नामदेव महाराजांच्या सात शतकांपूर्वीच्या कार्याचा यथोचित गौरव झाला याबद्दल मराठी माणसाला विशेष आनंद होणे साहजिक आहे; पण त्याच वेळी साहित्य आणि शेतकरी तसेच पंजाब आणि महाराष्ट्र यांच्या परस्पर ऋ णानुबंधांवर भाष्य करत असताना (संशोधन कार्यात ख्यातकीर्त असलेले) संमेलनाध्यक्ष, शतकांपूर्वीच्या महान व्यक्ती व साहित्यिकांच्या योगदानाचा संदर्भ देतात, पण वर्तमान काळात (गेल्या तीन-साडेतीन दशकांत) शेतकरी संघटना आणि शरद जोशींनी या दोन्ही संदर्भात केलेल्या महान कार्याचा साधा उल्लेख करण्याचेही टाळतात याबाबत खंत वाटण्यापेक्षा राग येणे जास्त सयुक्तिक आहे.
यानिमित्ताने अलीकडेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शरद जोशींच्या संदर्भात सांगितलेला एक किस्सा आठवतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे झालेल्या शरद जोशी यांच्या गौरव समारंभात अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात शरद पवार म्हणाले की, पंजाब राज्यातील त्यांच्या अनेक समारंभांत (विशेषत: शेतकऱ्यांच्या समारंभांमध्ये) लोक भाषणातून त्यांचा (शरद पवारांचा) उल्लेख बऱ्याचदा चुकून शरद जोशी असा करतात.
शरद जोशी पंजाबातील शेतकऱ्यांमध्ये एवढे लोकप्रिय असल्याचे बघून, एक मराठी माणूस म्हणून अशा प्रसंगी मलाही आनंदच वाटतो, असेही पवार म्हणाले.
शेतकरी संघटनेच्या आंदोलनांमागील विचारांवर साहित्य संमेलनांमध्ये कधी तरी चर्चा झडून येतील अशी अपेक्षा होती. साहित्यिक, चिंतक, संशोधक, समीक्षक, इतिहासकार आदींकडून वास्तवाचे आकलन होण्यास मदत व्हावी, ही सामान्य जनांची सार्थ अपेक्षा असते; परंतु त्यांच्याकडून सतत अपेक्षाभंग होत असताना सार्वजनिक, राजकीय क्षेत्रांतील शरद पवारांसारखे दिग्गज मात्र प्रसंगी आपल्या खुल्या दिलाची प्रचीती देऊन जातात.
गोिवद जोशी, सेलू (जि. परभणी)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा