठी मेंदू झिजवणे कितपत योग्य आहे? आभासी दुनियेत अती रमण्याने जवळच्या व्यक्तींशी संबंध दुरावतात हे तर गेल्या काही वर्षांत समाजशास्त्रज्ञही स्पष्टपणे सांगू लागले आहेत.
सोशल नेटवर्किंगचे व्यसन असेच वाढत राहिले तर काही वर्षांनी आपण प्रत्यक्ष गप्पा मारणे विसरून जाऊ की काय असे वाटू लागले आहे. सगळे नेटवरच सांगून झालेले असल्याने समोर आल्यावर बोलण्याजोगे काही शिल्लकच राहत नाही, अशी परिस्थिती जाणवू लागली आहे. तसेच बऱ्याचदा पर्सनल माहितीचा गैरवापर केला गेल्याच्या घटनाही पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या फंदात पडण्यापेक्षा आपल्या आवडत्या व्यक्तीला सरळ फोन करून त्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारा व सोसेल तेवढेच सोशल नेटवर्किंग करा.
-दादासाहेब उल्हास येंधे, काळाचौकी, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा