‘संक्रमण शिबिरातील रहिवाशांना दिलासा’ ही बातमी (८ मे) तसेच गेल्या काही महिन्यांत या विषयावर आलेल्या अन्य बातम्याही वाचल्या. ‘संक्रमण शिबीर’ या सात अक्षरी दलदलीत अनेक कुटुंबे (मूळ भाडेकरू) अडकून पडली आहेत. पिढय़ान्पिढय़ा संक्रमण शिबिरात आम्ही यातना भोगत असून आमचे प्रश्न, आमच्या समस्या, आमच्यावर होत असलेला अन्याय, आमची झालेली पिळवणूक याच्याशी प्राधिकरणाला व संबंधित मंडळाला काहीच पडले नसल्याचे वेळोवेळी दिसून येते.
संक्रमण शिबिरात राहत असलेल्या सेस इमारतीमधील मूळ भाडेकरूंना त्या इमारतींच्या पुनर्वकिासातून मिळणारी घरे मास्टर लिस्ट माध्यमातून वितरित केली जातात. खूपच परिणामकारक असा हा नियम असून अंमलबजावणीत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. मूळ भाडेकरू आजही संक्रमण शिबिरात राहत असून त्यांच्या नावे आधीच गाळे वितरित झाल्याचे दिसून येते. खऱ्या रहिवाशांना याचा पत्ताच नसतो. एकाच नावाची व्यक्ती पात्र म्हणून तीन वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचे दिसून येते.
धक्कादायक म्हणजे एक ठिकाणी ती व्यक्ती मयत आहे, असे दाखवतात तर दुसऱ्या ठिकाणी ती जिवंत असल्याचे दिसून येते. तसेच एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या ठिकाणी एकाच कागदपत्रावर गाळे वितरित करण्यात आले आहेत. वेळोवेळी खोटी कागदपत्रे संबंधित विभागात सादर केले जातात आणि ते पडताळणीसाठी शासनाचा वेळ घालवावा लागतो. अशा लोकांवर कारवाई झाली तर खोटय़ा अर्जदारांची संख्या कमी होऊन या प्रकियेत पारदर्शकता येईल आणि मूळ भाडेकरूंना जलद घरे मिळू शकतील. दोन वष्रे झाली मंडळाला अजून अंतिम यादी प्रसिद्ध करता आलेली नाही. जास्तीत जास्त मूळ भाडेकरूंना मास्टर लिस्टसाठी कसे अपात्र केले जाईल यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कंबर कसल्याचे दिसून येते. कारण काय तर तुम्ही आधीच गाळा घेतलाय, मतदारयादीत नाव नाही, जुनी इमारत जागेवर उभी आहे वगैरे. आता नवीन कारण काय? तर तिथे लवकरच म्हाडा इमारत बांधणार. म्हणून तुम्ही अपात्र! बडय़ा अधिकाऱ्यांकडे गेल्यावर करतो, बघतो असे गोड बोलतात, पण न्याय मात्र मिळत नाही.
हा प्रश्न मुळापासून संपवायचा असल्यास सरकारने धाडसी व कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. मुळात ३३(७)च्या माध्यमातून निवासी कार्यकारी अभियंता या विभागाकडे आजपर्यंत किती घरे उपलब्ध झाली याची चौकशी होणे गरजेचे आहे. कोणत्या इमारतीचा विकास झाला, त्या बदल्यात कोठे गाळे स्वीकारण्यात आले व त्यांची संख्या अशी माहिती प्रसिद्ध करण्यात यावी. त्याच बरोबरीने उपमुख्य अधिकारी (पु. गा.) या कार्यालयाने हे गाळे ज्यांना दिले त्यांची नावे, मूळ इमारतीचा पत्ता इ. सर्व माहिती द्यावी. हे सर्व साध्या ‘एक्सेल शीट’ वर जरी आली तरी सर्व लेखाजोखा सगळ्यांच्या समोर येईल .
आजपर्यंत म्हाडाला ढिसाळ कारभारासाठी नेहमी लाखोली वाहायचो पण भ्रष्टाचार करताना जी कर्तबगारी, सुनियोजितपणा या लोकांनी दाखवलाय त्यासाठी त्यांना सलाम ठोकायलाच हवा!
-अभिजीत मनोहर पेठे,अध्यक्ष, ट्रान्झिस्ट कॅम्प असोसिएशन (मुंबई)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा