नामदेव महाराजांच्या सात शतकांपूर्वीच्या कार्याचा यथोचित गौरव झाला याबद्दल मराठी माणसाला विशेष आनंद होणे साहजिक आहे; पण त्याच वेळी साहित्य आणि शेतकरी तसेच पंजाब आणि महाराष्ट्र यांच्या परस्पर ऋ णानुबंधांवर भाष्य करत असताना (संशोधन कार्यात ख्यातकीर्त असलेले) संमेलनाध्यक्ष, शतकांपूर्वीच्या महान व्यक्ती व साहित्यिकांच्या योगदानाचा संदर्भ देतात, पण वर्तमान काळात (गेल्या तीन-साडेतीन दशकांत) शेतकरी संघटना आणि शरद जोशींनी या दोन्ही संदर्भात केलेल्या महान कार्याचा साधा उल्लेख करण्याचेही टाळतात याबाबत खंत वाटण्यापेक्षा राग येणे जास्त सयुक्तिक आहे.
यानिमित्ताने अलीकडेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शरद जोशींच्या संदर्भात सांगितलेला एक किस्सा आठवतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे झालेल्या शरद जोशी यांच्या गौरव समारंभात अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात शरद पवार म्हणाले की, पंजाब राज्यातील त्यांच्या अनेक समारंभांत (विशेषत: शेतकऱ्यांच्या समारंभांमध्ये) लोक भाषणातून त्यांचा (शरद पवारांचा) उल्लेख बऱ्याचदा चुकून शरद जोशी असा करतात.
शरद जोशी पंजाबातील शेतकऱ्यांमध्ये एवढे लोकप्रिय असल्याचे बघून, एक मराठी माणूस म्हणून अशा प्रसंगी मलाही आनंदच वाटतो, असेही पवार म्हणाले.
  शेतकरी संघटनेच्या आंदोलनांमागील विचारांवर साहित्य संमेलनांमध्ये कधी तरी चर्चा झडून येतील अशी अपेक्षा होती. साहित्यिक, चिंतक, संशोधक, समीक्षक, इतिहासकार आदींकडून वास्तवाचे आकलन होण्यास मदत व्हावी, ही सामान्य जनांची सार्थ अपेक्षा असते; परंतु त्यांच्याकडून सतत अपेक्षाभंग होत असताना सार्वजनिक, राजकीय क्षेत्रांतील शरद पवारांसारखे दिग्गज मात्र प्रसंगी आपल्या खुल्या दिलाची प्रचीती देऊन जातात.
गोिवद जोशी, सेलू (जि. परभणी)

मुख्यमंत्र्यांची सूचना क्रांतिकारी ठरेल!
अ. भा. मराठी साहित्य संमेलन ललित साहित्यापुरते मर्यादित न ठेवता जीवनातील अनेक अनुभवांचे दर्शनही त्यात व्हावे, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना मरगळ आलेल्या साहित्य क्षेत्राला नवसंजीवनी देणारी ठरू शकते; परंतु अशी केवळ सूचना देऊन न थांबता त्यांनी महाराष्ट्राने गेल्या पाच महिन्यांत केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा पंजाबी भाषेतील पुस्तिकेद्वारे संमेलनात उपस्थित साहित्यिकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करून आपली सूचना अमलात आणली.
आता यापुढील साहित्य संमेलने निरनिराळ्या पक्षांचे गाळे (स्टॉल्स) आणि त्या पक्षांनी केलेल्या विकासकामांच्या छायाचित्रांची गॅलरी, माहिती पुस्तिका, पत्रके इ. साहित्यांनी नटलेली दिसल्यास आश्चर्य वाटू नये.
मुरली पाठक, विलेपाल्रे पूर्व (मुंबई)

(काही) माणसे जगली नाहीत तरी चालेल..!
मूळ कृषी संस्कृतीतील ‘बस्वण्णा’च्या (वृषभ वंशाच्या) उद्धारासाठी कायदा झाला हे बरे की वाईट, हा वाद वेगळा! समष्टीतील सर्वच जीवांना निसर्गाने आपल्यापरीने जगण्याची मुभा दिली असल्याने एका जीवाने दुसऱ्या जीवाचा जीव घेणे हे सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध  आहे की बाजूने आहे हे कोण ठरविणार? हे अधिकार निसर्गाने कुणाला बहाल केले आहेत?
 दशावतारानुसार पहिल्या आणि तिसऱ्या अवतारांवरसुद्धा लगेच खाद्यबंदी घातली पाहिजे. दुसऱ्या अवतारावर खाद्यबंदी आहेच. शिवाय, यमाचे वाहन असलेल्या विश्वामित्रीचा वंशही वाचवायला हवा. अजा, मेष, कुक्कुट यांचेही जीव वाचविण्याची हीच वेळ आहे. एक वेळ काही माणसे जगली नाहीत तरी चालेल, पण धर्म, पशुपक्षी, जीवजंतू जगलेच पाहिजेत, कारण मनुष्य हासुद्धा एक प्राणीच आहे हे आपण कधीच विस्मृतीत टाकलेय!
शाहू पाटोळे, औरंगाबाद</strong>

काळाची गरज आक्रमण थोपविण्याची होती..
शरद बेडेकर यांचे ‘मानव विजय’ हे लेखमाला-वजा सदर नियमितपणे वाचतो. त्यांचे मुद्दे अतिशय परखड व विचार करायला लावणारे असतात. ते प्रत्येकाला पटतीलच असे नाही; पण या सदराचे वेगळेपण त्याच्यातच आहे. ‘संत प्रभाव’ या ६ एप्रिल २०१५ च्या ‘लोकसत्ता’मधील लेखात असेच अनेक मुद्दे आहेत आणि ते बऱ्याच अंशी पटतात. युरोपमधील प्रबोधनाची चळवळ व आपले संत साहित्य यांची तुलना व त्याद्वारे दाखवलेला फरक खरोखरीच अंतर्मुख करतो..
 आणि मग विचार मनात येतो की, अलेक्झाण्डरपासून ते ब्रिटिशांपर्यंत जी सामरिक व वैचारिक आक्रमणे आपल्या देशावर झाली, त्या त्या काळातील संत, नाथ संप्रदाय, इतर पंथ यांनी यासंबंधी काय केले?
किंवा, भक्तांनी जे जे चमत्कार यांना चिकटवले, ते आक्रमणे रोखण्याच्या बाबतीत का घडले नाहीत?  
संतांचे व वेगवेगळ्या संप्रदायांचे आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य महान आहे, समाजातील भेदभाव कमी करण्याचाही प्रयत्न काही प्रमाणात झाला, याबद्दल दुमत नाही.
 पण काळाची खरी गरज काय होती ते ओळखण्यात ही मंडळी कमी पडली का?
अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)

यांच्याबद्दल लिहिणे हा जागेचा अपव्यय
‘पिशाच्च्यापाशी पिशाच्च गेले’ हा अग्रलेख (७ एप्रिल) लिहून ‘लोकसत्ता’ने विनाकारण बौद्धिक शक्तीचा आणि अर्थातच वृत्तपत्रातील जागेचा अपव्यय केला आहे असे वाटते, कारण समाजवादी मंडळींचा हा पुन:पुन्हा एकत्र येण्याचा व पुन:पुन्हा एकमेकांपासून दूर होण्याचा खेळ गेली सुमारे ६० वर्षे सुरू आहे. आता बिहारची निवडणूक तोंडावर आलेली असताना त्यांना एकत्र येण्याची घाई झाली आहे किंवा अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे दोघा व्याहय़ांना (लालू व मुलायम) आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पर्याय दिसत नाही हे अधिक खरे आहे.
निवडणूक झाल्यावर व सत्ता मिळाली किंवा न मिळाली तरी त्यांच्यात लवकरच विघटन होईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
श्रीनिवास जोशी, डोंबिवली पूर्व

.. म्हणून आताही कुणी लिहायचेच नाही?
‘ठो-ठो अपरिपक्वपणा’ हा ‘अन्वयार्थ’ (१ एप्रिल) आणि त्यावरील ‘याला स्टंटबाजी म्हणणे अत्यंत अयोग्य’ हे पत्र (२ एप्रिल) वाचले. मंत्र्यांनी किंवा कोणीही परवाना असलेले पिस्तूल जवळ बाळगणे याला कोणाचीही हरकत असण्याचे कारण नाही, पण असे पिस्तूल आपल्याकडे आहे, याचे जाहीर प्रदर्शन करणे याला ‘अन्वयार्थ’मध्ये स्टंटबाजी म्हटले आहे.
मंत्री झाल्यावरही टपरीवर चहा पिणे किंवा कुणा शेतकऱ्याकडे जाऊन चटणीभाकरी खाणे हा स्टंट नाही, पण त्याची प्रसिद्धी होऊ देणे याला स्टंटबाजी जरूर म्हणावे.
गिरीश महाजन यांच्यापूर्वी, आधी शिवसेनेत असलेले ठाणे जिल्हय़ातील एक आमदार व माजी मंत्री गणेश नाईक यांनासुद्धा कमरेला पिस्तूल खोचून फिरताना अनेकांनी पाहिलेले आहे; पण तेव्हा कुणी लिहिले नाही. याशिवाय, रेल्वेमंत्री झाल्यानंतर मुंबईच्या लोकलगाडीतून अगदी उभे राहून प्रवास केल्याची वृत्ते आणि छायाचित्रेही सुमारे १५ वर्षांपूर्वी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्या वेळी त्या मंत्र्यांनी हा स्टंट केला असे कुणी लिहिले नाही.
..पण तेव्हा कुणी लिहिले नाही; म्हणून आताही कुणी लिहायचेच नाही? हे कोणते बंधन?
– सुधीर चिंतामणी देवरुखकर, नालासोपारा पूर्व

Story img Loader